आपल्या दैनंदिन तसेच भविष्यातील गरजा भागविण्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे त्यासाठी लागणारा पैसा. आपण आपापल्या कुवतीनुसार पैसा मिळवत असतो. आपल्याकडे एखादे कौशल्य असेल किंवा मिळेल ते काम करण्याची तयारी असेल तर पैसे मिळविणे फारसे अवघड नसते. मात्र मिळत असलेला निधी आणि खर्च यांचा योग्य ताळमेळ साधून दैनंदिन तसेच भविष्यातील गरजा भागवणे हे तितकेसे सोपे नसते. यासाठी केवळ साक्षर असून उपयोग नाही तर अर्थसाक्षर असणे आवश्यक आहे.
निरोगी व जोखीममुक्त गुंतवणुकीच्या संधींसाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. ती नसल्यास गुंतवणूकदारांचे नुकसान होते किंवा अपेक्षित परतावा न मिळाल्यामुळे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यास अडचणी येतात. कोणत्याही प्रकरची गुंतवणूक केल्यास त्यात जोखीम हा घटक असतोच. बऱ्याचदा व्यक्तीकडून मासिक दोन टक्के परतावा मिळेल या आशेने आयुष्यभराची पुंजी व्याजाने दिली जाते आणि त्यांचे आर्थिक नुकसान होते.
हेही वाचा – Money Mantra : जीडीपीची सुखद आकडेवारी, दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेची वाढ ७.६ % दराने
आर्थिक साक्षरता अत्यंत महत्त्वाची आहे आणि जीवनातील विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करायची असतील तर आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. आजच्या लेखात आपण आपली आर्थिक साक्षरता किती आहे, याचा पडताळा करून घेऊया.
खालील प्रश्नोत्तरे तुम्हाला आर्थिक साक्षरता जाणून घ्यायला मदत करतील:
१) बचत आणि गुंतवणूक या दोन्हीचा समावेश आर्थिक नियोजनात असावा.
अ) बरोबर ब) चूक
२) महागाई वाढीमुळे रुपयांची क्रयशक्ती कमी होते.
अ) बरोबर ब) चूक
३) महागाई वाढीवर मात करण्यासाठी वास्तव परतावा जास्त मिळणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करणे योग्य ठरते.
अ) बरोबर ब) चूक
४) गुंतवणुकीत नुकसानीची शक्यता असते, याकरिता केवळ बचतीवर भर द्यावा.
अ) बरोबर ब) चूक
५) गुंतवणुकीत नुकसानीची शक्यता असते, याकरिता केवळ बचतीवर भर देण्याऐवजी तज्ज्ञांच्या मदतीने बचत आणि गुंतवणूक करावी.
अ) बरोबर ब) चूक
६) सोने खरेदी, स्थावर मालमत्ता खरेदी ही बचतीची उदाहरणे आहेत.
अ) बरोबर ब) चूक
७) ‘पीपीएफ’वरील वास्तव परतावा कमी झाल्यामुळे निवृत्तीचे नियोजन करताना, ‘पीपीएफ’सोबत म्युच्युअल फंडाचादेखील समावेश करावा.
अ) बरोबर ब) चूक
८) प्रतापराव यांच्या मुलीचे सहा महिन्यांनी लग्न आहे. पुढील महिन्यात त्यांची १० लाखांची बँक मुदत ठेव पूर्ण होणार आहे. प्रतापराव यांना त्यांच्या मित्रांनी विविध पर्याय सुचवले त्यातील योग्य पर्याय निवडायला त्यांना मदत करा.
अ) शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास खूप चांगला नफा मिळेल.
ब) शेअर बाजारातील गुंतवणुकीमध्ये जोखीम असते. याकरिता समभागसंलग्न म्युच्युअल फंड योजनांमध्ये गुंतवणूक करावी.
क) बँक मुदत ठेवीत रक्कम ठेवावी
ड) २ टक्के मासिक व्याजदराने रक्कम उधार द्यावी.
९) मंगेश साने यांची मुलगी आज सहा महिन्यांची आहे. तिच्या विवाहाची तरतूद म्हणून त्यांना गुंतवणूक करायची आहे. कोणता पर्याय अधिक फायदेशीर ठरेल?
अ) आवर्ती ठेव (बँक रिकरिंग डिपॉझिट)
ब) समभागसंलग्न म्युच्युअल फंडातील शिस्तशीर गुंतवणूक पर्याय म्हणजेच ‘एसआयपी’
१०) गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी आर्थिक नियोजन करावे.
अ) बरोबर ब) चूक
११ ) दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीपेक्षा बचत अधिक फायदेशीर आहे.
अ) बरोबर ब) चूक
१२) आर्थिक नियोजन हे केवळ गर्भश्रीमंतांसाठी असते.
अ) बरोबर ब) चूक
१३) ढोबळमानाने म्युच्युअल फंडातील समभागसंलग्न गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या किती टक्के असावी?
अ) ५० टक्के ब) १०० वजा गुंतवणूकदाराचे वय
१४) म्युच्युअल फंडात ‘एसआयपी’च्या मदतीने दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास चक्रवाढीचा (पॉवर ऑफ कंपाऊंडिंग) आणि ‘रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग’चा लाभ मिळतो.
अ) बरोबर ब) चूक
१५) सरासरी महागाई वाढीचा दर किती आहे?
अ) ५ टक्के ब) ६ टक्के क) ७ टक्के ड) १० टक्के
१६) बचत आणि गुंतवणुकीमध्ये वर्गीकरण करा.
बँक बचत खाते
समभागसंलग्न म्युच्युअल फंड
सोने
बँक मुदत ठेव
पीपीएफ
सदनिका
जमीन
१७) आर्थिक उद्दिष्ट योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी आर्थिक सल्लागारांची मदत घ्यावी.
अ) बरोबर ब) चूक
१८) आयुर्विम्याच्या मदतीने आपल्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यासाठी मुदतीचा विमाच सर्वोत्तम.
अ) बरोबर ब) चूक
१९) जर एखाद्या व्यक्तीने ५० लाखांचे गृहकर्ज घेतले तर, त्या व्यक्तीने ५० लाखांचे अतिरिक्त विमा कवच घ्यावे.
अ) बरोबर ब) चूक
२०) महिलांनी आर्थिक साक्षर होणे ही काळाची गरज आहे.
अ) बरोबर ब) चूक
२१) आर्थिक नियोजनाच्या मदतीने विविध आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वसमावेशक योजना तयार करावी. जर केवळ एखाद्या उद्दिष्टासाठी नियोजन केले तर अन्य उद्दिष्टांसाठी तरतूद नसल्याने आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करताना अडचणी येऊ शकतात.
अ) बरोबर ब) चूक
महत्त्वाचे – वरील प्रश्नांची उत्तरे ‘लोकसत्ता’च्या चोखंदळ वाचकांनी स्वतःच शोधायची आहेत आणि आवश्यकतेनुसार आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी, असे सुचवावेसे वाटते.
हेही वाचा – वित्तरंजन: वायदे बाजार (फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केट) भाग २
नवीन वर्षात आपण विविध संकल्प करतो त्यात आर्थिक साक्षर होणे हादेखील एक संकल्प असावा. आपण स्वतः आर्थिक साक्षर होणे आवश्यक आहे तसेच आपल्या मुलांनादेखील आर्थिक साक्षर करणे आवश्यक आहे. मुलांना लहानपणापासून आर्थिक साक्षरतेचे धडे दिल्यास त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात खूप फायदा होईल याकरिता पालकांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे. आर्थिक नियोजनाच्या मदतीने विविध आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शुभेच्छा.