मागील लेखात घरभाड्यावर कराव्या लागणाऱ्या उद्गम कराविषयी (टी.डी.एस.) माहिती घेतली. या व्यतिरिक्त सामान्य नागरिकांना आणखीन कोणत्या देण्यांवर उद्गम कर कापावा लागतो ते बघू. सामान्य नागरिकांसाठी उद्गम कराच्या तरतुदी २०१३ नंतर स्थावर मालमत्तेच्या उद्गम करापासून सुरु झाल्या. हळूहळू त्याची व्याप्ती वाढत गेली. या तरतुदीच्या मागे प्रामुख्याने दोन उद्देश आहेत, एक म्हणजे सरकारकडे कर जमा होतो आणि दुसरा म्हणजे सरकारकडे अशा व्यवहारांची माहिती उपलब्ध होते. उद्गम कर आणि गोळा केलेला कर, वार्षिक माहिती अहवाल (ए.आय.आर.), वगैरेच्या कक्षा मागील काही वर्षात वाढविल्या गेल्या जेणेकरून करदात्यांच्या व्यवहारांची माहिती प्राप्तिकर खात्याला उपलब्ध होईल. या माहितीच्या आधारे, करदात्याला मिळालेले उत्पन्न त्यांनी दाखल केलेल्या विवरणपत्रातील माहितीशी तपासले जाते किंवा असे उत्पन्न मिळालेल्या करदात्याने विवरणपत्रच दाखल केले नसेल तर प्राप्तिकर खात्यातर्फे याची विचारणा होऊ शकते. यासाठी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याचा उपयोग केला जातो.
आणखी वाचा: Money Mantra: घरभाड्यावर किती टीडीएस लागतो?
कलम १९४ एम : २०१९ मध्ये हे कलम नव्याने प्राप्तिकर कायद्यात जोडण्यात आले. जेव्हा सेवा वैयक्तिक वापरासाठी प्रदान केल्या जातात तेव्हा एखाद्या व्यक्तीने किंवा हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ.) द्वारे निवासी कंत्राटदाराला दिलेल्या कोणत्याही पैशातून कर कपातीच्या स्त्रोतासंबंधी हे कलम लागू केले आहे. याचा मूळ उद्देश म्हणजे असे पैसे मिळालेल्यांची माहिती प्राप्तिकर खात्याकडे उपलब्ध व्हावी. ज्या करदात्यांच्या उद्योगाची किंवा व्यवसायाची उलाढाल अनुक्रमे १ कोटी आणि ५० लाख रुपये असेल त्यांना प्राप्तिकर कायद्यातील इतर तरतुदीनुसार उद्गम कर कापावा लागतो. परंतु या व्यतिरिक्त व्यक्तींनी मोठ्या रकमेचे व्यवहार केल्यास त्याची माहिती प्राप्तिकर खात्याकडे जमा होत नव्हती, ती या कलमाद्वारे मिळते.
कोणाला लागू आहे : वैयक्तिक करदाते आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एच.यु.एफ.) हे कोणत्याही व्यक्तीला एका आर्थिक वर्षात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम देत असतील तर त्यांना उद्गम कराच्या तरतुदी (कलम १९४-एम) लागू होतात. उद्योग-व्यवसाय करणाऱ्या करदात्यांना ज्यांच्या उद्योगाची वार्षिक उलाढाल १ कोटी रुपयांपेक्षा आहे जास्त आहे किंवा व्यावसायिकांची उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्या उद्योग-व्यवसायाच्या संबंधित अशा रकमा दिल्या असल्यास त्यांना या तरतुदी लागू होत नाहीत. या व्यतिरिक्त जे करदाते आहेत (उदा. नोकरदार, निवृत्त कर्मचारी, गृहिणी) त्यांना कोणत्याही कारणाने, स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी ५० लाख रुपयांपेक्षा जास्त देणी दिल्या असतील तर या कलमाच्या तरतुदी लागू होतात. ही तरतूद निवासी भारतीयाला देणे दिले तरच लागू होते. ही देणी अनिवासी भारतीयांना दिलेली असतील तर या कलमानुसार उद्गम कराच्या तरतुदी लागू होणार नाहीत.
कोणत्या देण्यांवर लागू आहे : कलम १९४ एम नुसार खालील देण्यांवर या तरतुदी लागू होतील.
आणखी वाचा: Money Mantra: घर खरेदीवर टीडीएस कसा आणि किती लागू होतो?
कंत्राटी देणी : यामध्ये सेवेच्या करारांतर्गत दिलेले पैसे, जाहिराती साठी दिलेले पैसे, कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी किंवा निर्मितीसह प्रसारण, मालवाहतूक किंवा प्रवाशांची वाहतूक (कोणत्याही साधनाने रेल्वेसोडून), खानपान, वगैरे देणींचा समावेश होतो.
व्यावसायिक देणी : यामध्ये वैद्य, वास्तू विशारद, सल्लागार, सी.ए., वगैरे, तांत्रिक सेवांसाठी, रॉयल्टी, वगैरेंसाठी पैसे दिल्यास या कलमानुसार तरतुदी लागू होतात.
कमिशन : एखाद्या व्यक्तीला कमिशन दिल्यास, यात विमा कमिशनचा समावेश होत नाही.
उद्गम कर किती कापावा
एका वर्षात ५० लाख रुपयांपेक्षा जास्त देणी वरील व्यक्तींना दिल्यास ५% या दराने उद्गम कर कापणे बंधनकारक आहे. हे कलम वैयक्तिक स्वरुपाच्या खर्चासाठी किंवा उद्योग-व्यवसायाच्या खर्चासाठी सुद्धा लागू आहे. उदा, एका व्यक्तीने स्वतःचे घर बांधण्यासाठी कंत्राटदाराला किंवा वास्तुविशारदाला ५० लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे दिल्यास त्यावर ५% उद्गम कर कापावा लागेल. ज्याला पैसे द्यावयाचे आहेत त्याच्याकडे पॅन नसेल तर त्यावर २०% दराने उद्गम कर कापावा लागेल.
उद्गम कर कधी आणि कसा भरावा
ज्या महिन्यात उद्गम कर कापला आहे तो महिना संपल्यानंतर ३० दिवसाच्या आत हा उद्गम कर आपल्याला फॉर्म २६ क्यूडी मध्ये चलन भरून तो सरकारकडे जमा करावा लागतो. हा कर भरल्यानंतर करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या “ट्रेसेस” च्या संकेत स्थळावर नोंदणी करून १५ दिवसांच्या आत उद्गम कर कापल्याचे प्रमाणपत्र फॉर्म १६ डी डाऊनलोड करून द्यावे लागते. या खर्चावर कापलेला उद्गम कर सरकारकडे भरतांना टॅन (टॅक्स डिडक्शन अकाऊंट नंबर) घेणे गरजेचे नाही.
उद्गम कर वेळेत न भरल्यास
फॉर्म २६ क्यूडी भरण्यास विलंब झाल्यास प्रती दिन २०० रुपये विलंब शुल्क भरावे लागते. हे विलंब शुल्क उद्गम करापेक्षा जास्त असणार नाही. उदा. एखाद्या करदात्याने कर भरण्यास ३० दिवसाचा विलंब केल्यास प्रती दिन २०० रुपये या प्रमाणे ६,००० रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. परंतु जो उद्गम कर विलंबाने भरला तो ४,००० रुपये असल्यास विलंब शुल्क ४,००० रुपयांपर्यंतच मर्यादित असेल.
अनिवासी भारतीयांना देणी
१९४ एम हे कलम निवासी भारतीयांना पैसे दिले तरच लागू होते. अनिवासी भारतीयांना कोणतेही उत्पन्न निवासी भारतीयाने दिले असेल तर कलम १९५ च्या तरतुदी लागू होतात. यानुसार त्यावर भारतात लागू असणाऱ्या कराच्या दरानुसार उद्गम कर कापून भरावा लागतो.