तसे बघायला गेल्यास हा सगळ्यात मोठा आणि नवीनतम घोटाळा आहे. तसेच बराच प्रसिद्ध असल्यामुळे फार काही नवीन सांगण्यासारखेदेखील नाही. पण तरीही घोटाळा लेखमालिकेत याची वर्णी लागणे गरजेचे होते. या घोटाळ्याची व्याप्ती बघता हा घोटाळादेखील ”हिरा है सदा के लिये” या वर्गात मोडतो!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नीरव मोदी, त्याचे मामा मेहुल चोक्सी, त्याची बायको अमी मोदी आणि त्याचा भाऊ निश्चल मोदी यांनी मिळून पंजाब नॅशनल बँकेवर तब्बल ११ हजार कोटींचा डल्ला मारला. एका दृष्टीने बघायला गेले तर याला बँकेचे कर्मचारी आणि तेथील ढिसाळ कारभार अधिक जबाबदार आहे. घोटाळ्याची सुरुवात वर्ष २०११ मध्ये झाली, पण त्यापूर्वी नीरव मोदी हे हिरे व्यापारात मोठे नाव होते. एके काळी फक्त तकाकी म्हणजे पॉलिश न केलेल्या कच्च्या हिऱ्याचा व्यापार व्हायचा. नीरवने इथल्या व्यापाऱ्यांना पॉलिश केलेले हिरे विकण्यास सुरुवात केली आणि बाजारावर पकड बनवली. या मूल्यवर्धित सेवांवर खूश होऊन व्यापाऱ्यांनी त्याला भरपूर कार्यादेश दिले. मग त्याने परदेशातील छोट्या-मोठ्या हिऱ्याच्या कंपन्यांना विकत घ्यायला सुरुवात केली आणि आपला व्यापार विस्तार भारताबाहेरदेखील केला. यात २००५ मधील फ्रेडरिक गोल्डमन आणि २००७ मधील सँडबर्ग आणि जॅफे या कंपन्या विशेष उल्लेखनीय होत्या. वर्ष २००९ मध्ये त्याला हिऱ्याचे दागिने बनवण्याचा कार्यादेश प्राप्त झाला. याआधी कधीही दागिने न बनवलेला नीरवने आता यशस्वीरीत्या या उद्योगातसुद्धा आपले पाऊल ठेवले.

हे ही वाचा… हिरा है सदा के लिये! – उत्तरार्ध

२०१० ला नीरव मोदीने एक अजून प्रयोग केला. हैद्राबादजवळील गोलकोंडा येथील पांढऱ्या आणि ऑस्ट्रेलियामधील अर्गयले नावाच्या खाणीतून निघणाऱ्या गुलाबी हिऱ्यांचा हार त्याने बनवला आणि नाव दिले गोलकोंडा गुलाबी नेकलेस. हा जगात अतिशय प्रसिद्ध झाला आणि याबरोबर नीरव मोदीसुद्धा. याने पुढील पाऊल उचलून स्वतःच्या नावाची नाममुद्रा सुरू केली. या नाममुद्रेची दिल्ली, मुंबईमध्ये आणि परदेशातसुद्धा एकंदरीत १७ दालने सुरू झाली होती. हिऱ्यासारख्या व्यापारात प्रचंड गुंतवणूक करावी लागते. कारण मूळ हिऱ्याची किंमतच प्रचंड असते, ज्याला खेळते भांडवल असे म्हणतात. त्यात नाममुद्रा वाढवायला ‘ब्रँड अम्बॅसेडर’ म्हणून प्रियांका चोप्राची नेमणूक केली आणि अजूनही काही हॉलीवूडच्या अभिनेत्रींना त्यात सामील केले गेले म्हणजे गरज अजून वाढली होती. त्याचा दालनाच्या उद्घाटनला डोनाल्ड ट्रम्प यांचे पुत्र आणि सून यांनीदेखील हजेरी लावली होती.

हे ही वाचा…मार्ग सुबत्तेचा : संपत्ती व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?

विस्तार होत असताना मदतीला आली पंजाब नॅशनल बँक, जी हिरे परदेशातून आणण्यासाठी ‘लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग’ म्हणजे एक प्रकारचे खेळते भांडवलच देत होती. नीरव मोदीने त्यांची कार्यपद्धती समजावून घेतली आणि त्यातील कमतरता ओळखून बँकेच्या प्रणालीत शिरून घोटाळा केला. बँकेचे कर्मचारीसुद्धा त्यात सामील होते, ज्यांना पैशाचे आमिष दाखवून तब्बल ११,००० कोटींचा घोटाळा केला गेला. यात मुख्य म्हणजे बँकेची कर्ज नोंद करण्याची प्रणाली आणि बँकेचे परदेशातील बँकेला दिलेल्या सूचना यांचा एकमेकांशी अजिबात संवाद नव्हता. किंबहुना असा सवांद होऊ नये म्हणून खोटे ‘लेटर ऑफ अंडरस्टॅण्डिंग’ देण्यात आले. या उदयानंतर नीरव मोदींचा अंतदेखील ठरलाच होता, पण तो बघू पुढील आठवड्यात.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How nirav modi committed fraud of rupees 11000 crores mmdc sud 02