आज जो विषय मी मांडणार आहे तो सर्वच गुंतवणूकदारांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा नक्कीच आहे. मुळातच गुंतवणूक ही सर्वसाधारणपणे चांगले परतावे मिळावेत याच अपेक्षेने केली जाते. आपली गुंतवणूक कशी चालू आहे याचा निकाल आपण त्यातून मिळालेल्या परताव्यांमधून काढतो. अनेकदा दुसऱ्याला किती मिळाले याच्याशी तुलनादेखील होते. त्यातून एकतर खूश होतो किंवा ‘मला का बरं नाही मिळत जास्त परतावे’ असं म्हणून नाराज होतो. तेव्हा कोणत्या वेळी, कुठल्या गुंतवणुकीसाठी कशा प्रकारे परतावे तपासावे यावर आजचं मार्गदर्शन. आधी समजून घेऊया परताव्याचे प्रकार. इथे मला काही शब्द इंग्रजीतून सांगावे लागत आहेत. कारण ते तसेच वापरले जातात. तुम्ही गूगल आणि एक्सेल वापरत असाल तर हेच शब्द वापरावे लागतात. १. निव्वळ परतावा (Absolute Returns) हे परतावे समजणं अतिशय सोपे असतात. किती पैसे गुंतवल्यावर नेमका किती फायदा झाला हे सरळ समीकरण बसलं की झालं. १ लाख रुपये गुंतवले आणि त्याचे २.५ रुपये लाख झाले, म्हणजे दीड लाखांचा फायदा झाला. अर्थात १५० टक्के निव्वळ परतावा मिळाला. इथे हे पैसे किती वेळ गुंतलेले आहेत हे बघितलं जात नाही. तेव्हा शक्यतो एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी मिळालेल्या परताव्यांसाठी हा दर वापरावा.

२. चक्रवाढ परतावे (Compounded Annualized Growth Rate – CAGR)

याचं सर्वात प्रचलित उदाहरण म्हणजे बँकेतील मुदत ठेव. जेव्हा आपण ठेवीवर मिळणारे व्याज खात्यातून काढून न घेता ते मुदत ठेवीमध्येच ठेवतो, तेव्हा व्याजावर व्याज मिळाल्याने वाढीव परतावे मिळतात. हे परतावे मग मुदत ठेव संपली की मूळ रकमेसकट आपल्याला मिळतात. इथे गुंतवणूक कालावधीसुद्धा बघितला जातो. आज गुंतवलेले रु. १ लाख जर दोन वर्षांनी रु. २.५ लाख झाले तर सीएजीआर ५८.११ टक्के मिळाला. हा हिशेब ऑनलाइन, मोबाइल किंवा कॅल्क्युलेटरवरसुद्धा करता येतो. एक वर्षापेक्षा अधिक कालावधी आणि एकरकमी गुंतवणूक असल्यास हा दर वापरावा. गुंतवणूकदारांच्या ईमेलमध्ये मासिक मिळणाऱ्या एनएसडीएल/सीडीएसएलच्या विवरणांमध्येसुद्धा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी हे परतावे दाखवले जातात. परंतु अनेकदा ते चुकीचे असल्याचे लक्षात आलेले आहे.

३. विस्तारित अंतर्गत परतावा दर (Extended Internal Rate of Return – XIRR)

जिथे एकरकमी गुंतवणूक न होता वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रकमेची गुंतवणूक होते तिथे अशा प्रकारे गुंतवणूक परतावे तपासावे. खालील तक्त्यातून हे जास्त स्पष्ट होईल.

तारीख गुंतवलेली रक्कम

१ एप्रिल २०२३ ५०,०००

३१ ऑक्टो, २०२३ १०,०००

१५ डिसें. २०२३ २०,०००

१६ मार्च २०२४ १०,०००

२१ डिसें. २०२४ १०,०००

या एकंदर रु. १ लाख गुंतवणुकीवर जर ३१ मार्च २०२५ ला रु. २.५ लाख मिळाले, तर गुंतवणूक काळानुसार परताव्याचा दर ७८ टक्के होईल. हे परतावे जाणून घेण्यासाठी एक्सेल किंवा ऑनलाइन साधनांची मदत लागते. अनेकदा तुम्ही ज्या खात्यातून गुंतवणूक करता किंवा वितरकाकडून माहिती घेता तिथे हे परतावे दाखवले जातात. कमी काळात मिळालेले भरपूर परतावे असल्यास परताव्याचा दर खूप मोठा दिसतो. आणि तेच नुकसानीच्या बाबतीतसुद्धा होतं. म्हणून हा परताव्याचा दर वापरताना काळजी घ्यावी. एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी तो वापरू नये. म्युच्युअल फंडाच्या मासिक गुंतवणुकीचे परतावे अशा प्रकारे तपासता येतात. परंतु आधी सांगितल्याप्रमाणे कमी काळात झालेला फायदा आणि नुकसान दोन्ही या प्रकारच्या परताव्यांना मोठं करून दाखवतात.

४. जोखीम समायोजित परतावा (Risk Adjusted Returns)

जर आपल्याला दोन गुंतणुकीमध्ये तुलना करायची असेल तर सर्वात पहिलं आपण परतावे बघतो. सारखे परतावे देणाऱ्या गुंतवणुकीमध्ये जर तुलना करायची असेल तर त्यांच्यातील जोखीम समजून मग परतावे तपासतो. उदाहरण घ्यायचं तर ‘अ’ म्युच्युअल फंडाने मागील एक वर्षात १२ टक्के परतावा दिला, पण तो मधल्या काळात २० टक्के पडला होता आणि त्याच श्रेणीतल्या ‘ब’ म्युच्युअल फंडाने १२ टक्के परतावा दिले पण तो मधल्या काळात ५ टक्के पडला होता. साहजिकच आहे की, ‘ब’ म्युच्युअल फंड कमी जोखीम घेऊन ‘अ’ म्युच्युअल फंडाएवढाच परतावा देत आहे. तर मग सुज्ञ गुंतवणूदाराने ‘ब’ म्युच्युअल फंड निवडावा. यासाठी म्युच्युअल फंडाचे Standard Deviation, Sharpe Ratio आणि Sortino Ratio पाहावेत. कमीत कमी Standard Deviation आणि जास्तीत जास्त Sharpe Ratio आणि Sortino Ratio हे चांगले. शेअर्सच्या पोर्टफोलिओमध्येसुद्धा हे कळू शकतात. परंतु त्यासाठी एक्सेलची खूप मदत घ्यावी लागते.

आता वळूया पोर्टफोलिओची कामगिरी कशी तपासावी याकडे. सर्वप्रथम हे लक्षात घ्या की, आपल्याला आपल्या सगळ्या पोर्टफोलिओवर किती परतावा मिळाला हे पाहायचंय, आणि त्यानंतर कुठल्या पर्यायातून किती मिळाला? यासाठी मुळात आपल्या गुंतवणुकीची संपूर्ण माहिती एका ठिकाणी योग्य पद्धतीत नमूद असावी लागते. शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीच्या तारखा आणि रक्कम, लाभांश मिळाल्याची तारीख आणि रक्कम, स्थावर मालमत्तेची खरेदीची तारीख, रक्कम, त्यावर दिलेली दलाली, पुढे मिळालेलं भाडं, वार्षिक आणि मासिक खर्च, गुंतवणूक असणाऱ्या विमा पॉलिसीचीसुद्धा संपूर्ण माहिती-किती प्रीमियम, कधी परतावे मिळणार, किती मिळणार, कोणत्या परताव्याची हमी आहे.

एकदा हे सर्व योग्य पद्धतीने एका ठिकाणी जमा झालं की, मागील वर्षी आपल्या पोर्टफोलिओची किंमत किती होती आणि या वर्षी किती आहे (वर्षभरात केलेली गुंतवणूक वजा करून), आपल्याला कळतं की पोर्टफोलिओ किती वाढला किंवा कमी झाला आहे. याला म्हणतात निव्वळ तुलना (Absolute Comparison).

पुढे पाहायचंय की झाली ती वाढ बरोबर आहे की नाही (Benchmark Comparison). जर पोर्टफोलिओमध्ये फक्त शेअर बाजारातील टॉप १०० कंपन्यांपैकी काही कंपन्यांमधील गुंतवणूक असेल तर त्याची तुलना निफ्टी १०० निर्देशांकाबरोबर करावी. परंतु जर ८५ टक्के पोर्टफोलिओ हा स्मॉल व मिड कॅप कंपन्यांचा असेल तर आपल्याला निफ्टी १००, निफ्टी मिड कॅप १५० आणि निफ्टी स्मॉल कॅप १०० या तिन्ही निर्देशांकांचा परतावा पाहावा लागणार. जशी जोखीम, त्यानुसार तुलना हे इथे लक्षात ठेवायचंय. स्थावर मालमत्तेचे परतावे शेअर बाजाराशी करू नये. शेअर्सचा पोर्टफोलिओ असल्यास सेक्टर्सचं विविधीकरणसुद्धा महत्त्वाचं ठरतं. निफ्टी ५० मध्ये वित्तीय संस्था आणि बँका भरपूर आहेत, परंतु तुमच्या पोर्टफोलिओमध्ये धातू, रिअल इस्टेट कंपन्या आणि फार्मा कंपन्या जास्त असल्यास त्याची तुलना निफ्टी ५० बरोबर न करता निफ्टी १०० निर्देशांकाबरोबर करावी.

परतावे पाहताना एका वर्षात भरपूर मिळावे आणि प्रत्येक वर्षी असेच मिळावेत ही अपेक्षा करणंच चुकीचं आहे. मागील परतावे तसेच राहण्यासाठी पुढील परिस्थितीसुद्धा तशीच राहिली पाहिजे. पण असं कधी होतं का? २० वर्षांपूर्वी मुदत ठेवींवर दोन आकडी व्याज मिळत होतं ते आता मिळतं का? मागील एक वर्ष बँकांसाठी चांगलं होतं पण पुढचं असणार आहे का, महागाई तेवढीच राहणार का, जागतिक परिस्थिती तशीच राहणार का, या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरं कोणालाही माहीत नसतात. अभ्यासकसुद्धा अंदाज वर्तवतात, हेच आणि असंच होईल आणि याच वेळेत होईल हे कोणीही सांगू शकत नाही. तेव्हा पोर्टफोलिओकडून परताव्याची अपेक्षा ठेवतानासुद्धा ती रास्त ठेवावी.

पुढे मग आपण शोधतो की, आपला पोर्टफोलिओ खरंच जर त्याच्या मानदंड निर्देशांकापेक्षा (Benchmark) कमी वाढला तर कशामुळे? आपण चुकीच्या वेळी गुंतवणूक केली की गुंतवणूक पर्याय अपेक्षित परतावे देऊ नाही शकला? मार्केटच्या वरच्या टप्प्यात केलेल्या चांगल्या गुंतवणुकीतूनसुद्धा खराब मार्केटमधून चांगले परतावे नाही मिळू शकत. आणि खालच्या मार्केटमध्ये केलेली बेताची गुंतवणूकसुद्धा चांगले परतावे देऊ शकते.

मुळात आपापल्या पोर्टफोलिओत, नक्की किती जोखीम कोणत्या पर्यायाला आहे हे समजलं की त्यानुसार अपेक्षित परतावे काढता येतात. परंतु अनेकदा पोर्टफोलिओच्या जोखिमीकडे दुर्लक्ष झाल्याने आधी कमावलेला फायदा कमी झालाय किंवा त्याचं रूपांतर तोट्यात झालंय असं लक्षात येतं. म्हणून मुळात जोखीमक्षमतेनुसार पोर्टफोलिओ बनवला आणि अर्थव्यवस्थेतील आर्थिक चक्रानुसार जोखीम व्यवस्थापन केल्याने बऱ्यापैकी परतावे सांभाळता येतात.

हे सर्व जरी थोडं क्लिष्ट वाटलं तरीसुद्धा हळूहळू नीट समजून घ्यावं. जसजसा पोर्टफोलिओ मोठा होईल तसतसं त्याच्यातील जोखीम व्यवस्थापन जास्त महत्त्वचं होईल. वॉरेन बफे यांचं हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा- गुंतवणुकीचे २ नियम – नियम पहिला तोटा करू नका आणि नियम दुसरा पहिला नियम कधीच विसरू नका.

तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.