शेअर्समधील गुंतवणुकीत अन्य गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा (उदा: बँक एफडी, पीपीएफ,एनएससी) जास्त रिस्क असते यामुळे सामान्य गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाही. परिणामी कमी रिटर्न वर नाईलाजाने गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते. मात्र जर आपल्याला चांगला रिटर्न हवा असेल तर तशी रिस्क घेण्याची तयारी पण असली पाहिजे. गुंतवणुकीत असणारे रिस्क समजून घेतल्यास निर्णय घेणे सोपे होते. यासाठी नेमका रिटर्न कसा मिळतो हे समजणे आवश्यक आहे. उदा: बँक एफडी, पीपीएफ,एनएससी यातील गुंतवणुकीचा रिटर्न हा व्याजाच्या स्वरुपात मिळतो व तो गुंतवणुकीच्या कालावधीसाठी ठरलेल्या व्याज दरानुसार मिळतो यामध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते व मिळणारे व्याजही ठराविक असते तसेच गुंतविलेली मूळ रक्कम मुदती नंतर परत मिळत असते.यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित वाटते असे असले तरी सध्या मिळणारे व्याज हे जेमतेम ६.५% ते ७.५% इतकेच आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.
आणखी वाचा: Money mantra: रिव्हर्स मॉर्गेज पद्धती आहे तरी कशी?
या उलट आपण जर आवश्यक तो अभ्यास करून अथवा योग्य सल्ला घेऊन शेअर्स मध्ये गुंतवणूक केली तर सुमारे १४ ते१५% इतका रिटर्न (बँक एफडी, पीपीएफ,एनएससी यातील गुंतवणुकीच्या सुमारे दुप्पट ) मिळू शकतो. शेअर्समधील रिटर्न हा शेअरच्या किमतीत होणारा चढ उतार व दरम्यानच्या काळात मिळणारा लाभांश (डिव्हिडंड) यावर अवलंबून असतो असे असले तरी प्रामुख्याने शेअर्सच्या किमतीत होणाऱ्या बदलावर जास्त अवलंबून असतो.
उदाहरणार्थ आपण एक वर्षापूर्वी एखाद्या कंपनीचा रु.१० फेस व्हॅल्यू (दर्शनी मूल्य) असलेला शेअरबाजारातून रु.२३० ला खरेदी केला आहे व त्याची आजची बाजारातील किंमत रु.३०० आहे व या कालावधीत कंपनीने ५०% डिव्हिडंड दिला असेल तर या गुंतवणुकीतून मिळालेला रिटर्न {(३००-२३०)+५ }/२३० =३२.६१% इतका आहे. याउलट जर या शेअरची आजची बाजारातील किंमत रु.१९२ असेल तर मिळालेला रिटर्न {(१९२-२३०)+५ }/२३०= -१४.३४% इतका असेल. यावरून आपल्या लक्षात येईल कि शेअर गुंतवणुकीतील रिटर्न हा प्रामुख्याने खरेदीची किंमत व बाजारातील आजची किंमत यावर अवलंबून असतो. शेअर्सच्या किमती या वेळोवेळी विविध कारणांनी कमी अधिक होत असतात. यामुळेच मिळणाऱ्या रिटर्नबाबत शाश्वती देता येत नाही आणि म्हणूनच गुंतवणुकीत रिस्क असते कारण आपण गुंतविलेली रक्कम तेवढीच राहील याची खात्री नसते.
मात्र आपण जर दीर्घ कालावधीसाठी(किमान ४ ते ५ वर्षे ) व चांगल्या व प्रस्थापित कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर १४ ते १५% किंवा त्याहून अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते यातील गुंतवणुकीतून फायदा अथवा तोटा कसा होतो हे पुढील दोन उदाहरणावरून ध्यानात येईल.
आणखी वाचा: सोने प्रत्यक्ष खरेदी ईटीएफ की सोव्हिरियन बॉण्ड लाभदायी काय …
ऑक्टोबर २००३ मध्ये ज्यांना मारुती मोटर्सच्या आयपीओ शेअर्स मिळाले तेंव्हा त्याची किंमत प्रती शेअर्स रु.१२५ होती सध्या या शेअरची बाजारातील किंमत सुमारे रु.१०६०० इतकी आहे म्हणजे जर एखाद्याने त्यावेळी १०० शेअर्स घेतले असतील तर फक्त रु.१२५०० एव्हढी रक्कम गुंतविलेली आहे मात्र त्याची आजची किंमत सुमारे रु.१०६०००० इतकी आहे व हीच रक्कम बँकेत ठेवली असेल आणि समजा व्याज दर १०% असेल व चक्रवाढ व्याज आणि मुद्दल एकत्रित असेल तर ती रक्कम केवळ रु.४७,५०० इतकीच असेल.
याउलट जानेवारी २००८ मध्ये बाजारात आलेल्या रिलायन्स पॉवर कंपनीचा आयपीओ मधील शेअर्स रु.४३० ला मिळाला व त्याच्या कडे १०० शेअर्स आहेत तर त्याने रु.४३००० एव्हढी गुंतवणूक केली आहे मात्र या शेअरची सध्याची आजची किंमत आजची रु.१९.५० इतकीच असल्याने आहे केवळ रु.१९५० इतकीच व त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
थोडक्यात योग्य वेळी योग्य कंपनीच्या शेअर्स मध्येआपली जोखीम घेण्याची क्षमता विचारात घेऊन गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो.