मागील आठवड्यात म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संघटना असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया अर्थात ‘अॅम्फी’ने म्युच्युअल फंडांची मासिक आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, बंद झालेल्या किंवा नूतनीकरण न केलेल्या ‘एसआयपीं’ची संख्या लक्षणीय आहे. संत तुकाराम यांच्या शब्दात सांगायचे तर, ‘चालविसी हाती धरोनिया’ असा आपल्याला प्रत्येक बाबतीत कोणी तरी लागतो. जो मार्गदर्शक म्हणून आपला हात हातात घेऊन अवघड मार्गावर सतत आपल्याबरोबर असतो. बाजाराच्या तेजी-मंदीच्या वाटेवर, आपला हात हातात घेऊन चालणारा मार्गदर्शक म्हणजे आपला ‘एमएफडी’ अर्थात म्युच्युअल फंड वितरक. आपल्याला वितरक का हवा याच्या तपशिलात जाण्यापूर्वी, प्रथम म्युच्युअल फंड वितरक काय करतो ते समजून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुंतवणूकदार आणि म्युच्युअल फंड यांच्यातील दुवा म्हणजे आपला वितरक. गुंतवणूकदारांच्या आर्थिक गरजा आणि जोखीम सहिष्णुता यांचे मूल्यमापन वितरक करतो. गुंतवणूकदारांच्या गरजांशी जुळणाऱ्या योग्य म्युच्युअल फंड योजनांची शिफारस वितरक करतो. अनेकदा वैयक्तिक गरजा लक्षात घेऊन उपलब्ध असलेले पर्याय, त्यांची वैशिष्ट्ये, संभाव्य जोखीम आणि गुंतवणुकीवर परतावा यांची जाणीव तो गुंतवणूकदारांना करून देतो. वितरक व्यवहार सुलभ करण्यास मदत करतो. वितरक आर्थिक सल्लागार म्हणून काम करून आर्थिक गरजा आणि उपलब्ध पर्याय यांची सांगड घालतो.

म्युच्युअल फंड वितरकांसाठी नियमनाची चौकट

म्युच्युअल फंड वितरकांसाठी नियम प्रामुख्याने भांडवली बाजार नियामक ‘सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया’ (सेबी) आणि ‘अॅम्फी’ हे संयुक्तरीत्या हाताळतात. या दोन्ही संस्था खात्री करतात की वितरक व्यावसायिक नीतिमत्तेचे पालन करीत आहे. वितरकांना एक आचारसंहिता लागू केली असून या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही याची तपासणी ‘अॅम्फी’ करते. म्युच्युअल फंड वितरण व्यवसायात उतरण्यापूर्वीची पहिली पायरी म्हणजे अर्हता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आणि ‘तुमच्या वितरकाला जाणून घ्या’साठी नोंदणी पूर्ण करणे. यासाठी किमान शैक्षणिक पात्रता त्यानंतर एनआयएसएम-व्ही-आय म्युच्युअल फंड वितरण प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

नैतिक आचरणांसाठी वितरकांसाठी आचारसंहिता

म्युच्युअल फंड वितरकांनी ‘अॅम्फी’ आणि ‘सेबी’ने तयार केलेल्या कठोर आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. ही आचारसंहिता गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी योग्य गुंतवणूक प्रक्रिया सुनिश्चित करते आणि कोणतीही अनुचित घटना घडल्यास गुंतवणूकदारांच्या संरक्षणाचा एक पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते. या आचारसंहितेच्या मुख्य बाबी पुढीलप्रमाणे आहेत –

गुंतवणूकदार जाणून घ्या

म्युच्युअल फंड वितरकांनी ‘केवायसी’चे तपशीलवार पालन करणे आवश्यक आहे. जे गुंतवणूकदारांबद्दल अधिक आवश्यक आर्थिक माहिती, त्यांची पार्श्वभूमी आणि इतर घटक जसे की जोखीम सहनशीलता तपासणे आवश्यक आहे.

पारदर्शकता

वितरकाला त्यांच्या ग्राहकांसोबत विश्वास आणि पारदर्शकता राखणे आवश्यक आहे. विशेषत: शिफारस केलेल्या म्युच्युअल फंड योजनांबद्दल सर्व माहिती, शुल्क, संभाव्य जोखीम आणि एकूण योजनेच्या कामगिरीबद्दल. या प्रकारची पारदर्शकता राखल्याने गुंतवणूकदारांना वितरकांवर विश्वास ठेवण्यास आणि नंतरचे निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.

सुयोग्यतेवर लक्ष केंद्रित करा

वितरकाने ‘कमिशन’च्या दृष्टिकोनातून नव्हे तर योग्यतेच्या दृष्टिकोनातून गुंतवणूक विकल्पांना प्राधान्य देण्यास वितरक बांधील आहेत. त्यांचे दायित्व समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी गुंतवणूकदारांच्या आर्थिक उद्दिष्टांशी साधर्म्य राखणाऱ्या फंडांची निवड करणे आवश्यक आहे, केवळ जास्त ‘कमिशन’ मिळविण्यासाठी त्यांनी शिफारस करू नये.

अलीकडील घडामोडींबाबत अद्ययावतता

म्युच्युअल फंड वितरकांना नवीन नियम आणि कायदे याबाबत अद्ययावत राहण्यासाठी सतत व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आवश्यक असते. शिवाय, वितरक सर्व नियमांचे पालन करतात याची खात्री करण्यासाठी ‘सेबी’कडून नियमित लेखपरीक्षण केले जाते.

या चार पैलूंव्यतिरिक्त, वितरकांना आदर्श आचारसंहिता पाळण्याच्या दृष्टीने एक चौकट आखली असून वर उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी खूप मोठी भूमिका बजावतात आणि वितरकाच्या निर्णय क्षमतेवर आणि गुंतवणूकदारांना मिळणाऱ्या सेवा (प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी लागणारा तपशील, गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर गुंतवणूक वारसांच्या नावावर करावयाची औपचारिकता) आणि योग्य गुंतवणूक पर्यायांवर लक्षणीय परिणाम करतात.
नोंदणीकृत आणि पात्र वितरक असण्याचे फायदे

वर वर्णन केलेल्या माहितीवरून, अनेक घटक तुम्हाला योग्य वितरक शोधण्यास मदत करतात. www.amfiindia.com/locate-your-nearest-mutual-fund-distributor-details या ठिकाणी तुम्ही तुमच्या पिनकोडनुसार स्थानिक वितरकाचा शोध घेऊ शकता. प्रत्येक वितरकाला एक एआरएन (अॅम्फी रजिस्ट्रेशन नंबर) दिला असून त्या वितरकाची सत्यता पडताळून पाहू शकता. एक वितरक गुंतवणूक प्रक्रिया सुलभ करू शकतो तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे, व्यवहार आणि कोणत्याही ऑनलाइन मंचावरची औपचारिकता गुंतवणूकदारांचा वेळ आणि मेहनत वाचवू शकते. त्यांना जास्तीत जास्त सुविधा आणि अडथळ्याविना गुंतवणूक प्रक्रिया पार पाडू शकता. अनेक वितरक गुंतवणूकदारांच्या विशिष्ट उद्दिष्टांवर आणि जोखीम सहिष्णुतेवर आधारित गुंतवणुकीच्या शिफारशी तयार करून गुंतवणुकीचे वैयक्तिकीकारण करतात. हे गुंतवणूकदारांना त्यांचे पोर्टफोलिओ त्यांच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार तयार करण्याचा मार्ग अनुसरतात. बहुतेक वितरकांकडे सखोल ज्ञान असते, मग ते म्युच्युअल फंड उत्पादने, व्यापक आर्थिक बाजारपेठा याबाबत त्यांच्या ज्ञानामुळे, त्यांच्याकडे असलेल्या उपलब्ध माहितीनुसार गुंतवणुकीच्या गुंतागुंतीची प्रक्रिया चुटकीसरशी पूर्ण करतात. ज्या गुंतवणूकदारांनी नियामक गरजा पूर्ण करणारा आणि अनुभवी वितरकांच्यामार्फत गुंतवणूक केली आहे, ते कठोर नियामक वातावरणात कार्य करतील हे लक्षात घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतात. अशा प्रकारे, ते गुंतवणूकदारांना त्यांचे वित्तीय ध्येय साध्य करण्यास मदत करतात. वितरक त्यांच्या क्षेत्रात पुरेसे प्रतिष्ठित आहेत, त्यांचा कार्य इतिहास सिद्ध आहे आणि त्यांच्या ग्राहकांकडून चांगली पुनरावलोकने मिळाली असतील, अशांची निवड करा.

भारतातील म्युच्युअल फंड वितरक बनणे ही सोपी गोष्ट नाही. वितरक गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांच्या गुंतागुंतीच्या जगात वित्तीय ध्येय साध्य करण्यासाठी त्यांचा सहभाग आवश्यक आहे. ‘सेबी’ आणि ‘अॅम्फी’द्वारे स्थापित केलेल्या कठोर नियमनाचे पालन करून, वितरक नैतिकता आणि पारदर्शकतेची उच्च मानके राखतात. एका प्रतिष्ठित वितरकामार्फत गुंतवणूक केली असता तुम्ही नक्की म्हणाल…

‘सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं!’

चांगला वितरक तुमच्यासोबत असणं हे सुखच असत.