श्रेयश्च प्रेयश्च मनुष्यमेतस्तौ सम्परीत्य विविनक्ति धीरः।
श्रेयो हि धीरोऽभि प्रेयसो वृणीते प्रेयो मन्दो योगक्शेमाद्वृणीते ॥ — श्रेयस आणि प्रेयस या संकल्पनेचा उगम कठोपनिषदाच्या या श्लोकातून झाला आहे. या जोड शब्दांचा अर्थ वाच्यार्थाने आणि लाक्षार्थाने ध्यानात घ्यायचे आहेत. श्रेयस हा शब्द ‘श्री’ या शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ झुकणे किंवा विश्रांती घेणे असा होतो. ‘श्री’ हा शब्द मूळचा आणखी एक परिचित शब्द आहे ज्याचा अर्थ प्रकाश, तेज, वैभव, कृपा, समृद्धी, श्रीमंती, असा होतो. देवी लक्ष्मीला ‘श्री’ (श्रीसुक्त) म्हणून ओळखले जाते. कारण ती आश्रय आणि आधार आहे सर्व अस्तित्वाचे; ती सौंदर्य आणि सुसंवादाची देवी आहे. प्रत्येकामध्ये चैतन्याचा साक्षात्कार घडवून आणणारे ज्ञान प्राप्त करणे हा श्रीविद्येचा उद्देश आहे. गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस याचा मला अभिप्रेत असणारा वाच्यार्थाने आनंददायक तर लाक्षार्थाने कल्याणकारण असा आहे. उदाहरण द्यायचे तर, स्मॉलकॅप फंडातील गुंतवणूक ही गुंतवणूकदाराला आनंददायक वाटत असली तरी कल्याणकारक नाही. स्मॉलकॅप हे सर्वात अस्थिर आणि म्हणूनच सर्वात जास्त परतावा देणारे आहेत. परंतु १० वर्षातील स्मॉलकॅप आणि लार्जकॅप फंडांनी देलेल्या परताव्याचा विचार केल्यास जोखीम संयोजक परतावा लार्जकॅपपेक्षा खूप जास्त नाही. माणूस अनेकदा आयुष्यात अशा टप्प्यावर उभा असतो, जिथून दोन मार्ग फुटतात. माणसाला अनेकदा दोन किंवा अधिक पर्यायातून निवड करावी लागते. अशी निवड करत असताना एखादा पर्याय आनंददायक तर दुसरा कल्याणकारक असतो. आनंददायक मार्ग कल्याणकारक असेलच असे नाही. गुंतवणूकदारांना अशा प्रसंगी दोन्हीमधला फरक ध्यानात घेऊन कठीण पण कल्याणकारक मार्ग निवडण्यास सक्षम करणारे हे सदर असेल.
जीवनात यशस्वी झालेले लोक असा सल्ला देतात की, नवउद्योजकाने पहिले हजार दिवस कष्ट केले तर तो त्या व्यवसायात यशस्वी होतो. परंतु जी व्यक्ती या हजार दिवसांत मालकी उपभोगतो, त्याला व्यवसायात यशस्वी होण्यात अधिक वेळ लागतो. अधिक कष्टाचा मार्ग निवडल्याने दीर्घकालीन उत्तम फळ मिळते तर त्याच वेळी कमी कष्टाचा सुखकर मार्ग स्वीकारल्यास तेच फलित लांबते. गुंतवणूक असो किंवा संपत्तीची निर्मिती करताना हेच तत्त्व सगळीकडे लागू होते. तात्त्विकदृष्ट्या पाहायचे झाल्यास प्रेयस हे क्षणिक सुख आहे तर श्रेयस हे अंतिम किंवा शाश्वत सत्य आहे.
हेही वाचा – धन जोडावे : शेअर बाजारात अस्थिरतेची नांदी?
तुम्ही म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत असल्यास, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये लार्ज, मिड किंवा स्मॉलकॅप फंडांची मात्रा किती निश्चित करता यावर परतावा आणि अस्थिरता यावर बरेच काही अवलंबून असते. अनेक वर्षांच्या अनुभवाने असे सांगता येईल की, तुमची जोखीम घेण्याची क्षमता कितीही जास्त असली तरी पोर्टफोलिओ हा लार्जकॅप केंद्रित असावा. वर्ष २०२४ मध्ये लार्ज-कॅप इक्विटी निर्देशांकाने १५.६४ टक्के (‘निफ्टी १०० टीआरआय’) परतावा दिला. तर मिडकॅप निर्देशांकाने (‘निफ्टी मिडकॅप १५०टीआरआय’) २५.८३ टक्के, तर स्मॉलकॅप निर्देशांकाने (‘निफ्टी स्मॉलकॅप २५० टीआरआय’) ०.०१टक्के परतावा दिला आहे. सरलेल्या वर्षाच्या सुरुवातीला असणारा स्मॉलकॅप फंडांचा दबदबा सप्टेंबर २०२४ नंतर ओसरला. अस्थिरता ही बाजाराच्या पाचवीला पुजली आहे. या अस्थिरतेमुळे बाजार भांडवल घटते किंवा वाढते आणि त्यापरिणामी कंपनीचे वर्गीकरण देखील बदलते. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया (ॲम्फी) दर सहा महिन्यांनी ‘सेबी’च्या वर्गीकरणानुसार लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांची सुधारित यादी प्रसिद्ध करते. जानेवारी ते जून २०२४ च्या यादीनुसार, ५० हजार कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्या लार्जकॅप, ४९ हजार कोटी ते १७ हजार कोटींदरम्यान मिडकॅप, तर १७ हजार कोटींपेक्षा कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्या स्मॉलकॅप गटात मोडतात. बाजारभांडवल हे सूचिबद्ध कंपन्यांचे वर्गीकरण करण्यासाठी एक सोयीस्कर निकष असला तरी, ते व्यवसायाचा आकार, व्यवस्थापनाची गुणवत्ता यांचे मोजमाप नव्हे.
हेही वाचा – प्रतिशब्द : अशाश्वती मूर्तिमंत दिसू लागली!
तळाच्या लार्जकॅप कंपन्यांना आघाडीच्या मिडकॅप कंपन्या आणि तळाच्या मिडकॅप कंपन्यांना आघाडीच्या स्मॉलकॅप कंपन्या नेहमीच आव्हान देत असतात. बँकिंग, पोलाद, तेल आणि वायू यांसारख्या मोठ्या भांडवलाची आवश्यकता असलेल्या कंपन्या लार्जकॅपमध्येच आहेत. तर वाहनपूरक उत्पादने अभियांत्रिकी किंवा रसायने यांसारख्या क्षेत्रातील मोठ्या कंपन्या मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये आहेत. स्मॉलकॅपमध्ये मुख्यत्वे नव्याने विकसित होणारे उद्योग आहेत. मिड आणि स्मॉलकॅप गटात उत्तम व्यवस्थापन आणि वृद्धीक्षम कंपन्या मिळू शकतात. नवीन सुरू झालेल्या वर्षाची सर्वाधिक अस्थिर वर्ष अशी नोंद होईल, असे संकेत आहेत. या अस्थिरतेवर मात करण्यासाठी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी शक्यतो एकरकमी गुंतवणूक टाळायला हवी. मोठी रक्कम गुंतवताना ‘एसटीपी’चा अवलंब करावा. वर्षभरात १७-१८ मल्टीकॅप आणि फ्लेक्झीकॅप फंड, २-३ लार्जकॅप (फोकस्ड इक्विटी फंड धरून), ४-६ मिडकॅप आणि २-३ स्मॉलकॅप, एखाद दुसरा थीमॅटिक फंड आणि विशेष दखल घेण्याजोगा एनएफओ अशा फंडांचे विश्लेषण वाचकांना देण्याचा प्रयत्न या सदरातून करणार आहे. वाचकांनी गुंतवणुकीसाठी नीरक्षीर विवेकानुसार, या २२-२३ फंडांतून ४-५ फंडांची निवड करावी. वाचकांनी त्यांच्या पसंतीचे फंड जरूर कळवावेत. निकषात बसत असल्यास या फंडांचा नक्कीच विचार केला जाईल.
© The Indian Express (P) Ltd