• तृप्ती वैभव राणे

आजकालच्या सोशल मीडियाच्या युगात सगळं कसं एकमेकाला जोडलेलं आहे, एकाचा दुसऱ्यावर कसा, काय आणि किती परिणाम होऊ शकतो, याचा नुकताच मस्त अनुभव येऊन गेला. कुठे ती न्यूयॉर्कमधील हिंडेनबर्ग रिसर्च कंपनी, तिने केलेलं अदाणी समूहावरील संशोधन, त्यानुसार केलेले आरोप आणि त्या अनुषंगाने पुढे अदाणी समूहातील कंपन्यांच्या समभागांतील पडझड, अदाणी एंटरप्राइजचा ‘एफपीओ’ मागे घेतला जाणं, मग कंपनी आणि भारतीय वित्तीय संस्थांकडून दिली गेलेली स्पष्टीकरणे, पुढे ‘सेबी’ने घेतलेला पवित्रा आणि या सगळ्यामुळे आपल्या शेअर बाजारात चालू असलेला गोंधळ! या सर्वाचा परिणाम काय तर अगदी दोन आठवड्यांमध्ये गौतम अदाणी यांची निव्वळ मालमत्ता निम्म्याहून कमी झाली म्हणे आणि जगातील पहिल्या २० धनाढ्य लोकांच्या यादीतूनही ते बाहेर पडले…

सर्वसामान्य गुंतवणूदाराला समजणारसुद्धा नाही की हे सगळं कसं घडलं, पण घडलंय तर खरं! आणि या पुढे अशा प्रकारे आपल्या इतर कंपन्यांना त्रास होऊ शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आपल्या गुंतवणुकींना कुठून धोका निर्माण होऊन त्यातून किती काळ, किती नुकसान होऊ शकतं, याचा काहीच अंदाज बांधता येत नाही.

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त
jayant patil rahul narvekar
Video: “राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालय अजून विचार करतंय”, जयंत पाटील यांची टोलेबाजी!
Rock dove bird pune, Rock dove, Municipal Corporation pune, pune,
पुणे : पारव्यांना खाद्य टाकताय सावधान…! महापालिका वसूल करणार ‘एवढा’ दंड
bahujan vikas aghadi future in vasai virar after defeat all three candidates along with hitendra thakur
वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे भवितव्य काय?
swearing ceremony in Mumbai left many political workers across state despairing
यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशाचा मुहूर्त हुकल्याने महायुतीत अस्वस्थता

तुमचं या ‘VUCA World’मध्ये स्वागत आहे! V – Volatility (अस्थिरता), U – Uncertainty (अनिश्चितता), C – Complex (क्लिष्ट), A – Ambiguous (संदिग्द्ध). या सर्व गोष्टींपासून जेव्हा घटना तयार होतात, तेव्हा त्यांचे परिणाम काय होतील आणि त्यातून स्वतःला कसं बाहेर काढायचं हे समजण्यासाठी आपल्याला आपलं ज्ञान वाढवावं लागतं आणि आपली प्रगल्भता वरच्या पातळीवर न्यावी लागते.

या लेखाचा रोख हा येणाऱ्या काळातील आव्हानांना सामोरं जाताना नक्की कशाकडे लक्ष ठेवावं लागेल आणि त्यातून कमीत कमी नुकसान, परवडणारी जोखीम आणि वाजवी परतावे मिळवून आपली आर्थिक ध्येये साधता येतील याकडे आहे. जागतिकीकरणाचे जेवढे फायदे आहेत, तितकेच त्याने धोकेसुद्धा उभारून ठेवले आहेत. आज जगाच्या एका कोपऱ्यातील बातमी अगदी काही सेकंदांत दुसऱ्या कोपऱ्यात पोहोचते, मशीन तुमचे शेअर घ्यायचे आणि विकायचे निर्णय घेते, माणसांबरोबर संवाद न साधता आता आपण चॅट-बॉट्सशी बोलतो, काही क्लिक्समध्ये कोट्यवधींचे व्यवहार होतात ही त्यातलीच काही उदाहरणं. सगळं कसं एका मोठ्या जाळ्यात असल्यासारखं वाटतं. जोवर सगळं सुरळीत चालू आहे तोवर ठीक, परंतु जेव्हा एखादी युद्धसदृश परिस्थिती निर्माण होते किंवा भू-राजनैतिक समीकरणं बदलतात, सत्तांतर घडतं तेव्हा कल्पनाही करता येणार नाही, त्याप्रकारे पैसा आणि संसाधनं आपली दिशा बदलताना दिसतात. तेव्हा भल्याभल्यांना ही परिस्थिती नमवते, अगदी एखादा खूप उन्हाळे-पावसाळे बघितलेला तज्ज्ञसुद्धा योग्य अंदाज बांधू शकत नाही, असं काहीसं घडतं.

आपल्या शेअर बाजाराकडे जर या दृष्टिकोनातून पाहायचं झालं तर मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत बऱ्यापैकी वरच्या दिशेचा प्रवास होता. त्यानंतर एक ब्रेक लागला आणि बाजार खाली आला. पुन्हा पुढे जानेवारी २०२२ मध्ये परत बाजार वर, मग मार्च २०२२ मध्ये खाली, परत अगदी काहीच दिवसांत एप्रिल २०२२ मध्ये वर, जून २०२२ मध्ये खाली, परत ऑगस्ट व सप्टेंबर २०२२ मध्ये वर आणि डिसेंबरमध्ये तर नवीन उच्चांक गाठला गेला. परंतु त्यानंतर परत काही त्याची वर जायची हिंमत होत नाहीये आणि जरी डिसेंबरमध्ये नवीन मजल मारली, तरीसुद्धा आधीसारखे परतावे काही मिळाले नाहीत, ना काही कंपन्यांचे शेअर आधीसारखे वाढले ना सरसकट सगळा बाजार वधारला.

वाढती महागाई, कच्च्या मालाची टंचाई, पुरवठा साखळीत व्यत्यय, तेलाच्या किमती आणि बिघडलेले भू-राजकारण, या सगळ्यांनी मिळून अनेक अर्थव्यवस्थांचं कंबरडं मोडून काढलंय. काही काळाकरिता महागाईने आराम करायचा जरी म्हटला तरीसुद्धा यापुढे आपण निवांत राहू शकू, असं अजिबात वाटत नाही. मागच्या महिन्यात तब्बल तीन वर्षांनी चीन कोरोना निर्बंधांतून बाहेर पडला आणि आता तिथली जनता मागील तीन वर्षांचा वचपा काढतेय. तिथली मागणी आणि पुरवठा यामध्ये विसंगती आली की त्याचे परिणाम हे सर्वत्र उमटणार. महागाई ही पुन्हा डोकं वर काढणार आहे. परत एकदा मध्यवर्ती बँकांसमोर यक्ष प्रश्न उभा राहणार आहे, तो म्हणजे व्याजदर वाढवायचे की कर्ज स्वस्त करून उत्पादक आणि जनतेला खर्चासाठी प्रोत्साहित करायचं. एकीकडे महागाई आणि दुसरीकडे कासवाच्या गतीने पुढे सरकणारी अर्थव्यवस्था म्हणजे गुंतवणूकदारांच्या डोक्याला तापच… कुठे पैसे घालू जेणेकरून मिळकत वाढेल, जोखीम कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्टफोलिओ व्यवस्थित राहील? हे सर्व खरंच शक्य होईल का? व्याजदर वर राहिले तरी पण कंपन्यांची मिळकत आणि निव्वळ नफा वाढणार का? जागतिक मंदीचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर नक्की किती काळ परिणाम राहणार? हे सगळे प्रश्न आपल्या सर्वांसमोर ठाम उभे आहेत.

येत्या काही महिन्यांमध्ये कोणतं चित्र नक्की समोर येणार हे माहीत नाही, परंतु एक गुंतवणूकदार म्हणून मला माझा पोर्टफोलिओ माझ्या गरजेसाठी सांभाळणं ही कळीची बाब आहे. तेव्हा या ‘VUCA’ परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी ‘VUCA’चीच मदत घेते आणि हा दुसरा ‘VUCA’ म्हणजे Vision (दूर दृष्टी ठेवणे), Unique (परिस्थितीनुसार आणि मनस्थितीनुसार उपाययोजना), Cohesive (संलग्न म्हणजेच कुठल्याही एकाच ठिकाणी लक्ष न ठेवता सर्वसमावेशक उपाययोजना) आणि Agility (चपळता बाळगणे).

आणि हे सर्व करण्यासाठी बरीच तयारी करावी लागते, बरं का?

१. गरजेची माहिती मिळवून त्या अनुषंगाने आपलं आर्थिक नियोजन आखून घ्या.
२. हा काळ अनाठायी जोखीम घेण्याचा नाहीये आणि म्हणून पोर्टफोलिओमधील जोखीम कशी कमी करता येईल यावर सतत लक्ष असू द्या.
३. बाजाराचा कल जाणून घ्या आणि त्यानुसार खरेदी आणि विक्री ठरवा.
४. मागील परतावे बघताना त्या गुंतवणुकीची जोखीमसुद्धा समजून घ्या. स्मॉल कॅपमध्ये पटापट पैसे वाढतात, पण ते केव्हा हे समजून घ्या.
५. कोणत्याही गुंतवणुकीचे परिमाण ठरवताना काळजी घ्या. १० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाण ठेवायच्या आधी आपले अंदाज नीट आहेत की नाही हे तपासून घ्या.
६. ‘फॅन्सी’ गुंतवणूक पर्यायांपासून लांब राहा.
७. येणाऱ्या काळातील महागाई कदाचित न भूतो प्रकारची असावी. तेव्हा पैसा जपून वापरा. खर्च वजा जाता वाचले तर चांगल्या प्रकारे त्यांना गुंतवा.
८. सेवानिवृत्त गुंतवणूकदारांनी स्वतःचा आर्थिक आराखडा मांडताना आरोग्यविषयक खर्चासाठी योग्य तरतूद करावी.
९. पोर्टफोलिओमध्ये समभाग, रोखे, सोने आणि स्थावर मालमत्ता यांचे परिमाण योग्य पद्धतीने जमवून घ्यावं, जेणेकरून जोखीम कमी होऊन, पोर्टफोलिओ फार खाली जाणार नाही.
१०. तरुण गुंतवणूकदारांनी पुढील ४-५ वर्षांमध्ये जमेल तितकी गुंतवणूक चांगल्या म्युच्युअल फंड किंवा समभागांमध्ये करावी. कितीही आव्हानं असली तरीसुद्धा भारतीय अर्थव्यवस्था ही येत्या काळात चांगले परतावे देऊ शकते.
११. समजून उमजून घेतलेले निर्णयसुद्धा कधी तरी चुकू शकतात. त्यावर जास्त वेळ वाया न घालवता सुधारात्मक क्रिया वेळेत करावी. आपल्या पैशाची ‘टाइम व्हॅल्यू’ समजली की आपण आपोआपच झालेल्या नुकसानातून लवकर बाहेर पडतो.
१२. स्त्री गुंतवणूकदारांनीसुद्धा आपल्या गुंतवणुकीबाबत संपूर्णपणे सजग राहायची वेळ आलेली आहे. आजकाल लग्न न करता राहणाऱ्या किंवा घटस्फोट झालेल्या तरुणींची संख्या वाढत चाललेली आहे. तेव्हा कायद्याचं ज्ञान असणं खूप महत्त्वाचं झालं आहे.
१३. पोर्टफोलिओला नियमित वेळ देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह व्यवस्थापनाचे फायदे हे वाढीव परताव्यातून किंवा कमी झालेल्या नुकसानातून लक्षात येतील.
१४. सल्लागाराकडे केव्हा जावं? आपल्याकडे ज्ञान कमी पडतंय, गुंतवणुकीकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये, कधी काय करायचं हे उमगत नाहीये, मोठी रक्कम मॅनेज करायची आहे, अनेक प्रकारच्या गुंतवणुकींचा गुंता झालेला तेव्हा सल्लागाराची मदत अत्यावश्यकच.
१५. सल्लागार आणि वितरक यांना कधी वापरायचं हे ठरवा, सल्लागार तुमच्याकडून फी घेतो, तर वितरक तुम्ही केलेल्या गुंतवणुकीमधून पैसे मिळवत असतात.
१६. कर नियोजन आणि गुंतवणूक व्यवस्थापन यांचा जरी एकमेकांशी संबंध असला तरीसुद्धा गुंतवणूक व्यवस्थापनाचा पसारा कर नियोजनापेक्षा जास्त आहे. भरपूर कर भरल्यानंतर सरकारकडून जरी प्रशस्तिपत्रक मिळालं तरीसुद्धा शेवटी पुरेसे पैसे प्रत्येक वेळी गाठीला असले तरच त्यांचा उपयोग. छोट्या प्रमाणातील गुंतवणुकीतून दोन आकडी परतावा जरी मिळाला तरीसुद्धा ठरवलेल्या ध्येयासाठी पैसे पुरतील का याची खातरजमा नक्की करावी.
१७. पोर्टफोलिओमध्ये विविधीकरण महत्त्वाचं आहे, परंतु ते किती, कधी आणि कोणत्या पर्यायातून करावं हे नीट समजून घ्यावं.
१८. वेळोवेळी नफा बुक करून कर्ज कमी केलं की कर्ज वेळेआधी फेडलं जातं आणि व्याजाचा खर्च कमी होतो.
१९.कधी काळी जर एखाद्या गुंतवणुकीत नुकसान झालंच तर त्यामुळे कुठे कर वाचेल का हे समजून घ्या.
२०. गुंतवणूक आणि तिचं व्यवस्थापन करताना सोपे पर्याय निवडा. जास्त क्लिष्ट काम करावं लागलं की कंटाळा येतो.

Story img Loader