मागील लेखामध्ये मी विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांबद्दल माहिती दिली होती. त्याला प्रतिसाद म्हणून मला अनेकांकडून चांगल्या प्रतिक्रिया आल्या. त्यात सर्वात जास्त भर होता तो म्हणजे ‘पोर्टफोलिओमध्ये नक्की किती फंड ठेवावेत?’ आणि ‘नफा कसा जोपासावा?’ या प्रश्नांवर. खरं सांगायचं तर पोर्टफोलिओच्या बांधणीनुसार त्याची जोखीम आणि परतावे ठरतात. शिवाय गुंतवणूकदार किती प्रमाणात त्याचा पोर्टफोलिओ सक्रिय पद्धतीने सांभाळतो त्यावरसुद्धा परतावे ठरतात. तर आजच्या लेखातून या दोन विषयांबद्दल चर्चा करू या.

आधी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक ही प्रत्येकाच्या जोखीम क्षमतेवर, गुंतवणूक कालावधीवर, बाजारातील परिस्थितीवर आणि परताव्याच्या अपेक्षेनुसार असते; परंतु सर्वसाधारणपणे ‘फ्लेक्सिकॅप फंड’ हे नियमित मासिक ‘एसआयपी’ गुंतवणुकीसाठी सर्वांना साजेसे असतात. जोखीम क्षमतेनुसार यांचे प्रमाण आपण ठरवू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर एखाद्या गुंतवणूकदाराला जर सुरुवात करायची असेल आणि जोखीम क्षमता चांगली व गुंतवणुकीचा कालावधी ५ वर्षांपेक्षा जास्त असेल तर मासिक गुंतवणुकीच्या ७५ ते ८० टक्के पैसा अशा प्रकारच्या फंडमध्ये गुंतवता येऊ शकेल. याव्यतिरिक्त येत्या काळात बाजारात कोणत्या प्रकारची गुंतवणूक चांगले परतावे देण्याची अपेक्षा आहे हे तपासल्यावर उरलेले २० ते २५ टक्के त्या प्रकारचे किंवा त्या सेक्टरच्या फंडामध्ये करता येऊ शकते.

Devendra Fadnavis claims that Ladaki Bahin Yojana will benefit everyone without discrimination
धर्मभेद न करता लाडकी बहीण योजनेचा सर्वांना लाभ; देवेंद्र फडणवीस यांचा दावा
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
Recruitment in town planning department
नोकरीची संधी : नगररचना विभागात भरती

आणखू वाचा-बचतीचे नियोजन आणि विमा कवच

जर जोखीम क्षमता कमी असेल किंवा गुंतवणूकदार नवीन असेल, तर त्याने ३० ते ४० टक्के इतक्याच प्रमाणात समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीची सुरुवात करून, मग पुढे हळूहळू हे प्रमाण वाढवावं. स्मॉल कॅप, मिड कॅप हे फंड जास्त जोखमीचे असून त्यातून परतावे जरी चांगले मिळत असले तरीसुद्धा अनेक वर्षे ते न वाढता राहू शकतात. शिवाय बाजार पडला की हे फंड जास्त पडतात आणि जर गुंतवणुकीमध्ये त्यांचं प्रमाण जास्त असेल तर पोर्टफोलिओचे परतावे खूप खाली येतात. तेव्हा अशा फंडामध्ये गुंतवणूक सुरू करताना जास्त जोखीम क्षमता असणाऱ्यांनी १० ते १५ टक्के पैसे इथे गुंतवावे आणि मग बाजाराचा कल बघून हे प्रमाण वाढवावं.

हे झालं ‘एसआयपी’बद्दल; परंतु जेव्हा जास्त पैसे एकाच वेळी गुंतवायचे असतात तेव्हा मात्र पोर्टफोलिओ बनवताना जास्त काळजी घ्यावी लागते. जर बाजार वर असेल आणि त्याच वेळी गुंतवणूक केली, तर लवकरच पोर्टफोलिओ खाली आलेला दिसेल. त्यातून जर गुंतवणूक क्षमता चांगली असेल तर ठीक, पण जर जोखीम क्षमता कमी असेल तर त्याच गुंतवणूकदाराला हे नुकसान पाहून मानसिक त्रास होऊ शकतो. मग अशा वेळी हळूहळू जोखीम वाढवावी. २५ ते ३० टक्के पैसे दैनंदिन ‘एसटीपी’ च्या (सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान) पद्धतीचा वापर करून गुंतवावे आणि हे साधारण चार ते सहा महिने बाजाराचा कल पाहून पैसे गुंतवावे. जर स्वतःला जमत नसतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा- मार्ग सुबत्तेचा: म्युच्युअल फंडांची सांगड घालताना…

आता वळू या परताव्यांकडे. आपण सगळेच परताव्यांसाठी गुंतवणूक करतो. जास्तीत जास्त परतावे मिळतील या अपेक्षेने आपल्यातील अनेक जण जास्त जोखीमसुद्धा घेतात; परंतु अनेक वेळेला हे लक्षात आलं आहे की, जास्त जोखीम घेऊनदेखील मनाजोगे परतावे मिळालेले नाहीत. या गोष्टीची प्रमुख कारणं दोन आहेत – चुकीच्या वेळी केलेली गुंतवणूक आणि वेळीच गुंतवणूक विकून फायदा न काढणं. हे एका उदाहरणातून आपण समजून घेऊ या. सर्वसामान्य गुंतवणूकदार मागील परतावे बघून बाजारात येताना दिसतो. बाजार वर जात असताना तो अधिकाधिक गुंतवणूक करतो. बाजाराच्या स्वभावानुसार तो खाली आला की, गुंतवणुकीमध्ये सुरुवातीला कमी आणि नंतर जास्त तोटा दिसू लागतो. मग अशा वेळी घाबरून अनेक गुंतवणूकदार उरलेली रक्कम काढून तोटा घेऊन बाजारातून बाहेर पडतात. याचीच उलट बाजू म्हणजे योग्य वेळी गुंतवणुकीतील नफा न काढणं. जेव्हा केलेली गुंतवणूक ही कमी वेळात भरपूर परतावे देत आहे हे दिसतं आणि येणाऱ्या काळात बाजार खाली यायचे संकेत मिळू लागले आहेत असं जेव्हा वाटतं तेव्हा आधी ५० टक्के गुंतवणूक विकून फायदा काढून घ्यावा. नंतर जर उरलेली गुंतवणूक अजून वधारली तर काही कालांतराने २५ टक्के रक्कम काढावी. उरलेली रक्कम तशीच ठेवून मग बाजार खाली आला आणि फंड चांगला असेल तर परत त्यात आधी काढलेले पैसे गुंतवावे किंवा नवीन पर्यायात गुंतवणूक करावी. खालील तक्त्यातून हे सर्व जरा जास्त स्पष्ट करता येईल:

गुंतवणूक काळ – गुंतवणूक रक्कम – आजचे गुंतवणूक मूल्य – सर्वाधिक मूल्य – सर्वात कमी मूल्य

१ वर्ष – १००,००० – १०३,८४७ – १०३,८४७ – ८६,९४७

३ वर्षे – १००,००० – २२८,२७१ – २३०,५४३ – १००,०००

५ वर्षे – १००,००० – २२९,६२३ – २३१,९०९ – ८९,८०१

एखादा सक्रिय गुंतवणूकदार बाजारभाव वर गेल्यास गुंतवणूक विकतो आणि बाजार खाली आल्यावर परत पैसे गुंतवतो. वरील उदाहरणासाठी मी एका फ्लेक्सिकॅप फंडाची निवड केलेली आहे आणि त्यात तीन कालावधींमध्ये गुंतवलेल्या रु. १ लाखाची वाढ आणि तोटा दोन्ही दाखवलेला आहे. वरील तक्त्यातून हे अगदी स्पष्ट होत आहे की, जेव्हा गुंतवणूक चांगली वाढते तेव्हा त्यातील काही पैसे काढून पुन्हा ती स्वस्त झाल्यास त्यात गुंतवल्याने फायदा वाढतो. हा नियम ‘एसआयपी’मधून जमवलेल्या गुंतवणुकीलासुद्धा लागू होतो.

आता जेव्हा नुकसान होत असेल तर काय करता येईल हे लक्षात घेऊ या. प्रत्येक गुंतवणूकदाराने पोर्टफोलिओची नुकसान मर्यादा (स्टॉप लॉस) आणि गुंतवणूक पर्यायाची नुकसान मर्यादा आधीच ठरवली की, हे काम थोडं सोप्पं होतं. जेव्हा सर्वच बाजार खाली येतो तेव्हा त्यामागील कारण समजून आणि नुकसानभरपाई कधीपर्यंत अपेक्षित आहे हे जाणून मग नुकसान सहन करून पोर्टफोलिओतील काही गुंतवणूक विकावी; परंतु जर एखादी विशिष्ट गुंतवणूक जर काही विशिष्ट कारणामुळे नुकसानदायी होत असेल, तर तिच्यातून मात्र पूर्णपणे बाहेर पडलेलं योग्य ठरेल. उदाहरण घ्यायचं तर काही कंपन्यांचे शेअर्स हे बाजार वर असताना खूप महागतात आणि त्यामागचं कारण स्पष्ट होत नसतं आणि एकदा का त्यांची घोडदौड संपली की, ते अनेक वर्षं काहीच करत नाही. मग अशा गुंतवणुकीतून परतावे मिळवताना फारच सजग राहावं लागतं. इथे चूक झाली की नुकसान भरून निघत नाही.

सरतेशेवटी एवढंच म्हणेन की, परतावे जरी बाजाराधीन असले तरीसुद्धा परतावे जोपासणं हे गुंतवणूकदाराच्या हातात आहे. योग्य ठिकाणी संयम आणि योग्य वेळी सक्रियता यांचा संगम जर साधला तर आपला पोर्टफोलिओ हा बहारदार होईल.

तृप्ती वैभव राणे
सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार
trupti_vrane@yahoo.com