आनंद म्हाप्रळकर
MUTUAL FUND: शेअर्स खरेदीमधला फायदा आणि धोका त्याचप्रमाणे एकंदरच म्युचुअल फंडांबद्दलची चर्चा आपण आजच्या लेखामध्ये करणार आहोत. आपण एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करतो तेव्हा आपली त्या कंपनीमध्ये भागीदारीच असते. त्या कंपनीने नफा कमावला तर आपला नफा आणि तोटा झाला तर आपलाही तोटाच, हे साहजिकच आहे. या धोक्याचे नियंत्रण आपण कसे करू शकतो तर हा धोका कमी करण्याकरिता आपण एकाच कंपनीचे शेअर्स घेण्यापेक्षा आपले पैसे दहा कंपन्यांमध्ये विभागले तर आपला धोका नक्कीच कमी होईल. पण, ही विभागणी कशा पद्धतीने करायला हवी? आपले पैसे नीट, वैविध्यपूर्ण गुंतवायचे असतील तर पहिल्यांदा वेगवेगळी क्षेत्रे निवडून काढावीत. उदा. फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, बँकिंग, एफएमसीजी आदी. त्यानंतर त्या क्षेत्रातल्या चांगल्या चालणाऱ्या कंपन्या शोधून त्यात पैसे गुंतवावेत.
याप्रमाणे आपल्याला नियोजन करायचे असेल तर ते वाटतं तितकं सोप्प नक्कीच नाही. त्यातही जर मला दरमहा माझ्या पगारातून काही रक्कम गुंतवायची असेल तर एवढ्या वैविध्यपूर्ण पद्धतीने गुंतवणूक करणे हे तुलनेने कठीण आहे. याकरिता म्युच्युअल फंड हे एक अत्यंत सुविधापूर्ण गुंतवणूक करायचे माध्यम आहे.
म्युच्युअल फंड म्हणजे काय?
म्युच्युअल फंड म्हणजे शेअर्स असाही काही जणांच्या मनात गैरसमज असतो. तुम्हाला दरमहा दहा हजार रुपये गुंतवणूक करायची आहे तर तुम्हाला वेगळ्या कंपन्यांचे शेअर्स घेणं शक्य होणार नाही. पण तुम्ही असे १०० लोक जमा केले आणि एकत्रित पैसे करून गुंतवणूक करायची असे ठरविले तर ते शक्य होईल. कारण आता १०० लोकांचे मिळून तुमच्याकडे दहा लाख रुपये जमा होतील. या पैशांची तुम्ही विभागणी करून वैविध्यतेने गुंतवणूक करू शकाल तर म्युच्युअल फंड अशाच पद्धतीने काम करतात. असंख्य लोकांकडून पैसे आल्यानंतर त्यांनी नेमलेल्या फंड मॅनेजरच्या विचारानुसार कोणत्या क्षेत्रात आणि कोणत्या कंपन्यांमधे पैसे गुंतवून त्याच्यातून जास्तीत जास्त चांगला परतावा मिळवून देऊ शकतो, त्याचा विचार करून म्युच्युअल फंडांकडून गुंतवणूक केली जाते. हे सारे काम ते आपल्यावतीने करत असल्याने आपल्याला त्यांना त्या कामाकरिता काही फी द्यावी लागते.
हेही वाचा… Money Mantra: वर्षभरात घसघशीत लाभ देणारा डिफेन्स मधला ‘हा’ शेअर पोर्टफोलिओत हवाच!
शेअर्स कंपन्यांकडे विश्लेषण करण्यासाठी मोठी टीम असते जी सामान्य व्यक्तीला न जमणारे असे काम शिस्तबद्ध पद्धतीने करत असते. त्यांच्याकडे सर्व शेअर्सची माहिती त्याच्या आजवरच्या इतिहासासह नोंद असते. त्या शेअरच्या वाटचालीचे विश्लेषण करून त्यानुसार म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा निर्णय घेतात. आपल्या अभ्यास करायला वेळ नसेल किंवा तणावमुक्त गुंतवणूक करायची असेल तर अशा वेळेस म्युच्युअल फंड हे आपल्यासाठी चांगले पर्याय ठरू शकतात. म्युच्युअल फंडांमध्ये विविध श्रेणीदेखील असतात आणि प्रत्येक कंपन्यांचे फंड मॅनेजर असतात. आपले गुंतवणुकीचे उद्दिष्ट काय आहे, त्यानुसार आपल्यासाठी योग्य कंपनी कुठली आणि श्रेणी कोणती निवडायची यासाठी आपण आर्थिक सल्लागाराकडून योग्य ते मार्गदर्शन घेवू शकतो. आता पुढच्या भागामध्ये म्युच्युअल फंडांच्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल चर्चा करू.