प्रश्न : आम्ही दोघे खासगी कंपनीत नोकरीला आहोत. आम्हाला एक वर्षाची मुलगी आहे. म्युच्युअल फंडात कर बचतीसाठीच गुंतवणूक केली जाते आणि आता नवीन प्राप्तिकर पद्धतीमुळे कर बचतीसाठी गुंतवणूक करायची गरज उरणार नाही. त्यामुळे आम्हाला दर महिन्याला पंधरा ते वीस हजार रुपये गुंतवता येतील. मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टीने गुंतवणूक कशी करता येईल? – समीक्षा आणि विराज

उत्तर : तुमच्या दोघांचेही वय आणि तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी लागणारा कालावधी याचा एकत्रित विचार करता तुम्हाला तीन पातळ्यांवर गुंतवणूक नियोजन करणे आवश्यक आहे. वय आता चाळिशीपलीकडे गेलेले असल्यामुळे गुंतवणूक करण्यासाठी मर्यादित कालावधी आहे. तुमच्या दोघांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या संपत्ती निर्मितीसाठी गुंतवणूक, तुमच्या मुलीच्या शिक्षणाच्या विविध टप्प्यांवर लागणाऱ्या पैशासाठी तरतूद करणे आणि तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणे असे मुद्दे तुम्हाला विचारात घ्यायचे आहेत.

पालकत्व निभावताना पैशाची गरज भासणे अगदीच स्वाभाविक आहे. त्यामुळे गुंतवणुकीसाठी तीन ते पाच फंडांची निवड करणे योग्य आहे. एखादा चांगला फ्लेक्झिकॅप फंड घेऊन त्यात ४,००० रुपयांची दर महिन्याची ‘एसआयपी’ केल्यास पंधरा वर्षांसाठी अशा फंडाचा विचार फायदेशीर ठरू शकतो. गेल्या पंधरा वर्षांचा विचार करता ‘फ्लेक्सिकॅप फंड’ आणि सरासरी १२ ते १४ टक्के परतावा दिला आहे. आपण १३ टक्के परतावा गृहीत धरला तरी वीस लाख रुपये एवढी रक्कम जमू शकते. तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी एक व विविध टप्प्यांवर लागणाऱ्या गरजांसाठी एक अशा दोन टप्प्यांत नियोजन करावे लागेल. तुमची मुलगी पाच वर्षाची झाल्यापासून दहा वर्षांची होईपर्यंत खर्च स्थिर नसतात. बऱ्याच वेळी आकस्मिक खर्च उद्भवतो. अशा वेळी पैशांची गरज लागते यासाठी मध्यम जोखीम असलेले हायब्रिड इक्विटी फंड हा पर्याय निवडता येईल.

हायब्रिड इक्विटी फंड म्हणजे समभागसंलग्न आणि निश्चित परतावा देणारे पर्याय अशा दोघांचा एकत्रित समावेश असलेली योजना असते. या योजनेत गुंतवणूक केल्यास त्याचा परतावा इक्विटी फंड इतका नसला, तरीही त्यातून बँकांच्या मुदत ठेवी व तत्सम पर्यायांपेक्षा जास्त परतावा नक्कीच मिळतो.

आपल्याला दर महिन्याला लागणाऱ्या खर्चासाठीच्या रकमेचा अंदाज तुम्ही दोघांनी बसून काढायला पाहिजे. नियमितपणे होणारे खर्च नोंदवून ठेवून त्याचा पक्का अंदाज आल्यावर सहा महिने पुरतील एवढ्या पैशाची एक गंगाजळी-राखीव निधी तयार करून तो रोखेसंलग्न फंडात (डेट फंड) गुंतवायचा. रोखे फंड हा तसा दुर्लक्षित पर्याय आहे. ज्याप्रमाणे आपण इक्विटी फंडात पैसे गुंतवले तर ते पैसे इक्विटी शेअरमध्ये गुंतले जातात. तसेच डेट फंडातील पैसे ‘फिक्स इन्कम सिक्युरिटी’ सरकारी व खासगी कंपन्यांच्या कर्जरोख्यांमध्ये गुंतवले जातात. यामध्ये परतावा हा मुख्य उद्देश नसून कमी पण स्थिर परतावा हा उद्देश असतो.

तुमची मुलगी अजून एक वर्षाची असल्याने तिच्या नावावर भारत सरकारच्या पोस्टाच्या सुकन्या समृद्धी योजनेत ज्याप्रमाणे पैसे गुंतवणे फायदेशीर ठरते, त्याचप्रमाणे काही निवडक फंड घराण्यांकडून लहान मुलांच्या शिक्षणासाठी वा भविष्यकालीन गुंतवणूक म्हणून उत्तम योजना आहेत, त्यांचा अवश्य विचार करावा.

तुमच्या मुलीचे पॅन कार्ड व आधार कार्ड अद्ययावत करून झाल्यावर तिच्या नावावरच गुंतवणूक करता येऊ शकते. आज-काल पाच वर्षे ते सात वर्षे वयोगटापर्यंत मुलींचा वाढदिवस साजरा केला जातो. जवळचे नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आप्तेष्ट यांच्याकडून रोख स्वरूपात बक्षीस शुभाशीर्वाद मिळतील असा आग्रह धरा. हा लोभी विचार नसून ‘अर्थ साक्षरतेचा’ मार्ग आहे हे लक्षात घ्या. तुमच्या मुलीला रोख स्वरूपात मिळालेले सर्व पैसे एकत्र करून मिडकॅप फंड योजनेत गुंतवा. सध्या बाजार दोलायमान स्थितीत असले तरीही मिडकॅप व स्मॉलकॅप फंड योजना मध्यम ते दीर्घकाळात कायमच फायदेशीर ठरतात. बाजारामध्ये मंदी आली किंवा बाजार कोसळले की, त्यानंतर मिडकॅप आणि स्मॉल कॅप हळूहळू वाढायला लागून ते झेप घेऊ लागतात.