सुधीर खोत
यश प्राप्तीसाठी खालील बाबी समजणे अत्यंत महत्त्वाचे.
आपण कुठे आहोत? आपल्याला कुठे जायचे आहे? प्रवासामध्ये कोण कोणत्या स्टॉप वर थांबायचे आहे. जर या बाबतीत माहिती नसेल तर आपण नेहमीच anxiety मधे जगत राहतो. पुढे नक्की काय करायचे या बाबतीत नेहमीच संभ्रम राहतो.
जेव्हा गुंतवणूक करायची वेळ असते, तेव्हा असाच काही संभ्रम असतो. गुंतवणूक करायाल पाहिजे हा विचार आज जवळपास प्रत्येकजण करतोय. पण “कधी करावी?”, “कशासाठी करावी?”, आणि “किती वेळासाठी करावी?” हे प्रश्न अनेकांना सतावत असतात. त्यामुळे लोकांना गुंतवणुकीची दिशा व उद्दिष्ट याची काहीच कल्पना नसते. त्या गुंतवणुक किती वेळासाठी करायला पाहिजेत हे ठरलेले नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा लोक पैसे गुंतवतात पण त्यामधून ना योग्य परतावा मिळतो ना मानसिक समाधान!
टाईमलाईन का महत्त्वाची आहे?
जरा विचार करा की, तुम्ही प्रवास करताय पण तुम्हाला कुठे जायचे आहे, आत्ता तुम्ही कुठे पर्यंत पोचला आहात, याची काहीही कल्पना नाही. त्यामुळे मनामध्ये खूपच गोंधळ सुरू राहतो. या साठी एकच योग्य उपाय असतो की तुमची सध्याची परिस्थिती आणि कुठे जायचे आहे याची पूर्ण कल्पना तुम्हाला पाहिजे. जेव्हा आपण उद्दिष्ट आणि टाईमलाइन न ठरवता गुंतवणूक करतो, त्या वेळी बहुतांश लोक असेच गोंधळलेल्या परिस्थितीत राहतात. म्हणून तुमची Financial Timeline तुम्हाला पक्की माहिती असायलाच पाहिजे.
फायनान्शिअल टाईमलाईन म्हणजे काय?
आज आपले जे काही वय आहे तिथून पुढील जीवनात आपल्या प्रत्येक आर्थिक उद्दिष्टासाठी लागणाऱ्या खर्च तसेच कालावधीचा विचार करुन त्या प्रमाणे प्लानिंग करणे, याला Financial Timeline असे म्हणता येईल.
आपल्या सर्वांच्या पुढील जीवनात काहीना काही गरज असतात. काही गरज अगदी पुढील १ ते ३ वर्षात लागतात, त्याला आपण short term गरज असे म्हणू शकतो. उदा. emergency fund, फॅमिली ट्रिप, कार डाउन पेमेंट. मध्यमकालीन गरजेसाठी म्हणजे पुढील ४ ते ५ वर्षासाठी लागणाऱ्या खर्चाचे नियोजन. या मधे मुलांचे शिक्षण, घर दुरुस्ती इत्यादी अनेक गोष्टी असू शकतात. कर्जाचे नियोजन करणे ही पण अत्यंत महत्त्वाची गरज टाइम लाइनमध्ये असणे महत्त्वाचे आहे. जेव्हा १० वर्षापुढील गरजांचे नियोजन असते त्या वेळ त्याला दीर्घकालीन गुंतवणूक करायाची गरज असते.
फायनान्शिअल टाइम लाइन कशी बनवायची?
ही फायनान्शिअल टाइम लाइन बनवणे एकदम सोपे आहे. एक कागत पेन घ्या. त्यावर एक रेष मारा. अगदी डाव्या बाजूला तुमचे सध्याचे वय लिहा. शेवटच्या बाजूला साधारण ८० वर्ष असे लिहा (कारण आपली life expectancy साधारण ७५ ते ८० वर्ष आहे). आता डावीकडून प्रवास सुरू होतो व ज्या ठिकाणी तुम्हाला पैशांची गरज आहे हे लक्षात येते, तिथे ती गरज मांडून ठेवा. उदा. जर तुमची ३० वर्षाचे आहात आणि तुम्हाला वय वर्षे ६० ला निवृत्त व्हायचे आहे तेव्हा, त्या टाइम लाइनवर ६० लिहून तिथे रिटायरमेंट म्हणून लिहा. अशाप्रकारे, इतर गरजांची नोंदणी करणे महत्त्वाचे आहे.
गुंतवणुकीसाठी काही मूलभूत संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे.
Financial Timeline बनवताना खालील सर्व गोष्टी समजून घेवून त्याची योग्य प्रकारे समगड घालणे महत्त्वाचे.
महागाई (Inflation):
महागाईमुळे पैशाची किंमत म्हणजेच खरेदीशक्ती कमी होते.
उदाहरण: १९९६ मधे सोने ४००० रुपये तोळा, होते तेच आज ९०००० रुपये तोळा आहे. आपण म्हणतो की सोने महाग झाले. पण खरे बघायला गेले तर, आपल्या पैशाची किंमत कमी झाली.
रिअल रेट ऑफ रिटर्न (Real Return):
तुम्हाला तुमची Financial Timeline योग्य करायची असेल तर तुम्ही केलेल्या गुंतवणूक मधून positive real rate of return मिळवता आला पाहिजे. उदा. १०% परतावा – ६% महागाई = ४% खरी वाढ.
फ्युचर व्हॅल्यू (Future Value):
आज गुंतवलेले पैसे भविष्यात किती होतील याचा अंदाज.
उदाहरण: ₹१,००,००० गुंतवून १० वर्षांनी ₹२,१५,८९२ (८% दराने).
प्रेझेंट व्हॅल्यू (Present Value):
भविष्यातील गरज भागवण्यासाठी आज किती गुंतवणूक लागेल.
उदाहरण: ५ लाख हवेत ५ वर्षांनी, तर आज ₹३,१०,४६१ गुंतवा (१०% दराने).
डिस्काउंटेड व्हॅल्यू:
भविष्यात मिळणाऱ्या रकमांचे आजचे मूल्य. या मुळे आपल्याला व्यवसाय आणि गुंतवणुकी मधून भविष्यात मिळणारा पैसा आज त्याची किंमत किती हे समजते. उगाचच मोठे आकडे बघून हुरळून न जाता याचा अभ्यास करणे हे अत्यंत महत्त्वाचे.
हा लेख संपवताना सर्व वाचकांना काही ठळक बाबी सांगणे मला महत्त्वाचे वाटते-
१. वेळेचा योग्य वापर म्हणजेच आर्थिक यश मिळण्याची खात्री.
२. कुठे गुंतवायचं?” या प्रश्नाइतकाच “कधी गुंतवायचं?” हाही प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे.
३. तुमचं प्रत्येक उद्दिष्ट वेळेनुसार ठरवा आणि त्यानुसार गुंतवणूक निवडा.
४. वेळेवर गुंतवणूक केल्यास तुम्ही भावनिक निर्णय न घेता योजनेनुसार संपत्ती तयार करू शकता.
पैशाचं खऱ्या अर्थाने मूल्य ‘वेळ’ ठरवत असतो. म्हणूनच — गुंतवणुकीपूर्वी वेळ ठरवा, उद्दिष्ट ठरवा आणि मगच पुढे जा.
सुरुवात आजच करा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही!
-लेखक फायनान्शियल थेरपिस्ट असून फायनान्शियल फिटनेसचे संस्थापक आहेत