प्रवीण देशपांडे
जुलै हा प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याचा महिना आहे. पगारदार, निवृत्तिवेतन घेणारे, छोटे उद्योग-व्यवसाय करणारे (ज्यांच्या लेख्यांचे लेखापरीक्षण बंधनकारक नाही) यांच्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे विवरणपत्र ३१ जुलै, २०२३ पूर्वी दाखल करण्याची तरतूद आहे. या मुदतीत विवरणपत्र दाखल न केल्यास विलंब शुल्क, अतिरिक्त व्याज भरावे लागेल. शिवाय यावर्षीचा तोटा पुढील वर्षात ”कॅरी-फॉरवर्ड” करता येणार नाही.
प्राप्तिकर कायद्यानुसार, करदात्याने आपला देय कर हा आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी भरणे अपेक्षित आहे. करदात्याला कर हा प्रामुख्याने उद्गम कर (टीडीएस), गोळा केलेला कर (टीसीएस), अग्रिम कर आणि स्वःनिर्धारण कर याद्वारे भरावा लागतो. यातील उद्गम कर आणि गोळा केलेला कर हा करदात्याच्या वतीने भरला जातो. उदा. पगार देताना उद्गम कर कापला जातो आणि करदात्याच्या वतीने सरकारकडे जमा केला जातो किंवा परदेशी पैसे पाठविल्यास त्यावर बँक कर गोळा करून तो पैसे पाठविणाऱ्याच्या वतीने सरकारकडे जमा करते. अग्रिम कर आणि स्वःनिर्धारण कर मात्र करदात्याला स्वतः भरावा लागतो.
आणखी वाचा-Money Mantra: डिकॉय इफेक्ट खरेदी- विक्रीवर कसा परिणाम करतो?
उद्गम कर (टीडीएस) आणि गोळा केलेला कर (टीसीएस):
उद्गम कर कोणी किती कापावा?, कोणत्या उत्पन्नावर कापावा? यासाठी प्राप्तिकर कायद्यात तरतुदी आहेत. हे प्रामुख्याने उत्पन्नाच्या प्रकारावर अवलंबून असते. पगार या स्रोतातून मिळणारे उत्पन्न, घरभाडे उत्पन्न, व्याज, लाभांश, कंत्राटी देणी, व्यावसायिक देणी, बँकेतून पैसे काढल्यास इत्यादी उत्पन्नावर उद्गम कराच्या तरतुदी लागू होतात.
काही ठरावीक देण्यांवर कर गोळा केला जातो. उदा. १० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची गाडी खरेदी केल्यास गाडी विक्रेत्यास १ टक्के अधिक रक्कम खरेदी करणाऱ्याकडून वसूल करावी लागते. परदेशात पैसे पाठविल्यास ५ टक्के कर गोळा केला जातो. १ जुलै, २०२३ पासून शैक्षणिक आणि वैद्यकीय कारणाशिवाय परदेशात पैसे पाठविल्यास २० टक्के कर गोळा करण्याची तरतूद विद्यमान आर्थिक वर्षासाठी मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात होती. परंतु हा बदल आता १ ऑक्टोबर, २०२३ पासून लागू होणार आहे.
उद्गम कर किंवा गोळा केलेला कर करदाता आपल्या विवरणपत्रात दाखवून त्यावर्षीच्या करदाईत्वातून तो वजा करू शकतो किंवा करदाईत्व कमी असेल तर त्याचा परतावा विवरणपत्र दाखल करून घेऊ शकतो. हे सर्व कर करदात्याला फॉर्म २६ एएस आणि आता वार्षिक माहिती अहवाल (एआयएस) मध्ये दिसतात. करदात्याने नियमितपणे आपण भरलेला कर आणि आपल्या वतीने भरलेला कर या फॉर्ममध्ये दिसतो का? ते तपासून पहिले पाहिजे. हा कर फॉर्म २६ एएसमध्ये दिसला, तरच तो त्याच्या विवरणपत्रात दाखवू शकतो आणि आपल्या देय करातून वजा करू शकतो. कर कापणाऱ्याने किंवा गोळा करणाऱ्याने कर सरकारकडे जमा करून त्याने त्याचे विवरण भरले नसल्यास ते करदात्याच्या फॉर्म २६ एएस दिसणार नाही. असे झाल्यास कर कापणाऱ्याकडे पाठपुरवा करून त्याने कर भरून त्याचे विवरण दाखल केले आहे याची खात्री करावी. करदात्याने आपल्याला मिळालेल्या उत्पन्नावर उद्गम कर कापला आहे, हे तपासले पाहिजे.
आणखी वाचा-Money Mantra: भेट (गिफ्ट) देताना – घेताना प्राप्तिकर भरावा लागतो का?
करदात्याने कर कापणाऱ्याला किंवा गोळा करणाऱ्याला आपला पॅन देणे बंधनकारक आहे. हा पॅन दिला नसल्यास जास्त दराने उद्गम कर किंवा कर गोळा करण्याची तरतूद आहे.
अग्रिम कर:
ज्या करदात्यांचे अंदाजित करदाईत्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. अंदाजित करदाईत्व गणतांना उत्पन्नावरील उद्गम कर, गोळा केलेला कर वजा केल्यानंतर देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर अग्रिम कर भरावा लागतो. अग्रिम कर हा करदात्याचे अंदाजित उत्पन्न, वजावटी, उद्गम कर, वगैरे विचारात घेऊन गणावा लागतो आणि तो चार हफ्त्यात भरावा लागतो. पहिला हफ्ता एकूण कराच्या १५ टक्के, १५ जूनपूर्वी, दुसरा हफ्ता एकूण कराच्या ४५ टक्के, १५ सप्टेंबरपूर्वी, तिसरा हफ्ता एकूण कराच्या ७५ टक्के, १५ डिसेंबरपूर्वी आणि चौथा हफ्ता १०० टक्के, १५ मार्चपूर्वी भरता येतो. ३१ मार्चपूर्वी भरलेली रक्कम अग्रिम कर म्हणून समजली जाते. म्हणजेच २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा अग्रिम कर ३१ मार्च, २०२३ पूर्वी भरला पाहिजे. निवासी ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या उत्पन्नात धंदा-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही, अशांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यांनी त्यांचा देय कर ३१ जुलैपूर्वी भरला तरी त्यांना व्याज भरावे लागत नाही. करदाता अनुमानित कराच्या योजनेचा लाभ घेणार असेल, म्हणजेच कलम ४४एडी किंवा ४४ एडीएनुसार अनुमानित कर भरण्यासाठी पात्र असेल आणि या कलमांतर्गत कर भरत असेल तर अशा करदात्यांनी संपूर्ण देय कर १५ मार्च, २०२३ पूर्वी भरला असला पाहिजे. या अग्रिम कराचा तपशील करदात्याला विवरणपत्रात दाखवावा लागतो.
स्वःनिर्धारण कर:
उद्गम कर, गोळा केलेला कर, अग्रिम कर भरल्यानंतरसुद्धा करदात्याला कर देय असेल तर तो विवरणपत्र भरण्यापूर्वी बाकी कर भरू शकतो. उद्गम कर किंवा गोळा केलेला कर हा ठरावीक दराने कापला किंवा वसूल केला जातो आणि अग्रिम कर अंदाजित उत्पन्नावर गणला जातो. परंतु जेव्हा करदाता प्रत्यक्ष उत्पन्न, वजावटीनुसार करदाईत्व गणतो, तेव्हा ते भरलेल्या करापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. कमी असल्यास त्याला कर भरावा लागू शकतो किंवा कर जास्त भरला गेला असेल तर त्याला परताव्याचा दावा विवरणपत्र दाखल करून करता येतो. नुकतेच ऑनलाइन कर भरण्याच्या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. पूर्वी एनएसडीएलच्या संकेतस्थळावर कर भरता येत होता. आता करदात्याला प्राप्तिकर खात्याच्या संकेतस्थळावर त्याच्या पॅनवर लॉगइन करून कर भरावा लागेल.
आणखी वाचा-Money Mantra : आयटीआर १ फॉर्म कोण वापरू शकतो? प्राप्तिकर रिटर्न भरण्यापूर्वी योग्य फॉर्म जाणून घ्या
व्याज:
अग्रिम कर न भरल्यास किंवा एकूण कराच्या ९० टक्केपेक्षा कमी कर अग्रिम कर म्हणून भरल्यास करदात्याला १ एप्रिलपासून कर भरलेल्या महिन्यापर्यंत देय कराच्या दरमहा १ टक्के दराने व्याज कलम २३४ बीनुसार भरावे लागते. अग्रिम कराचे हफ्ते कमी भरल्यास किंवा मुदतीनंतर भरल्यास ३१ मार्चपर्यंत दरमहा १ टक्के दराने कलम २३४ सीनुसार व्याज भरावे लागते. करदात्याने विवरणपत्र मुदतीनंतर दाखल केल्यास वरील व्याजाव्यतिरिक्त कलम २३४ एनुसार मुदत संपल्यानंतरच्या महिन्यानंतर विवरणपत्र भरण्याच्या महिन्यापर्यंत देय करावर दरमहा १ टक्के दराने व्याज भरावे लागते. हे व्याज महिन्यासाठी आहे. उदा. करदात्याने १ ऑगस्ट, २०२३ रोजी विवरणपत्र दाखल केल्यास (म्हणजेच फक्त १ दिवस उशिरा दाखल केल्यास) वरील सर्व व्याज पूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी भरावे लागते. करदात्याला आपल्या विवरणपत्रात आपला देय कर आणि त्यावर व्याज देय असेल तर, ते योग्य सदरात दाखवावे लागते.
करदात्याने विवरणपत्र भरण्यापूर्वी देय कर आणि व्याज भरणे अपेक्षित आहे. करदात्याने देय कर किंवा व्याज न भरल्यास तो करदाता दोषी समजला जातो.
pravindeshpande1966@gmail.com