गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे टोरेस या कंपनीने गुंतवणूकदारांना घातलेला गंडा होय. गुंतवणूक करणे आणि कष्टाने कमावलेल्या पैशाचा आपल्याला योग्य वेळी फायदा व्हावा यासाठी त्याचा मेंदू जागृत ठेवून विचार करणे हे महत्त्वाचे आहे हे लक्षात ठेवायला हवे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढील गुंतवणुकीचे ११ नियम तुम्ही लक्षात ठेवलेत तर तुमची भविष्यात फसवणूक होणार नाही किंवा किमान आपली फसवणूक होते आहे याचा अंदाज तरी यायला लागेल.

१- आपण पैसे गुंतवत असलेली व्यक्ती नसून ती रिझर्व्ह बँक, भारत सरकार, सेबी यांच्याकडून परवाना घेतलेली अधिकृत कंपनी आहे याची खात्री झाल्याशिवाय गुंतवणूक करायची नाही. कंपनीकडे भिंतीवर लटकवलेली सर्टिफिकेट असतात त्यापेक्षा रिझर्व्ह बॅंक किंवा सेबीकडे कंपनीची बँक किंवा नॉन बँकिंग फायनान्स कंपनी (एनबीएफसी) म्हणून नोंदणी झाली आहे का याची खात्री करून घ्यावी.

२-गुंतवणूक करताना किती महिन्यासाठी पैसे गुंतवायचे आहेत व त्यावर किती व्याज मिळणार आहे ? हे पाहण्याऐवजी त्या कंपनीचे मागच्या तीन ते पाच वर्षाचे नफ्याचे आकडे किती आहेत ? ते तपासून घ्यावे. पावसाळ्यात हंगामी उगवलेल्या फुलांसारखी ही कंपनी नाही ना ? याचा अंदाज घ्यावा.

हेही वाचा : फंड जिज्ञासा – ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती

३- सरकारी बँका, पोस्ट ऑफिस यांच्या योजनांमध्ये पैसे गुंतवल्यास किती टक्के व्याज मिळते याचा आधी अंदाज घ्या, त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट व्याजाचे आमिष तुम्हाला दाखवले जात असेल तर त्यात सरळ सरळ धोका आहे हे ओळखा.

४- पैसे गुंतवणे आणि मार्केटिंग कंपन्यांमध्ये एका नेटवर्कचा भाग होणे या संपूर्णतः वेगळ्या बाबी आहेत. आमच्या कंपनीची मेंबरशिप घ्या आणि त्यानंतर जसे तुम्ही अधिकाधिक सदस्य आणाल त्यावरून तुम्हाला अधिकाधिक रिटर्न्स मिळतील असे सांगितले जाणे ही फसवणुकीची पहिली पातळी आहे.

५- आपण गुंतवणूक करतो म्हणजे फक्त गुंतवणूक करणे अपेक्षित आहे आपणच मेंबर गोळा करत फिरणे हा गुंतवणुकीचा प्रकार नाही.

६- गुंतवणुकीसाठी वापरलेला पैसा हा स्वतः कमावलेला असणे अत्यावश्यक आहे. चांगला रिटर्न देणारा एखादा पर्याय समोर दिसला म्हणून इतरांकडून उधारीवर पैसे घेणे आपण घेतलेल्या रियल इस्टेट विकून, सोने विकून त्यातून आलेल्या पैशातून गुंतवणूक करणे हा राजमार्ग नाही.

७- आपले पैसे दुसऱ्याच्या खात्यावर जमा करून तुमच्या वतीने त्याला शेअर्स विकत घ्यायला सांगू नका किंवा तशी परवानगी देऊ नका.

८-तुमच्या परिचयातील एखाद्या व्यक्तीने अचानकपणे गाडी, महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे विकत घेतली असे लक्षात आले, छोट्या घरात राहणारी व्यक्ती अचानकपणे मोठ्या फ्लॅटमध्ये राहायला गेली म्हणजेच त्यांच्या जीवनशैलीमध्ये अचानक बदल झाला असे वाटले तर त्यांच्यापासून सावध राहायला हवे. ज्याप्रमाणे त्यांना फायदा झाला त्याप्रमाणे तुम्हालाही होईल असे आमिष दाखवून किंवा तुमच्यावर प्रभाव पाडून तुम्हाला जाळ्यात ओढले जाऊ शकते.

हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी ‘ईसॉप’ की ‘आरएसयू’ चांगले?

९- तुम्ही एक दोन वर्षात रिटायर होणार असलात तर तुमच्याकडे गुंतवणुकीचे सल्ले घेऊन येणाऱ्यांकडे सेबीचे गुंतवणूक सल्लागार असल्याचे पत्र किंवा लायसन्स आहे का? हे स्पष्टपणे विचारा. सेवानिवृत्ती जवळ आलेल्या व्यक्तींकडे गाठीशी भरपूर पैसे असतात म्हणून त्यांना जाळ्यात उडण्याचा प्रयत्न केला जातो.

१०- तुम्हाला कौटुंबिक किंवा नातेवाईकांच्या कडून जमीन विक्री किंवा तत्सम व्यवहारातून पैसे आलेले असतील तर अशावेळी सावध असा, तुमचे पैसे कमी वेळात वाढवून देतो अशी प्रलोभने तुम्हाला दाखवली जाऊ शकतात.

११-दाम दुप्पट योजनांचा कावा ओळखा, आठ ते नऊ वर्षात पोस्ट आणि सरकारी बँकांमध्ये पैसे दुप्पट होत असताना एखादी कंपनी तुम्हाला दोन वर्षात ते पैसे कसे दुप्पट करून देईल ? हा साधा विचार करा.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to protect yourself from financial fraud like torres investment scam mmdc css