मोठ्या शहरात घराच्या वाढत्या किमती बघता गृहकर्जाशिवाय घर खरेदी करणे सर्वसामान्यांसाठी कठीण आहे. गृहकर्ज घेणे काही अंशी फायदेशीर पण आहे. आता गृह कर्ज मिळणे खूप सोपे झाले आहे. बँका, गृहकर्ज कंपन्या, वगैरे कर्ज देण्यासाठी सज्ज आहेत. प्रथम घर घेणारे, जुनं घर विकून मोठं घर घेणारे, नोकरी-व्यवसायानिमित्त दुसऱ्या शहरात स्थलांतरित होणारे, दुसरे घर म्हणजे “सेकंड होम” घेणारे, नवीन अद्ययावत सुविधांनी युक्त अशा “टॉवर” मध्ये घर घेणारे अशा अनेक कारणांनी घर घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
गृहकर्ज घेऊन नवीन घर घेतल्यास करदात्याला काय फायदे होतात हे जाणून घेतले पाहिजे. गृहकर्ज घेतल्यास करदात्याला प्राप्तिकर कायद्यात काही सवलती आहेत. या सवलती घेण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. अटींची पूर्तता न केल्यास करदात्याने घेतलेली वजावट नाकारली जाऊ शकते. करदात्याला त्यावर व्याज आणि दंड भरावा लागू शकतो. गृहकर्जावर करदात्याला प्रामुख्याने दोन वजावटी मिळतात. पहिली म्हणजे गृहकर्जावरील व्याजाची आणि दुसरी गृहकर्जावरील मुद्दल परतफेडीची. दोन्ही वजावटी घेण्यासाठी काय अटी आहेत आणि त्या कशा घेता येतात ते बघूया.
आणखी वाचा: Money Mantra: कंत्राटी आणि व्यावसायिक देण्यांवर किती टीडीएस बसतो?
गृहकर्जावरील व्याजाची वजावट
गृहकर्जावरील व्याजाची वजावट करदात्याकडे किती घरे आहेत?, घर भाड्याने दिले आहे का? यावर अवलंबून आहे. करदात्याच्या राहत्या घरावर घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीची मर्यादा २ लाख रुपये इतकी आहे (कर्ज १ एप्रिल, १९९९ पूर्वी घेतले असेल तर ३०,००० रुपये). करदात्याकडे दोन घरांपेक्षा जास्त घरे असतील आणि ती भाड्याने दिलेली नसतील तर तो कोणतीही दोन घरे “राहती घरे” म्हणून दाखवू शकतो.
काही वर्षांपूर्वी फक्त एकच घर “राहते घर” म्हणून दाखवता येत होते, अशा राहत्या घरांसाठी गृहकर्जाच्या व्याजाच्या वजावटीची मर्यादा २ लाख रुपये इतकी (कर्ज १ एप्रिल, १९९९ पूर्वी घेतले असेल तर ३०,००० रुपये) आहे. म्हणजे करदात्याकडे दोन पेक्षा जास्त घरे असतील आणि कोणतेही घर भाड्याने दिलेले नसेल तरी दोन पेक्षा जास्त घरे किंवा घर भाड्याने दिले आहे असे समजून घरभाडे उत्पन्न करपात्र उत्पन्नात गणून त्यावर कर भरावा लागतो. करदात्याने आपले घर किंवा घरे भाड्याने दिलेली असतील आणि त्या घरांवर गृहकर्ज घेतले असेल तर त्यांना ही २ लाख रुपयांची मर्यादा लागू नाही. त्यांना प्रत्यक्ष देय असलेल्या व्याजाची वजावट मिळते. उदा. करदात्याने घर भाड्याने दिले आहे त्यावर त्याला वार्षिक ४ लाख रुपयांचे घरभाडे मिळाले आणि या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जावर वार्षिक ५ लाख रुपये व्याज दिले तर करदात्याला संपूर्ण ५ लाख रुपयांची वजावट मिळते त्यासाठी ही २ लाख किंवा ३०,००० रुपयांची मर्यादा नाही.
आणखी वाचा: Money Mantra: घरभाड्यावर किती टीडीएस लागतो?
घरभाडे उत्पन्नातील तोटा
करदात्याकडे एकच घर असेल, ते भाड्याने दिलेले नसेल आणि त्या घरासाठी गृहकर्ज घेतले असेल तर त्या घराचे “घरभाडे उत्पन्न” शून्य समजले जाते. त्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जाची २ लाख रुपयांपर्यंतची वजावट करदाता घेऊ शकतो. ही वजावट घेतल्यानंतर करदात्याला जो तोटा होतो तो इतर उत्पन्नाच्या स्त्रोतातून वजा करता येतो. हा तोटा इतर उत्पन्नाच्या स्त्रोतातून वजा करण्यासाठी २ लाख रुपयांची मर्यादा आहे. उदा. एका करदात्याकडे दोन घरे आहेत. एक घर राहते आहे आणि दुसरे भाड्याने दिले आहे.
पहिल्या राहत्या घराच्या खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जावर या वर्षी २,५०,००० रुपये घरभाडे दिले आणि दुसऱ्या भाड्याने दिलेल्या घराच्या खरेदीसाठी घेतलेल्या गृहकर्जावर ५ लाख रुपये व्याज दिले या भाड्याने दिलेल्या घरावर त्याला २ लाख रुपये घरभाडे मिळाले. पहिल्या घरासाठी, ज्याचे “घरभाडे उत्पन्न” शून्य आहे, त्याला, व्याज जरी २,५०,००० रुपये दिले असले तरी. २ लाख रुपयांचीच वजावट मिळेल. जे घर भाड्याने दिलेले आहे त्याच्या संपूर्ण व्याजाची वजावट म्हणजे ५ लाख रुपयांची वजावट २ लाख रुपयाच्या उत्पन्नातून घेता येईल. या दोन्ही घराच्या संदर्भातील “घरभाडे उत्पन्नाचा” तोटा २ लाख रुपयांपेक्षा जास्त असला तरी फक्त २ लाख रुपयांचा तोटा इतर उत्पन्नातून वजा करता येतो. २ लाख रुपयांपेक्षा जास्त तोटा पुढील वर्षांसाठी कॅरी-फॉरवर्ड करता येतो आणि तो पुढील ८ वर्षात “घरभाडे” उत्पन्नातूनच वजा करता येतो.
गृहकर्जावरील व्याजाची अतिरिक्त वजावट
छोट्या घर खरेदी करणाऱ्यांसाठी प्राप्तिकर कायद्यात अतिरिक्त वजावट उत्पन्नातून घेण्याची तरतूद आहे. काही अटींची पूर्तता केल्यास करदात्याला वर सांगितल्याप्रमाणे २ लाख रुपयांची वजावट तर घेता येते शिवाय ८० ईई किंवा ८० ईईए या कलमानुसार अतिरिक्त वजावट सुद्धा घेता येते. ही वजावट कोणाला मिळू शकते हे जाणून घेतले पाहिजे. त्यासाठी अटी खालीलप्रमाणे :
ही वजावट फक्त वैयक्तिक करदात्यांनाच मिळू शकते,
करदात्याच्या नवीन घराचे कर्ज १ एप्रिल, २०१६ ते ३१ मार्च, २०१७ या कालावधीत मंजूर झाले असेल, कर्ज ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे, नवीन घराचे मूल्य ५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसले पाहिजे, करदात्याकडे कर्ज मंजूर होतेवेळी एकही घर नसले पाहिजे. या अटी मंजूर केल्यास करदात्याला कलम ८० ईई नुसार ५०,००० रुपयांची अतिरिक्त वजावट मिळू शकते.
करदात्याच्या नवीन घराचे कर्ज १ एप्रिल, २०१९ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत मंजूर झाले असेल, नवीन घराचे मूल्य (मुद्रांक शुल्कानुसार) ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसेल, करदात्याकडे कर्ज मंजूर होतेवेळी एकही घर नसेल, या सर्व अटींची पूर्तता केल्यास करदात्याला कलम ८० ईईए नुसार १,५०,००० रुपयांची अतिरिक्त वजावट मिळू शकते.
करदात्याने गृहकर्ज बँक, वित्तीय संस्था, गृहकर्ज कंपनी यांच्या कडूनच घेतले असले पाहिजे, नातेवाईक किंवा इतरांकडून घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची अशी “अतिरिक्त” वजावट करदाता घेऊ शकत नाही.
करदाता कलम ८० ईई नुसार वजावटीला पात्र असेल तर तो कलम ८० ईईए नुसार वजावट घेऊ शकत नाही.
परंतु करदाता कलम २४ आणि ८० ईई किंवा ८० ईईए (वरील अटींची पूर्तता केल्यास जी लागू असेल ती) या पैकी एक वजावट घेऊ शकतो. उदा. करदात्याने ४५ लाख रुपये मूल्याचे (मुद्रांक शुल्कानुसार) घर खरेदी केले, यासाठी करदात्याचे वित्तीय संस्थेकडून कर्ज १ एप्रिल, २०१९ ते ३१ मार्च, २०२२ या कालावधीत मंजूर झाले आहे, यावेळी करदात्याकडे एकही घर नाही आणि यासाठी त्याने ४० लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले. यावर त्याने २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३,७५,००० रुपयांचे व्याज भरले तर त्याला कलम २५ नुसार २ लाख रुपयांची वजावट आणि कलम ८० ईईए नुसार १,५०,००० रुपयांची वजावट अशी एकूण ३,५०,००० वजावट घेता येईल.
संयुक्त नावाने घर
करदात्याने घर आणि गृहकर्ज संयुक्त नावाने (जॉइंट) घेतल्यास प्रत्येकासाठी या तरतुदी लागू होतील. अशा वजावटी घेण्यासाठी घरामध्ये सह-मालक आणि गृहकर्ज सुद्धा सह-कर्जदार असणे गरजेचे आहे. त्यामुळे संयुक्त नावाने घर खरेदी करणे हे फायदेशीर आहे.