गुंतवणूक करणे जेवढे महत्त्वाचे तेवढेच आरोग्य विम्यासाठी दरवर्षी पैसे खर्च करणे महत्त्वाचे आहे. बदलती जीवनशैली, त्यामुळे उद्भवणारे आजार, धकाधकीच्या जीवनामुळे आकस्मिकरित्या होणारे आजार यामध्ये जर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हायची वेळ आली तर जीवन विमा निरुपयोगी ठरतो. त्यासाठी तुमच्याकडे आरोग्य विमा हवा.
आरोग्य विम्याचे विविध प्लॅन्स बाजारात उपलब्ध आहेत. हॉस्पिटलचे बिल भरताना क्लेम फॉर्म भरून तुम्हाला तुमच्या आरोग्य विम्यातून तुमच्या पॉलिसीनुसार पैसे मिळण्याची सोय असते. कॅशलेस मेडिकल इन्शुरन्स ही सुविधा तुमच्या पॉलिसीमध्ये असेल तर आधीच सर्व प्रक्रिया पूर्ण करून पैशाची तरतूद केली जाते. ऑपरेशन ठरवून करायचे असेल, म्हणजेच तातडीने करायला लागणार नसेल तर कंपनीला कळवून त्याप्रमाणे कागदपत्रांची कारवाई पूर्ण केली जाते. पण बऱ्याचदा आरोग्य विमा पुरेशा रकमेचा विकत घेतला जात नाही. फॅमिली फ्लोटर प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्स मध्ये समजा कुटुंबातील तीन सदस्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयाचे कव्हरेज मिळत असेल आणि तुमच्या कुटुंबातील कोणा एकाला दुर्दैवाने हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागले आणि त्याचा खर्च तीन लाखाच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला वरचे पैसे खिशातून द्यावे लागतात. बरं तुम्ही तीन लाखाची पॉलिसी घेतली आहे, असे म्हटल्यावर तुम्हाला सगळेच्या सगळे तीन लाख परत मिळतील अशी शक्यता नसते.
तुम्ही निवडलेली ऑपरेशन थिएटर, ऑपरेशन झाल्यानंतर राहण्याची रूम आणि अन्य सुविधांवरून तुम्हाला त्यातील किती पैसे क्लेम स्वरूपात परत मिळतात हे कंपनीतर्फे सांगितले जाते. अशावेळी वरचे पैसे स्वतः देण्यापेक्षा टॉप अप इन्शुरन्स नावाचा प्रकार आपण विकत घ्यायला हवा.
आपण एक उदाहरण समजून घेऊया ; एखाद्या व्यक्तीने तीन लाखांचा हेल्थ इन्शुरन्स विकत घेतला आणि वरच्या रकमेचे ओझे पडू नये म्हणून अजून एक तीन लाख रुपयांची पॉलिसी घेतली तर त्याचा प्रीमियम जास्त होतो. याउलट टॉप अप पॉलिसी स्वस्त पडते.
मग टॉप अप पॉलिसी नक्की कशी काम करेल?
समजा एखाद्याने पाच लाख ‘बेस कव्हरेज’ डिक्लेअर करून म्हणजेच कंपनीला कळवून त्यावरील उपचारांसाठी 15 लाखाची टॉप-अप पॉलिसी घेतली तर पहिल्या पाच लाख रुपयांच्या हॉस्पिटलच्या खर्चांसाठी ती टॉप अप पॉलिसी वापरली जाऊ शकणार नाही, पण पाच लाखाच्या वर खर्च केला आणि तो दुर्दैवाने अचानकपणे दहा लाख जरी गेला तरी टॉप-अप पॉलिसी वापरल्याने आपल्याला खिशातले पैसे द्यावे लागणार नाहीत.
टॉप-अप पॉलिसी चा खर्च किती?
प्रत्येकाच्या वयानुसार आणि किती रुपयाचा बेस तुम्ही घोषित केला आहे? यानुसार टॉप-अप इन्शुरन्सचा प्रीमियम ठरतो. अर्थात टॉप अप इन्शुरन्स मोठ्या आजारांसाठीची सोय म्हणूनच वापरला गेला पाहिजे यासाठी तयार झालेले साधन आहे. काही कंपन्या टॉप-अप च्या वर ‘सुपर टॉप’ अशा प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स सुद्धा देतात. ज्यामध्ये आधीचे इन्शुरन्स कव्हरेज वापरले गेले आणि तरीही हॉस्पिटलमध्ये खर्च झाला तर ते पुढच्या पॉलिसी मधून परत मिळू शकतात.
टॉप अप म्हणजे एक वेगळी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जादाचे फायदे नाहीत !
बऱ्याचदा पॉलिसी विकत घेताना टॉप-अप पॉलिसी म्हणजे असलेल्या इन्शुरन्स वर जादाचे फायदे असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. पण ते तसे नाही, तुमचा बेसिक हेल्थ इन्शुरन्स संपूर्ण वापरला जाणार असेल तर त्यानंतरच टॉप-अप पॉलिसी वापरली जाते. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीची मोठी शस्त्रक्रिया होणार असेल आणि त्याचा एकूण खर्च 12 ते 15 लाख रुपयांच्या आत जाणार आहे आणि त्या व्यक्तीने तीन लाख रुपयाची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली आहे आणि तो बेस ठरवून जादाची 15 लाखाची टॉप अप पॉलिसी काढली आहे तर पहिली पॉलिसी आणि टॉप अप पॉलिसी या दोन्ही पॉलिसी एकत्र वापरून त्याला क्लेम परत मिळवता येईल.
टॉप अप इन्शुरन्स फायद्याचे का?
टॉपअप इन्शुरन्स एवढाच साधा आरोग्य विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स तुम्ही विकत घ्यायला गेलात तर त्याचा प्रीमियम जबरदस्त असतो. त्या तुलनेत टॉप अप प्रीमियम कमी पडतो.
टॉप अप इन्शुरन्स कोणी घ्यावा?
आरोग्य विमा हा सर्वांनीच विकत घेतला पाहिजे ! पण ज्यांना आपल्या बदलत्या जीवनशैलीमुळे कोणते आजार होण्याची शक्यता आहे अशी चिन्हे दिसत असतील, फॅमिली हिस्टरी मध्ये म्हणजेच काही आजार कुटुंबात अगोदर झालेले असल्यामुळे आपल्याला व्हायची शक्यता आहे असे वाटल्यास व त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च हा मोठा असल्यास तुम्ही टॉप अप इन्शुरन्स घ्यायला हवा.
कोणत्या कंपनीचा टॉपअप इन्शुरन्स घ्यावा?
बाजारातील सर्व आघाडीच्या कंपन्या टॉप अप इन्शुरन्स देतात. त्या प्रत्येक कंपनीच्या पॉलिसीच्या अटी आणि शर्तीचा व्यवस्थित अभ्यास करून त्यानंतरच तुम्ही पॉलिसी विकत घेतली पाहिजे.