गुंतवणूकदारांच्या पदरात ज्या म्युच्युअल फंडांनी दोन दशके भरघोस परताव्याचे माप टाकले, त्या फंडात ‘एचएसबीसी फ्लेक्झीकॅप फंडा’चा समावेश आहे. फंड अस्तित्वात येऊन २० वर्षे आणि ७ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. फंडाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २४ फेब्रुवारी २००४ रोजी गुंतविलेल्या १ लाखाचे ११ जुलै २०२४ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ’मध्ये २१.४१ लाख झाले असून पहिल्या दिवसापासून ५००० रुपयांची ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ला (एसआयपी) सुरुवात केलेल्या एकूण १२.२५ लाख रुपये गुंतवणुकीचे ११ जुलै २०२४ रोजी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ७०.८१ लाख रुपये झाले आहेत. ‘एसआयपी’ परताव्याचा वार्षिक दर १५.०६ टक्के, तर एकरकमी गुंतवणुकीचा वार्षिक दर १६.२१ टक्के आहे. फंडाची मालमत्ता जून २०२४ रोजी ४,४३५ कोटी होती. फंडाच्या निधी व्यवस्थापनाची धुरा १ एप्रिल २०२४ पासून अभिषेक गुप्ता आणि वेणुगोपाल मंगत हे सांभाळत आहेत. फंडाच्या कामगिरीचा इतिहास थोडा बाजूला ठेवला आणि मागील दहा वर्षांचा विचार केला तर १० वर्षात फंडाने एकरकमी गुंतवणुकीवर १४.९७ टक्के, तर १० वर्षात एसआयपी गुंतवणुकीवर १६.९९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. प्रदीर्घ काळापासून हा एक ‘लार्ज-कॅप’ केंद्रित आणि ‘व्हॅल्यू इंव्हेस्टमेंट’वर आधारित गुंतवणूक करणारा फंड आहे. म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था असलेल्या ‘ॲम्फी’च्या ताज्या आकडेवारीनुसार, सर्व फंड गटात ‘फ्लेक्झीकॅप’ हा सर्वात मोठा फंड गट आहे. ज्या फंड गटात अनेक नवीन आणि जुने दिग्गज फंड चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन करीत असले तरी हा फंड गुंतवणूकदारांसाठी मागील दहा वर्षांत जोखीम समायोजित परतावा कर्मवारीत ‘टॉप क्वारटाइल’मध्ये असणारा फंड आहे. जे गुंतवणूकदार नव्याने ‘एसआयपी’साठी नवीन फंडाच्या शोधात असतील अशा गुंतवणूकदारांसाठी हा एक आदर्श पर्याय होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा