वसंत माधव कुळकर्णी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाजार निर्देशांक रोज नवीन उच्चांकाला स्पर्श करीत असल्याचे लक्षात घेता, पोर्टफोलिओ मूल्यात भविष्यात होणारी संभाव्य घसरण टाळण्यासाठी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. म्हणूनच दीर्घकालीन ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्तीनिर्मिती करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांनी ‘एचएसबीसी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडा’चा नक्कीच विचार करावा.

हा फंड लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड गटातील सर्वोत्कृष्ट फंडांपैकी एक नसला तरी अलीकडील काळात (निधी व्यवस्थापक बदलल्यानंतर) फंडाच्या मानदंडसापेक्ष (बेंचमार्क – बीएसई लार्ज मिडकॅप टीआरआय) कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसते. चिनू गुप्ता या कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडातून, एल ॲण्ड टी म्युच्युअल फंडात जून २०२१ मध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांची या फंडाच्या निधी व्यवस्थापक नेमणूक झाली. पुढे सहा महिन्यांत या फंडाच्या कामगिरीत लक्षणीय सुधारणा दिसून आली. एल ॲण्ड टी म्युच्युअल फंडाचे अधिग्रहण एचएसबीसी म्युच्युअल फंडाने केले असल्याने ‘एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड’ आता ‘एचएसबीसी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड’ म्हणून ओळखला जातो.

एल ॲण्ड टी फंडाचा मानदंडसापेक्ष कामगिरीचा ठिकठाक इतिहास लक्षात घेता, ‘एचएसबीसी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड’ हा दीर्घकालीन गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओतील मोठा हिस्सा म्हणून राखण्याची शिफारस आहे.‘सेबी’ने केलेल्या फंड गटाच्या प्रमाणीकरणानुसार लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडांना त्यांच्या एकूण गुंतवणुकीपैकी किमान ३५ टक्के गुंतवणूक लार्जकॅप आणि ३५ टक्के गुंतवणूक मिडकॅपमध्ये गुंतविणे अनिवार्य असते. उर्वरित ३० टक्के गुंतवणूक निधी व्यवस्थापकाच्या इच्छेने करण्याची मुभा ‘सेबी’ने निधी व्यवस्थापकांना दिली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार फंडाच्या गुंतवणुकीत ६०.५ टक्के लार्जकॅप, ३६.५५ टक्के मिडकॅप आणि १.६९ टक्के स्मॉलकॅप गुंतवणुका असून उर्वरित १.२७ टक्के हिस्सा रोकडसुलभ गुंतवणुकीत आहे. (ही आकडेवारी ‘एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅप’ची आहे आणि २८ नोव्हेंबरपासून दोन्ही फंडांचे विलीनीकरण झालेले आहे, तरी त्यामुळे या आकडेवारीत फार तर एक-दोन टक्क्यांचा फरक संभवण्याची शक्यता आहे) फंड विलीनीकरणानंतर फंडाच्या निधी व्यवस्थापिका म्हणून चिनू गुप्ता यांची नेमणूक झाली असून, निलोत्पल साहनी हे सह-निधी व्यवस्थापक आहेत.

चिनू गुप्ता यांनी बाजाराच्या परिस्थितीनुसार, मिडकॅपची मात्रा कायम ३५ ते ४० टक्क्यांदरम्यान राखल्याने लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड गटाच्या तुलनेत ‘एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंड’ कमी अस्थिर राहिला आहे. एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅपची जून २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या काळातील कामगिरी मानदंडापेक्षा सरस राहिली असून या कालावधीत फंडाचा मासिक परतावा मानदंड निर्देशांकाच्या तुलनेत किमान अडीच ते साडेतीन टक्क्यांनी अधिक आहे. मागील दोन वर्षे सुरू असलेल्या तेजीचा फायदा गुंतवणूकदारांना करून देण्यात हा फंड यशस्वी झाल्याचे दिसते. ‘एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडा’ची कामगिरी सर्वच कालखंडात फंड गटाच्या सरासरी कामगिरीपेक्षा सरस झाल्याचे दिसत आहे.

‘एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडा’ने (कंसात फंड गटाची सरासरी) एका महिन्यात ४.०१ (३.३५), सहा महिन्यांत ८.०३ (७.७७), एका वर्षात २०.२२ (१९.१७) आणि पाच वर्षांत १५.३२ (१२.१९) टक्के परतावा दिला आहे. जरी २०२०च्या पहिल्या तिमाहीत या फंडाने ३५ टक्के घसरण अनुभवली असली तरी हा फंड बाजाराच्या जोरदार कामगिरीमुळे झपाट्याने वर आला आणि त्यानंतरच्या दीड वर्षाहून अधिक काळ चाललेल्या तेजीचे प्रतिबिंब फंडाच्या कामगिरीत उमटले आहे. लार्ज कॅपकेंद्रित हा फंड सक्रिय व्यवस्थापित होणारा फंड असून फंड विलीनीकरणाची प्रक्रिया ‘सेबी’च्या मान्यतेनंतर सुरू झाल्याचे दिसून येते. मागील दोन महिन्यांत एल ॲण्ड टी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडांचे आणि पर्यायाने एचएसबीसी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडाचे मंथन वाढलेले दिसते. पोर्टफोलिओची पुनर्रचना करण्याच्या उद्देशाने मागील महिन्याभरात फंडाच्या गुंतवणुकीतून चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, युनो मिंडा, बजाज फायनान्स, पेज इंडस्ट्रीज, सफायर इंडिया, एबीबी इंडिया, कन्साई नेरोलॅक, मारुती सुझुकी, प्रुडंट कॉर्पोरेट यांचे प्रमाण कमी केले तर आयसीआयसीआय बँक, इंडियन हॉटेल्स, स्टेट बँक, एसआरएफ, इन्फोसिस, लार्सन ॲण्ड टुब्रो, शॉपर्स स्टॉप, एचडीएफसी बँक यांचे प्रमाण वाढविले. तर एचएसबीसी लार्ज ॲण्ड मिडकॅप फंडाने आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक इन्फोसिस, अँक्सिस बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक, आयटीसी, लार्सन ॲण्ड टुब्रो, दालमिया भारत यांचे प्रमाण वाढविले.

त्याउलट एसबीआय कार्ड्स, बजाज फायनान्स, महिंद्र ॲण्ड महिंद्र, टीव्हीएस मोटर्स, पेज इंडस्ट्रीज, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट, डिक्सन टेक्नॉलॉजीज, टाटा मोटर्स यांचे प्रमाण कमी केले. दोन्ही फंडांनी कोणत्याही नवीन कंपनीत गुंतवणूक केलेली नाही. फंडाच्या पोर्टफोलिओमधील काही शीर्ष समभाग वगळता कंपन्यांची विस्तृत विभागणी असून पोर्टफोलिओमध्ये समभागांचा प्रत्येकी वाटा सरासरी ५ टक्क्यांदरम्यान राखलेला आहे. फंडाला स्थैर्य देण्याचे काम निफ्टी निर्देशांकांमधील कंपन्यांनी केले असून, वृद्धी ‘बीएसई टॉप १००’ बाहेरील कंपन्यांनी मिळवून दिलेली दिसते. फंडाच्या पोर्टफोलिओत रोख रक्कम आणि रोखे तीन ते पाच टक्क्यांपेक्षा वाढलेली नाही. एकूणच, गुंतवणूकदार दीर्घकालीन सरासरीपेक्षा जास्त परतावा मिळविण्याच्या उद्देशाने या फंडाचा नक्कीच विचार करू शकतात.
बाजार नवीन उच्चांकावर आहेत हे लक्षात घेता बाजार अस्थिरतेमुळे दरम्यानच्या काळात तोटा झाला तरी चिकाटीने दीर्घकाळ ‘एसआयपी’ची वाट चोखळल्यास १० ते १२ टक्के परतावा मिळेल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

वसंत माधव कुळकर्णी
shreeyachebaba@gmail.com

(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsbc large and midcap fund new sip option in market mutual fund tmb 01