देवदत्त धनोकर
आर्थिक प्रगतिपथावर वेगाने, कोणताही ब्रेक न लागता प्रवास सुकर करायचा असेल, तर आपत्कालीन निधी महत्त्वाचाच…
एका प्रशिक्षण कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला गाडीला ब्रेक असतात याचे फायदे काय आहेत? अनेकांनी विविध उत्तरे दिली त्यातील एक उत्तर होते ब्रेक असल्यामुळे गाडी वेगात चालवता येते.
नक्कीच. गाडीचे ब्रेक उत्तम स्थितीत असतील तर वेगाने गाडी चालवणे शक्य होते. माझ्या एका प्रशिक्षण कार्यक्रमात मला विचारण्यात आले की, आपत्कालीन निधी का असावा आणि जर शेअर आधारित गुंतवणुकीवर सर्वाधिक परतावा मिळतो तर आपत्कालीन निधी बचतीच्या पर्यायात का ठेवावा?
आजच्या लेखात आपण जाणून घेऊ या, आर्थिक नियोजनातील आपत्कालीन निधीचे महत्त्व आणि सोबतच आपत्कालीन निधीबाबत काही महत्त्वपूर्ण माहिती.
हेही वाचा >>> सोन्याचे ‘एटीएम’
आपत्कालीन निधी:
आपल्याला तातडीच्या गरजेसाठी उपयोगी पडणारा निधी म्हणजे आपत्कालीन निधी. आजारपण, अपघात, नोकरी जाणे, व्यवसायात नुकसान होणे अशा प्रसंगी तातडीने रुपयांची आवश्यकता असते. अशा वेळेस आपत्कालीन निधीची आवश्यकता भासते.
आपत्कालीन निधी किती असावा?
आपल्या मासिक खर्चाच्या किमान सहा पट ते १२ पटींपर्यंत आपत्कालीन निधी असावा. एका उदाहरणाच्या मदतीने आपण हे जाणून घेऊ या.
मंदार आणि आरती यांचा मासिक खर्च ५०,००० रुपये आहे. साहजिकच मंदार आणि आरतीने किमान सहा महिन्यांच्या खर्चाची रक्कम म्हणजेच ३,००,००० रुपयांचा आप्तकालीन निधी तयार केला पाहिजे. तातडीच्या गरजेच्या वेळेस ते हा निधी वापरू शकतात.
आपत्कालीन निधीची बचत / गुंतवणूक कुठे करावी?
सर्वप्रथम आपण आपली सुरक्षितता, तरलता आणि मिळणारे उत्पन्न याची पातळी जाणून घेऊन निश्चित केली पाहिजे. यातील तरलता म्हणजेच गरजेच्या वेळेस रुपयांची उपलब्धता यास आपण सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. साहजिकच अशी गुंतवणूक सुरक्षितदेखील असावी. तरलता आणि सुरक्षितता या दोन मुद्द्यांच्या आधारे आपण खालील पर्याय निवडू शकतो.
हेही वाचा >>> ‘टीडीएस’चा वाढता ’व्याप’
१) घरात रोख रक्कम ठेवणे – रुपयांची अर्ध्या रात्रीदेखील उपलब्धता
२) सरकारी बँकेतील बचत खाते – एटीएमच्या मदतीने २४ तासांत कधीही रक्कम उपलब्ध
३) सरकारी बँकेतील मुदत ठेव
४) म्युच्युअल फंडाच्या रोखे आधारित योजना.
मंदार आणि आरती तीन लाखांचा आपत्कालीन निधी खालीलप्रमाणे विभागून ठेवू शकतात. रोख रक्कम – २५,००० रुपये, बचत खाते ५०,०००, बँकेतील मुदत ठेव १,००,००० रुपये आणि म्युच्युअल फंडाच्या रोखे आधारित योजनेत १,२५,००० रुपये.
जर गुंतवणूकदारांची जोखीम घ्यायची क्षमता खूप कमी असेल तर म्युच्युअल फंडाऐवजी बँक मुदत ठेवीत जास्त रक्कम ठेवावी.
मासिक खर्च ५०,००० रुपये, तर आवश्यक आपत्कालीन निधी तीन लाखांची विभागणी
मध्यम/जास्त जोखीम कमी जोखीम
रोख रक्कम २५,००० २५,०००
बँकेतील बचत खाते ५०,००० ५०,०००
बँकेतील मुदत ठेव १,००,००० २,२५,०००
म्युच्युअल फंड १,२५,००० ०
काही उदाहरणे:
आर्थिक नियोजनात आपत्कालीन निधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या संदर्भातील काही निवडक अनुभव आपण जाणून घेऊ या.
वर्ष २०११ मध्ये एका कुटुंबासाठी आम्ही आर्थिक योजना तयार केली होती. अर्थातच त्यात आपत्कालीन निधीचादेखील समावेश होता. मात्र गुंतवणूकदाराने सध्या शेअर आधारित म्युच्युअल फंडात गुंतवणुकीला प्रारंभ करू या पुढील महिन्यापासून आपत्कालीन निधी आणि आरोग्य विमा करू या असे सांगितले. त्यानंतर विविध कारणांमुळे त्यांनी आपत्कालीन निधी तयार केला नाही. साधारण एका वर्षाने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकरिता आरोग्यविषयक समस्या आली. आपत्कालीन निधी नसल्याने त्यांना काही दीर्घ कालावधीसाठी केलेल्या गुंतवणुका या नुकसान सोसून मोडाव्या लागल्या आणि आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला.
हेही वाचा >>> मार्ग सुबत्तेचा:‘पोर्टफोलिओ’ बांधणे म्हणजे नक्की काय असते?
येथे एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की, आर्थिक नियोजनातील आपत्कालीन निधी तसेच आरोग्य विमा हे गाडीच्या शॉक ॲब्झॉर्बरसारखे काम करतात आणि आपला गुंतवणुकीचा प्रवास सुसह्य करतात. आपत्कालीन निधीचा अनेक गुंतवणूकदारांना फायदा झाला त्यातील एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे पती-पत्नी दोघांनाही एकत्रितपणे आर्थिक योजना व आप्तकालीन निधीचे महत्त्व याची माहिती दिल्यावर त्यांचं म्हणणं होतं – “सर, बाकी सर्व गुंतवणूक करूयात. पण घरात रोख रक्कम ठेवल्यामुळे व्याजाचे नुकसान होईल. याकरिता ती रक्कम बँकेत ठेवू या आणि एटीएमच्या मदतीने तर २४ तासांत कधीही रक्कम काढता येते.”
मी त्यांना पुन्हा एकदा आपत्कालीन निधीचे महत्त्व सांगितले आणि वेळेवर कोठे एटीएम शोधाल याकरिता किमान २५,००० रुपये घरी रोख स्वरूपात ठेवा असे सांगितले. त्यानंतर पुढील मीटिंगमध्ये त्यांनी सांगितले – “सर, दोनवेळा तातडीच्या प्रसंगात गरज भासली, त्यावेळेस रोख रक्कम जवळ असल्यामुळे खूप फायदा झाला.”
हेही वाचा >>> पुरेशा विमाछत्राकडे दुर्लक्ष का बरे?
लेखाच्या सुरुवातीला दिलेल्या उदाहरणाप्रमाणे असे म्हणता येईल की, आपत्कालीन निधी असेल तर आर्थिक प्रगतीसाठी आपण वेगाने प्रवास करू शकतो.
थोडक्यात महत्त्वाचे, ‘जे ना देखे रवी, ते देखे कवी’ याचप्रमाणे जे तुम्ही स्वतः बघू शकणार नाही ते आर्थिक नियोजनकार बघत असतात. याकरिता त्यांच्या सल्ल्याने आपल्या आर्थिक नियोजनांत आपत्कालीन निधीचा समावेश जरूर करा.
लेखक पुणेस्थित गुंतवणूक सल्लागार
dgdinvestment@gmail.com