डॉ. आशीष थत्ते
सर्व कंपन्या त्यांचा एक संघटनात्मक तक्ता (ऑर्गनायझेशनल चार्ट) तयार करून त्यानुसार वाटचाल करतात. या तक्त्यामुळे कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये नक्की कोणाला अहवाल (रिपोर्टिंग) द्यायचा आहे ते समजते. याचबरोबर कंपन्यांना त्यांचे विभाग, योजना, गट समजायला मदत होते. नक्की कुणी कोणते काम करायचे आहे किंवा आपले काय उद्दिष्ट आहे हे संघटनात्मक तक्त्यामुळे सोपे होते. एखाद्याला जर कंपनीमध्ये पुढे जायचे असेल तर पुढील जागा रिकामी होण्याची शक्यतादेखील असावी लागते. खूप मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एवढे विभाग किंवा जागा असतात की कर्मचारी एकमेकांना ओळखत नाहीत. मुंबईमध्ये विक्रोळीला काम करणाऱ्या एकाच कंपनीच्या माणसाला आपल्याच ऐरोली येथील कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची माहिती असतेच असे नाही. म्हणजे एकाच कंपनीमध्ये स्थानाप्रमाणे तक्ता बदलू शकतो. नवीन युगात संघटनामतक तक्त्याला ऑग चार्ट, ऑरगॅनॉग्राम या नावानेदेखील ओळखले जाते. प्रत्येक कंपनी त्यांचा गरजेप्रमाणे तक्ता बनवते. यात विभागीय, सपाट (फ्लॅट), मूस (मॅट्रिक्स), सांघिक (टीम्स), जाळीदार (नेटवर्क) असे विविध प्रकार असतात. यापैकी कुठला प्रकार आपल्या व्यवसायाला लागू पडेल, त्या प्रकारचा तक्ता बनवला जातो. नवीन नोकरी घेताना आवर्जून तक्ता बघितला जातो. कारण एकापेक्षा अधिक वरच्या अधिकाऱ्यांना रिपोर्टिंग असेल तर सगळ्यांनाच मान्य असेल असे नाही.
आता येऊ आपल्या घरी. आपले कुटुंब, वंश किंवा कूळ हे असेच असते. पूर्वीच्या काळी हा तक्ता खूप मोठा व जटिल असायचा. पण हल्ली थोडासा सपाट पण तरीही जटिल होतो आहे. कंपन्यांमध्ये गरजेप्रमाणे हा तक्ता बदलतो, पण कुटुंबांमध्ये तो पिढी दरपिढी पुढे जातो. जेव्हा मुलगी आपले घर सोडून सासरी येते तेव्हा या या तक्त्याचे महत्त्व अधोरेखित होते. तीदेखील नवीन कंपनीप्रमाणे कौंटुबिक तक्ता काय आहे हे बघते. हल्लीच्या मुलींना सयुंक्त कुटुंब पद्धती आवडेलच असे नाही तर काहींना छोटे कुटुंब पसंत पडेल असे नसते. छोट्या कंपनीत मोठा हुद्दा किंवा छोट्या कुटुंबातील सून म्हणजे सर्वच जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर तसेच एकत्रित कुटुंबामधील सून म्हणजे मर्यादित अधिकार आणि ६ सासवांना रिपोर्टिंग अगदी मोठ्या कंपनीप्रमाणेच! ‘क्यूंकी सांस भी कभी बहू थी’ म्हणजे घरात हुद्दा वाढेल याची शाश्वतीच असते. हल्लीचा सपाट तक्ता लग्न, घटस्फोट, समलिंगी संबंधांना मान्यता, लिव्ह इन रिलेशनशिप, पुनर्विवाह या सगळ्यांमुळे जटिल बनला आहे. आपल्याकडे कुलवृत्तांत बनवण्याची पद्धत आहे. तो सगळ्यात मोठा तक्ता समजला जातो.
असो, थोडक्यात काय तर संघटनात्मक तक्त्याचे जसे कंपन्या अनुसरण करतात तशी आपली कुटुंबेदेखील थोड्या प्रमाणावर करतात. कंपन्यांचा तक्ता विचारपूर्वक बनवला जातो तर आपला मात्र आपोआप घडतो.
Twitter : @AshishThatte
E-mail : ashishpthatte@gmail.com