कौस्तुभ जोशी, अर्थ विश्लेषक
टाटा उद्योग समूहातील ‘टाटा टेक्नॉलॉजी’ या कंपनीचा पब्लिक इश्यू आज गुंतवणूकदारांसाठी खुला होत आहे. आज पासून सुरू होणारा हा पब्लिक इश्यू म्हणजे टाटा समूहातील एखाद्या कंपनीचा वीस वर्षानंतर आलेला पब्लिक इश्यू आहे. याआधी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस’ या कंपनीच्या पब्लिक इश्यूमधून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा मिळाला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. फक्त दोन दिवसासाठी उपलब्ध असलेल्या या पब्लिक इश्यूचे गुंतवणूकदारांच्या दृष्टीने काय महत्त्व असेल ते थोडक्यात समजावून घेऊया.
कालावधी
बुधवार २२ नोव्हेंबर २०२३ ते शुक्रवार २४ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत गुंतवणूकदारांना शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे.
प्राईज बँड आणि लॉट साईझ
कंपनीच्या शेअरची फेस व्हॅल्यू दोन रुपये आहे. ज्यांना आयपीओमध्ये शेअर्ससाठी बोली लावायची आहे त्यांनी ४७५ ते ५०० रुपये प्रतिशेअर या प्राईज बँड मध्ये बोली लावणे अपेक्षित आहे. जर पाचशे रुपये प्रति शेअर ही किंमत गृहीत धरली तर कंपनीचे बाजारमूल्य (Valuation) २०२८३ कोटी एवढे होते. एका गुंतवणूकदाराला कमीत कमी ३० शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. म्हणजेच याची लॉट साईझ ३० शेअर्सची असणार आहे. म्हणजेच अंदाजे १५००० रुपयाचा एक लॉट असेल. या पब्लिक इश्यू मधून टाटा टेक्नॉलॉजीला तीन हजार कोटी रुपयांपर्यंतचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
आयपीओ मागील उद्दिष्टे
टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीकडून नवीन शेअर्स इश्यू केले जाणार नाहीत, तर सध्याच्या शेअर होल्डर्सना आपले शेअर्स विकण्याची संधी हा या आयपीओ मागील प्रमुख उद्देश आहे. टाटा मोटर्स, अल्फा टीसी होल्डिंग आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड यांना आपले शेअर्स विकायचे आहेत.
टाटा टेक्नॉलॉजीचा शेअर होल्डिंग पॅटर्न पुढीलप्रमाणे
· टाटा मोटर्स ६४.७९%
· टाटा मोटर्स फायनान्स २ %
· अल्फा टीसी होल्डिंग ७.२६%
· टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ३.६३%
या आयपीओमधील १०% कोटा टाटा मोटर्सच्या पात्र शेअरहोल्डरसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. ५०% शेअर्स QIB गुंतवणूकदारांसाठी राखीव आहेत. रिटेल श्रेणीतील गुंतवणूकदारांना १५ टक्के शेअर्स मिळतील.
कंपनीचा मुख्य व्यवसाय
टाटा मोटर्सची उपकंपनी असलेली टाटा टेक्नॉलॉजी जागतिक स्तरावर इंजीनियरिंग आणि डिजिटल यांच्या संयुक्त उत्पादनांमध्ये कार्यरत आहे. टाटा टेक्नॉलॉजी उत्पादन क्षेत्रातील इंजिनिअरिंग, संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे. वाहने आणि त्या संबंधित उद्योग क्षेत्रातील नवी डिझाईन बनवणे त्याच्याशी संबंधित डिजिटल सोल्युशन्स तयार करणे हा कंपनीचा मुख्य व्यवसाय आहे. या कंपनीतील ‘phygital’ हा विभाग खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी प्रशिक्षण देण्याचे सुद्धा काम करतो यासाठी कंपनीने iGetIT ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
कंपनीची आर्थिक स्थिती
वित्त वर्ष मार्च २०२३ अखेरीस कंपनीचा व्यवसाय वार्षिक ४२% दराने वाढताना दिसत आहे, तर निव्वळ नफा ६२४ कोटी रुपये आहे. या आर्थिक वर्षातील सहा महिन्याच्या कालावधीत कंपनीचा नफा ३६ टक्के वाढून ३५१ कोटी रुपये पोहोचला आहे, तर एकूण विक्री अडीच हजार कोटी पलीकडे पोहोचली आहे.
आयपीओशी संबंधित जोखीम
टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा व्यवसाय टाटा मोटर्स आणि जग्वार लँड रोव्हर या दोन कंपन्यांवर अवलंबून आहे. एकूण व्यवसायापैकी ४०% व्यवसाय फक्त या दोन कंपन्यांमधूनच मिळतो. जर या दोन कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला तर त्याचा थेट धोका टाटा टेक्नॉलॉजीच्या व्यवसायाला असणार आहे. कंपनी वाहन निर्माण क्षेत्रातील असल्यामुळे जर एकूणच वाहन क्षेत्रामध्ये मंदी आली तर त्याचा परिणाम या कंपनीच्या व्यवसायावर होऊ शकतो.
कंपनीच्या एकूण व्यवसायापैकी ३० ते ४० टक्के व्यवसाय परदेशातून होत असल्यामुळे अमेरिकन डॉलर्स, ब्रिटिश पाउंड, सिंगापूर डॉलर, स्वीडीश क्रोना अशा विविध चलनांमध्ये कंपनीचा व्यवसाय विखुरला आहे. जर परकीय चलनाच्या दरामध्ये चढ-उतार झाले तर त्याचा परिणाम कंपनीच्या व्यवसायावर होऊ शकतो.
कंपनीचे पाच डिसेंबर रोजी शेअर बाजारात पदार्पण (Listing) होणार आहे. गुंतवणूकदारांनी जोखीम विषय माहिती वाचून, समजून घेऊन आपल्या जबाबदारीवर या आयपीओ मध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घ्यावा.