सुधारलेले राहणीमान, वैद्यकीय सुविधा वगैरे कारणांमुळे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांना सोयी-सुविधा पुरवणे, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारसुद्धा अनेक योजना राबवत आहे. प्रधानमंत्री वय वंदन योजना, ज्येष्ठ पेन्शन बिमा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय ओल्ड एज पेन्शन स्कीम, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, वगैरे योजना विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिकांसाठी आहेत. छोटे कुटुंब, परदेशात शिक्षणासाठी गेलेली आणि तेथेच स्थायीक झालेली मुले यामुळे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहावे लागते. खर्चासाठी त्यांच्याकडे जास्त पैसा खेळता राहावा म्हणून प्राप्तिकर कायद्यात काही विशेष तरतुदी आहेत. इतर नागरिकांना मिळणाऱ्या सवलतींपेक्षा जास्त सवलती ज्येष्ठ नागरिकांना आहेत. ज्येष्ठ नागरिकांना कर भरावा लागतो का? त्यांना विवरणपत्र भरावे लागते का? त्यांना अग्रिम कर भरावा लागतो का? असे अनेक प्रश्न ज्येष्ठ नागरिकांना पडतात. या प्रश्नांची उत्तरे या लेखात दिली आहेत.
ज्येष्ठ नागरिक म्हणजे कोण?
प्राप्तिकर कायद्यानुसार ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकाचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे. हे ज्येष्ठ नागरिक दोन प्रकारात विभागले आहेत. एक म्हणजे ज्या नागरिकांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे, आणि दुसरे म्हणजे ज्या नागरिकांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे असे अतिज्येष्ठ नागरिक. करदात्याने आर्थिक वर्षात (त्या वर्षात कोणत्याही दिवशी) ६० वर्षे पूर्ण केली असतील तर तो त्या वर्षापासून ज्येष्ठ नागरिक होतो. परंतु केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने जुलै, २०१६ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार ज्यांचा ६० वा वाढदिवस १ एप्रिल रोजी येतो त्यांच्या वयाची ६० वर्षे पूर्ण आदल्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी पूर्ण झाल्यामुळे त्या करदात्याला ज्येष्ठ नागरिकाचा दर्जा ३१ मार्च रोजी संपलेल्या वर्षात मिळतो.
हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा : थीमॅटिक आणि सेक्टर फंड – पोर्टफोलिओला ‘बूस्टर डोस’!
कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा :
कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी ३ लाख रुपये आणि अतिज्येष्ठ नागरिकांसाठी ५ लाख रुपये इतकी आहे. ही सवलत फक्त निवासी भारतीयांसाठीच आहे. करदाता अनिवासी भारतीय असेल आणि तो ज्येष्ठ किंवा अतिज्येष्ठ नागरिक असला तरी त्याच्यासाठी कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा २,५०,००० रुपये इतकीच आहे. जे करदाते नवीन करप्रणालीचा पर्याय निवडतात त्यांच्यासाठी मात्र आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी प्रथम २,५०,००० रुपये आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ नंतर प्रथम ३ लाख रुपयांची करमुक्त उत्पन्नाची मर्यादा असेल. नवीन करप्रणालीनुसार उत्पन्नावरील कराचे टप्पे ज्येष्ठ, अतिज्येष्ठ आणि सामान्य नागरिकांसाठी समान आहेत.
वैद्यकीय खर्चाच्या अतिरिक्त वजावटी :
वय वाढल्यानंतर वैद्यकीय उपचारांची जास्त गरज भासते. आणि यावर होणाऱ्या खर्चातसुद्धा वाढ होते. मेडिक्लेम विमा असेल तर अशा खर्चाची भरपाई होते. ‘कलम ८० डी’ नुसार करदात्याला मेडिक्लेम विमा हप्त्याची २५,००० रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. हा विमा ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल तर त्याची मर्यादा ५०,००० रुपये इतकी आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांनी मेडिक्लेम विमा घेतलेला नाही अशांसाठी ५०,००० रुपयांपर्यंतच्या केलेल्या वैद्यकीय खर्चाची वजावट उत्पन्नातून घेता येते. ही ‘कलम ८० डी’ नुसार वैद्यकीय खर्चाची वजावट फक्त निवासी ज्येष्ठ नागरिकांनाच मिळते. या कलमानुसार उत्पन्नातून वजावट घेण्यासाठी हा खर्च रोखीने केल्यास या खर्चाची वजावट मिळत नाही. ज्या निवासी भारतीयांनी स्वतःच्या किंवा त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींच्या काही ठरावीक रोगांच्या निदानासाठी वैद्यकीय खर्च केला असेल आणि नियमांतर्गत नमूद केलेल्या विशेषज्ञाने त्यांना प्रिस्क्रिप्शन दिले असेल तर त्यांना ‘कलम ८० डीडीबी’ अंतर्गत ४०,००० रुपयांपर्यंतच्या खर्चाची वजावट उत्पन्नातून मिळते. ज्येष्ठ नागरिकांसाठी ही खर्चाची मर्यादा एक लाख रुपये इतकी आहे. या खर्चाची परतफेड विमा कंपनी किंवा करदाता नोकरदार असेल तर त्याच्या मालकाने केली असेल तर ही परतफेडीची रक्कम वजावटीतून कमी होते.
व्याजावर अतिरिक्त वजावट :
ज्येष्ठ नागरिकांना व्याजाच्या उत्पन्नावर अतिरिक्त वजावट मिळते. सामान्य नागरिकांना बचत खात्याच्या व्याजावर १०,००० रुपयांपर्यंतची ‘कलम ८० टीटीए’च्या अंतर्गत वजावट उत्पन्नातून मिळते. ज्येष्ठ नागरिकांना बॅंकेतून, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बॅंकेतून मिळालेल्या व्याजावर ५०,००० रुपयांपर्यंतची, ‘कलम ८० टीटीबी’च्या अंतर्गत, वजावट उत्पन्नातून मिळते. ही वजावट फक्त बचत खात्याच्या व्याजावर नसून मुदत ठेवींच्या व्याजावरसुद्धा मिळते. ही सवलत फक्त निवासी भारतीयांनाच आहे. कंपन्यांच्या ठेवींवर मिळालेल्या व्याजावर मात्र ही वजावट मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांनी गुंतवणूक करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
उद्गम करासाठी (टीडीएस) जास्त मर्यादा :
उद्गम कर (टीडीएस) कापला गेला तर ज्येष्ठ नागरिकांची रोकड सुलभता कमी होते आणि करपात्र उत्पन्न नसल्यास फक्त उद्गम कर कापला गेला म्हणून विवरणपत्र दाखल करावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी व्याजावर होणाऱ्या उद्गम कराची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त आहे. त्यांना बॅंकेतून, पोस्ट ऑफिस किंवा सहकारी बॅंकेतून मिळणाऱ्या ५०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर उद्गम कर कापला जात नाही.
विवरणपत्र दाखल करण्यापासून सुटका :
ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय ७५ वर्षांपेक्षा जास्त आहे, त्यांनी काही अटींची पूर्तता केल्यास त्यांची विवरणपत्र भरण्यापासून सुटका होऊ शकते. अशा ज्येष्ठ नागरिकांना ज्या बँकेतून पेन्शन मिळते, त्याच बँकेतून व्याज मिळत असेल आणि बँकेने ‘कलम १९४ पी’ नुसार उद्गम कर कापला असेल तर त्यांना विवरणपत्र दाखल करावे लागणार नाही. अन्यथा विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे.
हेही वाचा – Money Mantra: आयुर्विमा पॉलिसी कराराचं महत्त्व
फॉर्म १५ एच :
ज्येष्ठ नागरिक त्यांच्या उत्पन्नावर होणारा उद्गम कर (टीडीएस) कापला जाऊ नये यासाठी ‘फॉर्म १५ एच’ देऊ शकतात. हा फॉर्म ज्येष्ठ नागरिकांना (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे) देता येतो. ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या बँकेतील मुदत आणि आवर्त ठेवींवरील व्याज, घरभाडे उत्पन्न, लाभांशाचे उत्पन्न वगैरे उत्पन्नावरील उद्गम कर टाळण्यासाठी ‘फॉर्म १५ एच’ बँकेला किंवा उत्पन्न देणाऱ्याला सादर केल्यास त्यावर उद्गम कर कापला जात नाही. ज्येष्ठ नागरिकांच्या एकूण उत्पन्नावर देय कर शून्य असेल तरच हा फॉर्म देता येतो.
अग्रिम कर भरण्यापासून सुटका :
ज्या करदात्यांचे करदायित्व १०,००० रुपयांपेक्षा जास्त (उद्गम कर आणि गोळा केलेला कर वजा करता) असेल तर त्यांना अग्रिम कराच्या तरतुदी लागू होतात. काही ज्येष्ठ नागरिकांना यात सवलत दिली आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांच्या उत्पन्नात उद्योग-व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश नाही अशांना उद्गम कराच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्यांनी विवरणपत्र दाखल करण्यापूर्वी सगळा कर भरल्यास त्यांना व्याज भरावे लागत नाही.
लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार
pravindeshpande19S66@rediffmail.com