एक काळ असा होता की, ज्यांच्याकडे नियमितपणे उत्पन्न येत होते त्यांच्यासाठी पैसे कुठे गुंतवायचे? याचे अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके मार्ग उपलब्ध होते. गावात-शहरात घराजवळ असली तर बँक, नाहीतर पोस्ट ऑफिसच होते. त्यातल्या त्यात ज्यांचा संबंध येत असे त्यांच्यासाठी शेअरमध्ये वगैरे गुंतवणूक करणे हा पर्याय होता. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया अर्थात ‘यूटीआय’ सुरू झाल्यावर सर्वसामान्य माणसाला शेअर बाजारात अप्रत्यक्ष प्रवेश मिळायला सुरुवात झाली तरी त्याचा प्रवाह शहरांपुरताच मर्यादित होता. हे चित्र नव्वदीनंतर बदलायला सुरुवात झाली. ज्यावेळी भांडवली बाजार हळूहळू नियंत्रण मुक्ततेच्या दिशेने जात होते, म्हणजेच बाजारामध्ये धोरणात्मक सुधारणा होत होत्या. याचा पहिला परिणाम दिसला तो परदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणुकीचे मुक्तद्वार मिळाले आणि भारतीय बाजारामध्ये खासगी म्युच्युअल फंड कंपन्यांचा प्रवेश झाला. या घटनेला आज तीस वर्षे पूर्ण झाली आहेत आणि आता भारतीय गुंतवणूकदारांना परदेशी बाजारपेठेतील गुंतवणूक खुणावू लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशी बाजारपेठेतील गुंतवणूक म्हणजेच प्रामुख्याने अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांमध्ये झालेली गुंतवणूक असा अर्थ इथे अपेक्षित आहे. म्हणजे अन्य देशांत गुंतवणूक करणे योग्य नाही असे नाही, तर गुंतवणूकदारांचा प्रमुख ओढा हा अमेरिकेतील कंपन्यांकडे राहिला आहे. भारतीय गुंतवणूकदार परदेशात कशी गुंतवणूक करू शकतात, याचे प्रमुख दोन प्रत्यक्ष मार्ग आहेत. भारतातील ज्या दलाली पेढ्यांचा (ब्रोकिंग फर्म) अमेरिकेतील कंपन्यांशी करार आहे, अशा कंपन्यांकडे ओव्हरसीज ट्रेडिंग अकाउंट उघडून त्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. दुसरा पर्याय म्हणजे थेट अमेरिकेतील ब्रोकिंग कंपन्यांमध्ये आपले ट्रेडिंग अकाउंट उघडता येतो. पण ज्यांचे गुंतवणूक मूल्य अगदीच कमी आहे, त्यांच्यासाठी हे दोन्हीही पर्याय अजिबातच उपयुक्त नाहीत. कुठल्याही भांडवली बाजार दलालाकडून शेअर विकत घेताना त्याची प्रक्रिया थोडी क्लिष्ट असते. त्यामध्ये दलाली (ब्रोकरेज), बँकेचे शुल्क, परदेशी चलनामध्ये व्यवहार केला जात असल्याने त्याचा द्यावा लागणारा आकार, त्यावरील कर अशा बाबी लक्षात घ्याव्या लागतील. जर एखाद्याला प्रत्यक्ष शेअर विकत न घेता परदेशी बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्याच्यापुढे असलेला तिसरा मार्ग म्हणजे परदेशी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करत असलेल्या म्युच्युअल फंड योजनांमध्ये किंवा एक्सचेंज ट्रेडेड फंडात (ईटीएफ) गुंतवणूक करणे.

हेही वाचा – तुम्ही ‘अर्थसाक्षर’ आहात?

म्युच्युअल फंड ही संकल्पना आता आपल्यासाठी अजिबातच नवीन राहिलेली नाही. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या समभाग संलग्न (इक्विटी) योजनेमध्ये गुंतवणूक करता अगदी त्याचप्रमाणे ही इंटरनॅशनल फंड योजना असते. यामध्ये आपल्या गुंतवलेल्या पैशातून परदेशी कंपन्यांचे शेअर हा निधी व्यवस्थापक विकत घेत असतो.

कोणकोणत्या प्रकारचे फंड उपलब्ध आहेत?

फक्त अमेरिकी बाजारच नाही तर आशिया, जपान, तैवान अशा बाजारांमध्ये गुंतवणूक करणारे फंडसुद्धा उपलब्ध आहेत. जर आंतरराष्ट्रीय बाजारातील एखाद्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तसे थिमॅटिक फंडसुद्धा उपलब्ध आहेत. फ्रँकलिन टेंपलटन म्युच्युअल फंड या घराण्याने वीस वर्षांपूर्वी ‘टेंपलटन इंडिया इक्विटी इन्कम फंड’ या नावाने एक योजना बाजारात आणली होती. यामध्ये पोर्टफोलिओचा काही हिस्सा उदयाला येणाऱ्या बाजारपेठा म्हणजेच दक्षिण कोरिया, तैवान, चीन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका अशा देशांतील कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवला जात असे. ज्यावेळी ही फंड योजना सुरू झाली तेव्हा मार्क मोबियस हे या परदेशी गुंतवणुकीच्या व्यवस्थापनाचे काम बघत असत.

मोबियस हे उदयाला येणाऱ्या बाजारपेठांमध्ये पैसे गुंतवण्याची रणनीती आखणारे, म्हणजेच इमर्जिंग मार्केट इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रातील हे अत्यंत नावाजलेले नाव आहे. आजही या योजनेमध्ये १३ टक्के पोर्टफोलिओ हा परदेशी कंपन्यांच्या शेअरचा आहे. या योजनेने सुरू झाल्यापासून सरासरी १५ टक्के परतावा गुंतवणूकदारांच्या पदरात घातला आहे. अलीकडील काळात अमेरिकी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या योजनांचे प्रमाण वाढत आहे. त्याचबरोबरीने चीनमधील शांघाय स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचिबद्ध असणाऱ्या कंपन्यांमध्ये जपान वगळता अन्य उदयोन्मुख आशियाई देशांमध्ये गुंतवणुकीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

अमेरिकी भांडवली बाजाराकडे ओढा का?

भारतीय शेअर बाजार गेल्या काही वर्षांपासून उत्तम परतावा देत असला तरी त्यात कमालीची अस्थिरता आहे. याउलट अमेरिकी शेअर बाजार हे कमी अस्थिर आहेत. जगाच्या अर्थव्यवस्थेचे केंद्र असलेली अमेरिका आपल्या आघाडीच्या कंपन्यांसाठी प्रसिद्ध आहे. नॅसडॅक आणि डाऊजोन्समधील (आपल्याकडे सेन्सेक्स आणि निफ्टी असतात त्याप्रमाणे तिकडचे इंडेक्स) कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची उत्तम संधी उपलब्ध असते. अमेरिकेचा जगाच्या व्यापारावर असलेला प्रभाव आणि नावीन्यपूर्ण उत्पादने बाजारात आणण्याच्या अमेरिकी कंपन्यांच्या व्यवसाय स्वरुपामुळे त्यांचे नफ्याचे आकडे सतत वाढतच असतात. याचा थेट परिणाम शेअरच्या किमतीवर होत असतो. आकाराने बलाढ्य असलेल्या अमेरिकी शेअर बाजारामध्ये उलाढालही आपल्यापेक्षा कित्येक पटीने अधिक होते. यामुळेच अमेरिकी बाजार हे परदेशात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी हवेहवेसे वाटणारे ठरले आहेत.

हेही वाचा – Money Mantra: अर्थव्यवस्थेचा ‘मॅक्रो’ विस्तार, जीएसटीतील उत्पन्न मासिक १.६८ लाख कोटींवर

फिडर फंड म्हणजे काय?

देशाअंतर्गत गुंतवणूकदारांकडून पैसा गोळा करून स्वतःच शेअरचा अभ्यास करून परदेशातील कंपन्यांचा शेअरमध्ये गुंतवणूक करणे हे फंड घराण्यांसाठी खर्चीक ठरते. परदेशी बाजारपेठांचा अभ्यास करणारा तज्ज्ञांचा चमू बाळगणे खर्चीक आहे. अशावेळी परदेशातील एका फंड योजनेत देशाअंतर्गत फंडात गोळा झालेले पैसे थेट गुंतवले जातात. गेल्या काही वर्षांत भारतात परदेशी म्युच्युअल फंड कंपन्यांनी आपले फंड व्यवसाय सुरू केले आहेत. त्यांच्या परदेशातील योजनांमध्ये भारतातून गोळा केलेले पैसे या माध्यमातून गुंतवले जातात.

काही फिडर फंड

  • पीजीआयएम इंडिया ग्लोबल इक्विटी अपॉर्चुनिटी फंड
  • डीएसपी वर्ल्ड एनर्जी फंड
  • फ्रँकलिन इंडिया यूएस अपॉर्चुनिटी फंड
  • एडलवाईज ग्रेटर चायना ऑफ शोअर फंड

‘पराग पारीख फ्लेक्झिकॅप फंड’ या फंडाचा पोर्टफोलिओ थोडा वेगळा आहे. यामध्ये पंधरा टक्के गुंतवणूक ही थेट परदेशी कंपन्यांच्या शेअरमध्ये केलेली आहे म्हणजेच हा फिडर फंड नाही.

पोर्टफोलिओतील परदेशी गुंतवणूक किती असावी?

सध्याच्या बाजाराचा कल लक्षात घेता बहुतांश आंतरराष्ट्रीय बाजारात गुंतवणूक करणारे फंड एखाद्या क्षेत्राशी संबंधित योजनांमध्ये म्हणजेच खाणकाम, नैसर्गिक संसाधने, सोने, अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान कंपन्या यामध्ये गुंतवणूक करतात. थोडक्यात ही गुंतवणूक ‘सेक्टरल फंड’ या प्रकारची असते. यामुळेच पोर्टफोलिओमध्ये ‘रिस्कोमिटर’चा विचार केल्यास याचे प्रमाण सर्वाधिक जोखीम असलेले फंड असेच असते. म्हणूनच अल्पावधीतील लाभापोटी पोर्टफोलिओमध्ये या फंडाचा मोठा सहभाग असणे योग्य नाही.

(लेखात उल्लेख केलेल्या फंड योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी असा सल्ला देण्याचा उद्देश नाही. गुंतवणूकदारांनी सर्व जोखीम घटक पडताळून स्वतःच्या जबाबदारीवर आणि अर्थसल्लागाराच्या मदतीने गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.)