सध्याच्या महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांमध्ये ज्यांचा समावेश होतो अशा दोन व्यक्तींमध्ये सध्या वाद सुरू आहे. ही दोन व्यक्तिमत्त्वे म्हणजे कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि नृत्यांगना गौतमी पाटील. शिर्डी येथे झालेल्या कार्यक्रमात इंदुरीकर महाराज म्हणाले, “कीर्तनकाराने ५ हजार रुपये जास्त मागितले तर लोक म्हणतात यांनी बाजार मांडला; परंतु याच लोकांची तीन गाण्यांसाठी दीड लाख रुपये मोजण्याची तयारी असते. आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंदुरीकर महाराज काय किंवा गौतमी पाटील काय, समाजाला जे हवं आहे त्या लोकरंजनाच्या मागणीची ते पूर्तता करतात. मात्र इंदुरीकर महाराजांच्या ‘आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही.’ या विधानांत समाजाचे प्रबोधन दडले आहे. विमा हा संरक्षणासाठी घ्यायचा असतो, हे महाराजांनी या विधानातून अधोरेखित केले आहे. उद्योजक, ज्यांच्या उत्पन्नावर कुटुंबीयांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे असे कुटुंबप्रमुख, पालक तसेच जे तरुण ज्यांच्या शैक्षणिक कर्जाची परतफेड अद्याप झालेली नाही अशा लोकांना विम्याची नितांत गरज आहे. दुर्दैवाने भारतात विम्याकडे आर्थिक संरक्षणाऐवजी गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते. सर्वसमावेशक आर्थिक नियोजनांत आयुर्विमा एक महत्त्वाचा घटक असतो. विमाधारकाला त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आर्थिक जबाबदाऱ्यांची पूर्तता करताना आयुर्विमा कामास येतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यावर त्या विम्याचे वारसदार म्हणजे लाभार्थ्यांना मृत्यूची भरपाई (डेथ बेनिफिटची) रक्कम दिली जाते. या रकमेतून त्याच्या वारसांनी न फेडलेले कर्ज फेडावे किंवा या रकमेचा विनियोग उदरनिर्वाहासाठी करता येतो.

हेही वाचा – बचतीचे नियोजन आणि विमा कवच

भारतात विमा खरेदी एक तर नियमित उत्पन्न देणारे गुंतवणुकीचे साधन म्हणून किंवा करात वजावट देणाऱ्या प्राप्तिकर कायदा १९६१ च्या ‘कलम ८० सी’अंतर्गत मान्यताप्राप्त गुंतवणूक म्हणून केली जाते. तसेच प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम १० (१०डी)’अंतर्गत मुदतपूर्तीनंतर मिळणारी रक्कम करमुक्त होती, म्हणून विमा घेण्याकडे काहींचा कल असतो. आता या करमुक्त मिळणाऱ्या रकमेसंबंधी मर्यादेत बदल झाला आहे; परंतु विम्याचा मुख्य उद्देश संरक्षण हा आहे. आपल्या सर्वांच्या जीवनात काही उद्दिष्टे असतात, ज्यासाठी पैसा वाचवावा लागतो. दुर्दैवाने कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास तुमची इच्छित उद्दिष्टे पार पाडता यावीत यासाठी जीवन विमा योजना तुम्हाला जीवन संरक्षणासह आर्थिक निधी तयार करण्यात मदत करून ती उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करतात.

यासाठीच केंद्र सरकारने वार्षिक ३३० रुपयांचा (वस्तू आणि सेवा करासहित) हप्ता देऊन दोन लाखांचे विमा छत्र मिळवता येते. ‘पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना’ असे या योजनेचे नाव आहे. १८ ते ५० वर्षे वयोगटातील भारतीय नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. या विमा योजनेत एक वर्षाचे विमा संरक्षण असणारी ही एक आयुर्विमा योजना आहे. हा एक प्रकारचा टर्म प्लान असून दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण आवश्यक असते. बँका व भारतीय आयुर्विमा महामंडळ यांच्या सहयोगाने या योजनेचे परिचालन केले जाते. या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी फक्त बँकेत खाते असणे आवश्यक असते. एकाच व्यक्तीची अनेक बचत खाती असतील तर अशी व्यक्ती कुठल्याही फक्त एकाच बचत खात्याद्वारे हा विमा उतरवू शकेल. विमा उतरविणाऱ्या व्यक्तीचा आधार क्रमांक पायाभूत मानला जातो. योजनेचा कालावधी दर वर्षी १ जून ते ३१ मे असा असून या योजनेचा हप्ता मे महिन्यात देय असतो. विमा हप्ता बँक खात्यातून परस्पर वळता केला जातो. पुढील वर्षाच्या नूतनीकरणाचा अर्ज ३१ मेपर्यंत देणे आवश्यक असतो. विमाधारकाचा कुठल्याही कारणाने मृत्यू झाला तर वारसास दोन लाख रुपये भरपाई मिळते.

हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा- परतावे कसे जोपासावेत?

विमाधारकाने वय वर्षे ५५ पूर्ण केल्यावर या योजनेतील विमा छत्राचा लाभ मिळत नाही. बँकेच्या बचत खात्यात विमा हप्ता म्हणून भरण्यास पुरेशी शिल्लक नसेल तर विमा संरक्षण संपुष्टात येते. तांत्रिक अडचणीमुळे संपुष्टात आलेली विमा पॉलिसी काही अटींची पूर्तता केल्यावर पुन्हा चालू करता येते. ‘पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना’ ही अपघाती विमा योजना आहे. ही योजना १८ ते ७० वर्षे वयोगटातील बँक खाते असलेल्या लोकांसाठी उपलब्ध आहे जे वार्षिक नूतनीकरण आधारावर १ जून ते ३१ मे हा योजनेचा कालावधी असून बँक खात्यासाठी आधार हे प्राथमिक ‘केवायसी’ दस्तऐवज असतो. योजनेंतर्गत जोखीम कव्हरेज म्हणून अपघाती मृत्यू आणि पूर्ण अपंगत्व यासाठी २ लाख रुपये आणि आंशिक अपंगत्वासाठी १ लाख रुपये भरपाई दिली जाते. विमा संरक्षण केवळ वार्षिक २० रुपये हप्ता भरून मिळविता येते. ‘ऑटो-डेबिट’ सुविधेद्वारे खातेदाराच्या बँक खात्यातून वार्षिक २० रुपये कापले जातात. ही योजना सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या किंवा इतर कोणत्याही सामान्य विमा कंपनीद्वारे या योजनेचे परिचालन केले जाते. दारिद्र्यरेषेखालील किंवा अल्प उत्पन्न असलेल्या भारतीय नागरिकांसाठी ही योजना लाभदायक आहे.

या योजनांसाठी अपेक्षित लाभार्थी हा समाजाचा निम्न स्तर असल्यामुळे मध्यमवर्गीय किंवा उच्च मध्यमवर्गीय व्यक्ती ज्यांना जीवन विम्याची गरज जास्त आहे त्यांनी ही पॉलिसी खरेदी करणे योग्य ठरणार नाही. योग्य आर्थिक नियोजनासाठी, एखाद्याला त्याच्या योजनेत बसत नसलेली कोणतीही गोष्ट खरेदी करण्याची गरज नाही, महत्त्वाचे म्हणजे विमा योजना जे नेहमीच एक असे उत्पादन होते. विक्रेत्याला मोबदला देऊन विपणन केले जात होते असे उत्पादन अतिशय अल्प मोबदल्यावर विकले जात आहे. विमा अत्यंत काळजीपूर्वक निवड करण्याची गोष्ट आहे. एखादी पॉलिसी देत असलेले विमा छत्र पुरेसे असायला हवे. जर आपण जीवन विमा आणि अपघाती विम्याचा विचार केला तर विमा छत्र वार्षिक उत्पन्नाच्या किमान १० पट आणि अपघाती विम्यासाठी वार्षिक उत्पन्नाच्या पाचपट असायला हवे. एकंदरीत ही योजना अशा लोकांसाठी चांगली आहे ज्यांच्याकडे कोणताही विमा नाही आणि ज्यांना त्याची खऱ्या अर्थाने सर्वात सामाजिक सुरक्षिततेची जास्त गरज आहे. कीर्तनकार इंदुरीकर महाराज आणि नृत्यांगना गौतमी पाटील यांच्यातील वादाशी घेणे-देणे नसले तरी त्यानिमित्ताने अतिशय महत्त्वाच्या वस्तुस्थितीकडे आपण लक्ष द्यायला हवे हेच सांगावेसे वाटते. ते म्हणजे विमा कंपन्या धर्मादायासाठी व्यवसायात नाहीत. हा व्यवसाय आहे आणि व्यवसाय हा नेहमीच नफा मिळविण्यासाठी केला जातो. म्हणूनच आपण विमा योजना योग्य अभ्यासानंतरच निवडायला हवी.

(shreeyachebaba@gmail.com)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indurikar maharaj what protection do we have we dont have insurance these statements contain the awareness message for society ssb