प्रवीण देशपांडे
व्याज हे पैसे उधार घेण्याच्या विशेषाधिकारासाठी आर्थिक शुल्क आहे. व्याज खर्च किंवा उत्पन्न सामान्यतः टक्केवारी म्हणून व्यक्त केले जाते. पैसे उधार घेण्यासाठी बँक किंवा इतर वित्तीय संस्थेद्वारे आकारले जाणारे पैसे म्हणजे व्याज. तसेच बँकेत किंवा इतर वित्तीय संस्थेतील खात्यात तुमचे पैसे ठेवून तुम्ही कमावलेले पैसे म्हणजे व्याज. व्याज म्हणजे गुंतवणुकीवर मिळालेला परतावा.

नियमित उत्पन्न मिळण्याच्या उद्देशाने पैसे गुंतविले जातात. यासाठी वेगवेगळ्या साधनांमध्ये पैसे गुंतविले जातात. आपल्या अल्प मुदतीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या उद्देशानुसार अशा साधनांमध्ये गुंतवणूक केली जाते. अशा साधनांमध्ये पैसे गुंतविल्यास त्यावर मिळणारे व्याज साधारणतः करपात्र आहे. काही साधनांमधील व्याज हे करमुक्त आहे तर काही साधनांवरील व्याजावर वजावट मिळते. 

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

गुंतवणूकदार आपल्या उद्देशानुसार गुंतवणूक करून त्यावर उत्पन्न मिळवितो. प्राप्तिकर कायद्यानुसार व्याजाचे कोणते उत्पन्न करपात्र आहे आणि कोणते करमुक्त आणि कोणत्या वजावटी मिळतात हे जाणून घेतल्यास करदात्याला करनियोजन करणे सोपे जाईल.

बँकेतील/पोस्टातील बचत खात्यावरील व्याज

बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये प्रामुख्याने बचत, मुदत ठेव, आवर्त ठेव अशा विविध प्रकारचे खाते उघडले जाते. खातेदार आपल्या गरजेनुसार या प्रकारच्या खात्यात पैसे गुंतवितो. बँकेतील खात्यावर ५ लाख रुपयांचा विमा मिळतो. बचत खात्यात कधीही पैसे काढता किंवा जमा करता येतात. यावर मिळणारे व्याज हे इतर प्रकारच्या ठेवींपेक्षा कमी असते.

हेही वाचा >>>Money Mantra : निफ्टीची ‘रोलर कोस्टर राईड’ तुमचा पोर्टफोलिओ काय म्हणतो ?

बचत खात्याच्या व्याजावर वैयक्तिक आणि हिंदू अविभक्त कुटुंबांना (एच.यु.एफ.) प्राप्तिकर कायद्यातील कलम ८० टीटीए नुसार १०,००० रुपयांपर्यंत वजावट मिळते. ही वजावट बँक, पोस्ट ऑफिस, किंवा सहकारी बँकेतील बचत ठेवींसाठी आहे. ज्या करदात्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे अशांना प्राप्तिकर कायद्यातील कलम ८० टीटीबी नुसार ५०,००० रुपयांपर्यंतची वजावट घेता येते. ज्येष्ठ नागरिकांना फक्त बचत खात्यातील व्याजासाठीच नाही तर बँक, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसेमधील कोणत्याही व्याजासाठी घेता येते. कलम ८० टीटीबीनुसार ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी ५०,००० रुपयांची वजावट फक्त निवासी भारतीय नागरिकांसाठीच आहे. अनिवासी भारतीय ज्येष्ठ नागरिक ही ५०,००० रुपयांची वजावट घेऊ शकत नाही. अनिवासी भारतीय कलम ८० टीटीए नुसार १०,००० रुपयांपर्यंतची बचत खात्यातील व्याजाची वजावट घेऊ शकतो. करदात्याने नवीन करप्रणालीचा स्वीकार केल्यास तो ही वजावट घेऊ शकत नाही.

बँकेतील/पोस्टातील मुदत आणि आवर्त ठेवींवरील व्याज

मुदत ठेवींमध्ये ठराविक मुदतीसाठी पैसे गुंतविले जातात. ही मुदत ७ दिवसांपासून १० वर्षांपर्यंत असू शकते. आवर्त ठेव या प्रकारच्या ठेवींमध्ये ठराविक कालावधीने, ठराविक कालावधीसाठी पैसे गुंतविले जातात, या सर्व प्रकारच्या ठेवींमध्ये मिळणारे व्याज करपात्र आहे. बचत खात्यावरील व्याजावर उद्गम कर (टी.डी.एस.) कापला जात नाही. उद्गम कर हा फक्त मुदत आणि आवर्त ठेवींवर मिळणाऱ्या व्याजावर कापला जातो. बँकेतील मुदत ठेवींवरील व्याज एका वर्षात ४०,००० रुपयांपेक्षा (ज्येष्ठ नागरिकांसाठी ५०,००० रुपये) जास्त असल्यास त्यावर १०% दराने उद्गम कर कापला जातो.

ज्या करदात्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी आहे आणि त्यांच्या उत्पन्नावर उद्गम कर कापला गेला तर त्यांना विवरणपत्र भरूनच करपरताव्याचा (रिफंड) दावा करावा लागतो. अशा करदात्यांचा त्रास कमी करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात उद्गम कर न कापण्याची विनंती करण्याची तरतूद आहे. वैयक्तिक करदाते (जे निवासी भारतीय आहेत)  १५ जी किंवा १५ एच या स्वयंघोषित फॉर्मद्वारे (अटींची पूर्तता केल्यास) उद्गम कर न कापण्याची विनंती पैसे देणाऱ्यांना करू शकतात.

हेही वाचा >>> Money Mantra: कमी जोखीम अन् चांगल्या परताव्यासाठी सर्वोत्कृष्ट योजना निवडा, इंडेक्स फंडांबद्दल A टू Z जाणून घ्या

ज्या व्यक्तीला उत्पन्न मिळते आणि ज्याला उद्गम कराच्या तरतुदी लागू आहेत अशांचा परमनंट अकाऊंट नंबर (पॅन) असणे बंधनकारक आहे. ज्या करदात्यांकडे पॅन नाही अशांसाठी उद्गम कर जास्त दराने कापण्याची तरतूद आहे. ज्या करदात्यांकडे पॅन नाही अशांसाठी २०% दराने उद्गम कर कापला जातो आणि पॅन नसल्यामुळे विवरणपत्र दाखल करून त्याचा परतावा घेणे कठीण होते. ज्या करदात्यांनी पॅन आणि आधारची जोडणी अद्याप केलेली नाही अशांचा पॅन आता अक्षम झाला आहे. अशांचा उद्गम कर सुद्धा पॅन नाही असे समजून वाढीव दराने कापण्यात येईल.

कंपनीतील ठेवींवरील व्याज

गुंतवणुकीचा पर्याय म्हणून कंपन्यांच्या ठेवीं सुद्धा लोकप्रिय आहेत. या ठेवींवर बँकातील ठेवींपेक्षा २-३%  जास्त व्याज मिळते. या ठेवीची मुदत सुद्धा वेगवेगळी असते. या कंपन्यांच्या मुदत ठेवींवर, बँकेतील खात्यांवर मिळणारा, ५ लाख रुपयांचा विमा नसतो. कंपनीची पत, त्याचे क्रेडिट रेटिंग तपासून गुंतवणूक करावी. कंपन्यांच्या ठेवींवरील व्याज हे करपात्र आहे. एका आर्थिक वर्षातील व्याज ५,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर १०% दराने उद्गम कर कापण्याची तरतूद देखील आहे. वैयक्तिक करदाते (जे निवासी भारतीय आहेत)  १५ जी किंवा १५ एच या स्वयंघोषित फॉर्मद्वारे (अटींची पूर्तता केल्यास) उद्गम कर न कापण्याची विनंती पैसे देणाऱ्यांना करू शकतात. या व्याजावर कलम ८० टीटीए किंवा टीटीबीनुसार वजावट मिळत नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील व्याज

जे करदाते नोकरी करतात त्यांच्यासाठी भविष्य निधीचा (पीएफ) पर्याय उपलब्ध आहे. परंतु ज्या करदात्यांना भविष्य निधीचा (पीएफ) पर्याय उपलब्ध नाही ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) खाते, बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये, उघडू शकतात. या खात्यात एका आर्थिक वर्षात १,५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकतात. या जमा केलेल्या रकमेची वजावट करदाता कलम ८० सी नुसार घेऊ शकतो. करदात्याने नवीन करप्रणालीचा स्वीकार केल्यास ही वजावट तो घेऊ शकत नाही. या पीपीएफ खात्यावर दर वर्षी व्याज जमा होते. हे व्याज करमुक्त आहे. या खात्यातून पैसे काढल्यास ते करपात्र नाहीत.

हेही वाचा >>> Money Mantra : ‘हे’ खर्च आणि गुंतवणूक’ कर सवलतीस पात्र आहेत हे तुम्हाला माहितेय का?

अनिवासी भारतीयांसाठी एन.आर.ई. आणि एब.आर.ओ खात्यावरील व्याज

अनिवासी भारतीय “अनिवासी बाह्य” (एन.आर.ई.) किंवा “अनिवासी साधारण” (एन.आर.ओ.) खाते बचत किंवा मुदत ठेवींच्या स्वरुपात उघडू शकतात. एन.आर.ई. खात्यात अनिवासी भारतीय त्यांची विदेशी कमाई भारतीय रुपयांमध्ये ठेवू शकतात आणि व्यवस्थापित करू शकतात. या खात्यातील निधी कोणत्याही निर्बंधांशिवाय परदेशात परत हस्तांतरित केला जाऊ शकतो. या खात्यात मिळणारे व्याज, एक्सचेंज नियंत्रण कायद्यांतर्गत “भारताबाहेर राहणारी व्यक्ती” म्हणून पात्र असेल तर, करमुक्त आहे. “अनिवासी साधारण” एन.आर.ओ. खात्यात अनिवासी भारतीयांनी भारतात कमावलेले त्यांचे भाडे, लाभांश, निवृत्ती वेतन इत्यादी जमा केले जाते. ते परदेशी स्त्रोतांकडून निधी जमा करण्यासाठी देखील वापरले जाऊ शकते. या खात्यातील निधी परदेशात हस्तांतरित करण्यात निर्बंध आहेत. काही अटींची पूर्तता केल्यास पैसे परदेशात पाठविले जाऊ शकतात किंवा एन.आर.ई. खात्यात हस्तांतरित केले जाऊ शकतात. या खात्यात मिळालेले व्याज हे करपात्र आहे आणि यावर उद्गम कर देखील कापला जातो. यासाठी किमान उत्पन्नाची मर्यादा नाही.

Story img Loader