Money Mantra प्रश्न १: इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असणारा ‘फ्री लूक पिरीयड’ म्हणजे काय ?
उत्तर : पॉलिसी घेत असताना कधी कधी चुकीची पॉलिसी अपुऱ्या माहितीमुळे किंवा दबावाखाली घेतली जाते, अशी घेतलेली पण नको असलेली पॉलिसी या कालावधीत रद्द करता येते . या कालावधीस ‘फ्री लूक पिरीयड’ असे म्हणतात.
प्रश्न २ : फ्री लूक पिरीयड किती दिवसांचा असतो?
उत्तर : या आधी हा कालावधी डिजिटल स्वरुपात घेतलेल्या पॉलिसीसाठी ३० दिवस तर प्रत्यक्ष स्वरुपात घेतलेल्या पॉलिसीसाठी १५ दिवस एवढा होता. मात्र आता आयआरडीएने नुकत्याच दिलेल्या सूचनेनुसार १ एप्रिल २०२४ पासून हा कालावधी दोन्ही स्वरुपात घेतलेल्या पॉलिसीसाठी ३० दिवस एवढा असेल.
हेही वाचा…Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
प्रश्न ३: फ्री लूक पिरीयड कसा ठरविला जातो?
उत्तर : पॉलिसीधारकास पॉलिसी मिळालेल्या तारखेपासून (प्रत्यक्ष किंवा मेल/ एसएमएस/ व्हॉटस्पअॅवर मिळालेल्या तारखेपासून) ३० दिवसांच्या आत पॉलिसी रद्द करता येते.
प्रश्न ४: फ्री लूक पिरीयडमध्ये पॉलिसी रद्द करताना खर्च होतो का?
उत्तर : फ्री लूक पिरीयडमध्ये पॉलिसी रद्द करताना स्टॅम्प ड्युटी, कुरिअर चार्जेस यासारखे अनुषंगिक खर्च वजा जाता प्रीमियमची उर्वरित रक्कम परत दिली जाते.
हेही वाचा…क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…
प्रश्न ५: : फ्री लूक पिरीयड मध्ये पॉलिसी रद्द केल्यानंतर किती दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होत असते?
उत्तर : आयआरडीएच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया १५ दिवसांच्याआत पूर्ण करणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे इन्शुरन्स कंपन्या ही प्रक्रिया ५ ते ६ दिवसांत पूर्ण करतात.