गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजाराशी संबंधित जे वृत्त पुढे येत आहे, त्यामध्ये भारतातील शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे, एकूणच शेअर बाजार वगळता गुंतवणुकीचे कुठलेच पर्याय उपलब्ध नाहीत असेच बहुसंख्य लोकांना वाटू लागले आहे, अशा तऱ्हेचे चित्र रंगवले जात आहे.

शेअर बाजारात पैसा गुंतवण्याची मानसिकता तयार होणे आणि शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठीचे ज्ञान असणे यातील दरी मात्र अजिबातच दूर झालेली नाही. शेअर बाजार हे सोन्याची अंडी देणारी कोंबडी, अशा प्रकारचे स्वरूप नाही हे समजून घेण्यात नवगुंतवणूकदार कुठेतरी अपयशी ठरत आहेत हे नक्कीच.

हेही वाचा – बाजारातली माणसं : ब्रह्मा, विष्णू, महेश – शशिधर जगदीशन

ऑनलाइन माध्यमातून एका क्लिकवर शेअर खरेदी-विक्रीचे पर्याय उपलब्ध झाल्याने आणि त्यातून व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा समाजमाध्यमांच्या सह-अस्तित्वामुळे शेअर विकत घेणे सुलभ झाले आहे.

‘पोर्टफोलिओ बांधणे’ ही एक कला आहे तितकेच ते शास्त्रही आहे

‘बाजाराचा विचार करू नका, बाजारात पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करा’ अशी आकर्षक वाक्यं वाचल्यानेच जणू काही शेअर बाजारातून पैसा मिळेल की काय असे लोकांना वाटू लागले नाही तरच नवल. त्यातून गेल्या वर्ष-दीड वर्षात आलेले प्रारंभिक समभाग विक्रीचे (आयपीओ) पीकही याला कारणीभूत आहे. एखाद्याने पत्ते पिसावे आणि सगळेच हुकमाचे एक्के आपल्याला मिळावेत किंवा दोन फाशांमध्ये सलग आपल्यालाच सहा आणि सहा पडावेत एवढ्या सहज ‘आयपीओ’तून पैसे मिळतात असे लोकांना वाटू लागले आहे.

प्रत्येक कंपनी आयपीओमधील जोखमीचे तपशीलवार वर्णन करणारी एक पुस्तिका (डीआरएचपी) छापत असते. त्याचबरोबर ‘आयपीओ’ बाजारात येताना वर्तमानपत्रात ज्या जाहिराती केल्या जातात त्यामध्ये ठळक अक्षरात कंपनीच्या व्यवसायाबद्दलची जोखीमही स्पष्टपणे लिहिलेली दिसते. याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून बाजार तेजीत आहेत ‘घ्या आयपीओमध्ये उडी’ अशा प्रकारे नवगुंतवणूकदारच नव्हे तर जुन्याजाणत्यांचीही बदलती भूमिका दिसायला लागली आहे.

‘आयपीओ’मध्ये लागलेले शेअर नेमके कधी विकायचे?

हा प्रश्न जेव्हा गुंतवणूकदाराला पडतो, याचाच अर्थ त्याला आयपीओमध्ये पैसे का ठेवायचे होते तेच कळलेले नाही. ‘आयपीओ’मधून आपल्याला शेअर मिळाले तर पहिल्याच दिवशी ते किती टक्के वर गेल्यावर मी ते विकणार आहे? किंवा मी किती वर्षे तो शेअर माझ्या पोर्टफोलिओचा भाग म्हणूनच ठेवणार आहे? किंवा ठरावीक टक्के किमतीत वाढ झाली तर मी तो शेअर विकणार आहे? याचा विचार गुंतवणूकदार करतात का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

‘तुम्ही आयपीओमध्ये पैसे का गुंतवले?’

या प्रश्नाची जी विनोदी उत्तरे मला मिळाली त्यामधील तीन उत्तरे मला चिंता वाढवणारी वाटतात. १) कधीच ‘आयपीओ’त पैसे टाकायचा विचार केला नव्हता, पण या वेळेला टाकून बघू या २) आयपीओ चांगल्या किमतीवर सूचिबद्ध झाला तर फायदा, नाहीतर ‘लॉस बुक करू’ ३) ‘आयपीओ’मध्ये शेअर मिळाले, की पहिल्या दिवशीचा भाव पाहून ठरवता येईल की, विकायचे की नाही. या तिन्ही प्रतिक्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने गुंतवणूक करायची इच्छा नाही तर एखादी जत्रेतील वेगळ्या आकाश पाळण्याची चक्कर मारून बघू या, तसाच एक अनुभव घेऊन बघू या अशी भूमिका वाटते.

शेअर बाजारातील चढउतारांचा कोणताही अभ्यास न करता किंवा तेवढे मानसिक परिश्रम न घेता थेट वायदे बाजारातच पैसे गुंतवणूक करायची अभिलाषा बाळगणारे अधिकच धोकादायक ठरतात. सध्या बाजाराची अवस्था मागच्या दहा वर्षांत जशी राहिली आहे तशीच कायमस्वरूपी राहणार आहे व त्यात कधीच चढउतार येणार नाहीत असा प्रबळ आत्मविश्वास असलेले गुंतवणूकदार तुम्हाला सकारात्मक विचार देऊन जातात. पण ते वास्तव मान्य करायला तयार असतातच असे नाही. त्यातही उधार घेतलेल्या पैशांनी ‘ट्रेडिंग’ करणाऱ्यांविषयी बोलणेच अवघड!

हा सगळा गुंतवणुकीचा ‘तत्त्वज्ञानाचा पाठ’ आता का वाचायचा? हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पण बाजार ऐतिहासिक उच्चांकाच्या स्थितीत असताना गुंतवणूकदार म्हणून आपण अधिक सावध राहायला हवे.

अखेर ‘फेड’कृपा झाली

बहुप्रतीक्षित असलेली अमेरिकेतून येणारी सुवार्ता अखेर आलीच. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेचे धोरण आता थोडेसे मवाळ होऊ लागले आहे, असे म्हणायला हरकत नाही. तब्बल सहा महिन्यांपासून प्रतीक्षेत असलेले व्याजदर कपातीचे धोरण आता प्रत्यक्षात यायला सुरुवात झाली आहे. या धोरणाच्या पहिल्याच टप्प्यात अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’ने व्याजदर अर्धा टक्का कमी करून बाजारांना सुखद धक्का दिला. २०२० या वर्षात झालेल्या व्याजदर कपातीनंतर म्हणजे चार वर्षांनंतर केलेली व्याजदर कपात ही जगभरातील बाजारांसाठी हा आश्वासक सूर मानला जात आहे. मागच्या आठवड्यात युरोपियन सेंट्रल बँकेने (युरोपियन युनियनची मध्यवर्ती बँक) दुसऱ्यांदा व्याजदरात कपात करण्याचे ठरवले. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर झालेला दिसला. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) बाजारात जोरदार खरेदी सुरू ठेवली, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी तेजीचा फायदा घेऊन नफावसुली केली. २० सप्टेंबर रोजी झालेल्या सत्रात परदेशी गुंतवणूकदार खरेदी करताना तर देशांतर्गत गुंतवणूकदार विक्री करताना दिसले. बऱ्याच आठवड्यांनी सगळे क्षेत्रीय निर्देशांक आठवड्याच्या अखेरीस वरच्या दिशेला बंद झालेले दिसले. आतापर्यंत देशांतर्गत शेअर बाजारात यावर्षी झालेल्या परदेशी गुंतवणुकीपैकी आश्वासक आकडा सप्टेंबर महिन्याचाच राहिला आहे. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत परदेशी गुंतवणूकदार विक्री करत होते. मात्र आता हे चित्र बदलायला सुरुवात झाली आहे. बँकिंग, औषध निर्माण कंपन्या, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा खरेदीला सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – बाजार रंग: साखळी दुकाने ते ई कॉमर्स – रिटेल क्षेत्रातील बदलत्या संधी

रिझर्व्ह बँक अमेरिकेच्या केंद्रीय बँकेच्या पावलावर पाऊल ठेवून भारतात व्याजदर कपात करेल अशी अपेक्षा सध्या थोडी धाडसी वाटते. या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात आपण आलो आहोत. मान्सून समाधानकारक राहिला आहे. जर कृषी क्षेत्राने तारले तर महागाई नियंत्रणात राहिल्याने रिझर्व्ह बँकेची भूमिकासुद्धा बदलली जाईल. अमेरिकी ‘फेड’च्या व्याजदर कपातीच्या वृत्तामुळे वरच्या दिशेने गेलेल्या बाजारांवर आपण खूश व्हायचे? की कंपन्यांच्या निकालावर आधारित किमतीतील बदलांवर? याचा निर्णय सुजाण गुंतवणूकदारांनी घ्यायचा आहे.
कारण, शेअर बाजार म्हणजे ‘थ्रिल’ नाही, शास्त्र असतं ते!