कौस्तुभ जोशी, अर्थ विश्लेषक
गेल्या आठवड्यात भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाची शिखर संस्था असलेल्या AMFI ने म्युच्युअल फंडांना आपल्या जाहिरातीमध्ये फक्त दहा वर्षातील रिटर्न छापावेत अशी सूचना केली आहे. यानिमित्ताने गुंतवणूकदार जागरूकता आणि प्रशिक्षण मोहीम अधिक बळकट झाली आहे असे म्हणता येईल. आजच्या लेखातून याच दोन रिटर्न्स मधला फरक समजून घेऊया.
कोणतेही म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी निवडताना नेमक्या कोणत्या योजनेची निवड करायची ? हा प्रश्न गुंतवणूकदारांसमोर नेहमीच असतो. गुंतवणुकीसाठी जे निकष जुन्या काळापासून सांगण्यात आले आहेत, त्यासाठी सरकारमान्य असे नियम वगैरे नाहीत.
पण पुढील गोष्टी गुंतवणूकदारांनी बघायलाच हव्यात.
· फंड घराणं किती जुने आहे ?
· त्यांच्या किती फंड योजना सध्या अस्तित्वात आहेत ?
· तुमची फंड योजना सांभाळणाऱ्या फंड मॅनेजरने अन्य कोणत्या योजना सांभाळल्या आहेत ?
· त्याचे रिटर्न्स कसे आहेत ?
या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे फंडाचा मध्यम आणि दीर्घकालीन परफॉर्मन्स कसा आहे हे गुंतवणूकदारांनी समजून घेतले पाहिजे.
फंड योजना कशी पहावी ?
एखाद्या फंडाचे दोन किंवा तीन वर्षासाठीचे रिटर्न्स बघून त्यात गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते. एखाद्या फंडाच्या एकूण पोर्टफोलिओमध्ये फंड मॅनेजरने निवडलेला शेअर समजा दहा ते बारा टक्के एवढा असेल आणि तो शेअर दोन-तीन महिन्याच्या कालावधीत घसघशीत वाढ देऊन गेला तर त्या फंड योजनेमध्ये गुंतवणूकदार लगेचच गुंतवणूक करायला सुरुवात करतात.
दहा वर्षाचे निकाल का महत्वाचे याचे एक कारण आहे. एखादी फंड योजना बाजारात आल्यावर त्या योजनेत गुंतवणूकदार पैसे गुंतवायला सुरुवात करतात. ते पैसे फंड मॅनेजर शेअर बाजारात गुंतवतो व दीर्घकाळात उत्तम परतावा देईल असा पोर्टफोलिओ तयार करतो. यावेळी जोखीम कमी व्हावी म्हणून किती शेअर्स घ्यायचे ? एका सेक्टर मधले एकूण पोर्टफोलिओच्या किती टक्के शेअर्स विकत घ्यायचे ? एका सेक्टर मधल्या आघाडीच्या दोनच कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे ? का चार ते पाच कंपन्यांचे शेअर्स विकत घ्यायचे ? याची रणनीती इन्व्हेस्टमेंट प्रत्येक फंड मॅनेजरची आणि फंड हाऊस ची वेगवेगळी असते.
असेही दिसून आले आहे की, सहा ते आठ महिन्यात किंवा दोन ते तीन वर्षे अशा अल्प कालावधीत एखाद्या फंड योजनेने आकर्षक नव्हे तर अविश्वसनीय वाटावे असे रिटर्न दिले आहेत पण त्याच फंड योजनेचा सात ते दहा वर्षातील परतावा निफ्टी आणि सेन्सेक्सच्या आसपासही नाही !
बेभरवशाचे फंड टाळा
म्युच्युअल फंडातील योजनेचे रिटर्न्स मार्केट तेजीत असते त्यावेळेला कायमच चांगले दिसतात. पण ज्या वेळेला मार्केटमध्ये विक्रीचा सपाटा सुरू असतो म्हणजेच शेअर बाजाराचा पडता काळ सुरू असतो त्यावेळी तो फंड कसे रिटर्न्स देतो ? हे पडताळून पाहिले पाहिजे. यामुळे ती फंड योजना जोखीम व्यवस्थापन (Risk Management ) कशाप्रकारे करते हे आपल्याला समजते.
Absolute आणि CAGR यातील फरक समजून घ्या.
समजा तुम्ही एखाद्या फंड योजनेत दरमहा 1000 रुपयाची एसआयपी केली आहे आणि तीन वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 49150 रुपये आहे; मग तुमच्या फंडाने किती रिटर्न दिला ? जर Absolute रिटर्न गृहीत धरले तर 36 टक्के रिटर्न दिला आहे; पण CAGR (Compound Annual Growth Rate) वार्षिक रिटर्न्स धरले तर 21.27% रिटर्न मिळाले आहेत. याचाच अर्थ जर Absolute रिटर्नकडे बघून एखाद्या गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली तर तो चुकीचा निर्णय ठरेल.
जाहिरात बघून गुंतवणूक टाळा
गृहपयोगी वस्तू आणि गुंतवणूक विषयक योजना यामध्ये मूलभूत फरक आहे. गुंतवणूक ही दीर्घकाळात फळाला येण्यासाठी करायची असते व यामुळेच जाहिरातीतील फक्त बघून गुंतवणूक करणे जागरूक गुंतवणूकदारांनी टाळले पाहिजे. यासाठी प्रत्येक फंड योजनेचा अभ्यास करून मगच गुंतवणूक निर्णय घेतला पाहिजे. फंड योजना चांगली असली तरीही आपल्या ध्येयांशी ती जुळली पाहिजे हे नेहमी लक्षात ठेवावे.