भालचंद्र जोशी
तुमचा ‘पोर्टफोलिओ’चे बाजार मूल्य वर्षभरापूर्वी ३० लाख रुपये असेल आणि तुमची ५० हजार रुपयांची ‘एसआयपी’ सुरू असेल तर तुमच्या ‘पोर्टफोलिओ’चे बाजार मूल्य आज साधारण ३२-३३ लाखांच्या दरम्यान असेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही मागील वर्षभरात केलेल्या गुंतवणुकीवर नफा झालेला नाही.
या पार्श्वभूमीवर ‘एसआयपी’ सुरू ठेवावी का, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडणे साहजिक आहे. जगभरात आज अशीच परिस्थिती आहे. किंबहुना भारतातील गुंतवणूकदारांनी स्वत:ला नशीबवान समजायला हवे. जगभरातील सर्वात चांगला परतावा भारतीय भांडवली बाजाराने दिला आहे. हा लेख लिहिताना सेन्सेक्स ५७,९२५ वर, तर निफ्टी १७,०७६ वर बंद झाला. सेन्सेक्स मागील ३६५ दिवसांत, ५०,९२१ ते ६३,५८३ दरम्यान, तर निफ्टी १५,७८३ ते १८,८८७ दरम्यान राहिला.
एक यशस्वी गुंतवणूकदार आणि संपत्तीचा साठा करण्यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक लक्ष्यांवर लक्ष केंद्रित करायला हवे. तुमच्याजवळ विशिष्ट आर्थिक लक्ष्य नसल्यास महागाईपेक्षा अधिक परतावा मिळविणे हेसुद्धा एक लक्ष्य असू शकते. तुमच्या आर्थिक नियोजनांत विविध आर्थिक लक्ष्यांचा समावेश असतो. ‘गोल सेटिंग’ किंवा आर्थिक लक्ष्य विकसित करणे हे वित्तीय नियोजनाचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. आर्थिक नियोजनांत आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट असायला हवीत. तसे झाल्यास ती उद्दिष्टे गाठण्यात उपलब्ध गुंतवणूक साधनांचा आढावा घेऊन, योग्य साधनांच्या निवडीने त्या आर्थिक उद्दिष्टांचा पाठपुरावा करणे शक्य होते. थोडे अधिक तपशिलाने आर्थिक लक्ष्य महत्त्वाचे का आहेत ते शोधू या.
ध्येय निश्चित करण्याच्या प्रक्रियेची आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांचे नियोजन करताना, तुम्हाला विचारात घ्यायच्या असलेल्या वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलू.
दिशा: आर्थिक उद्दिष्टे तुमच्या गुंतवणुकीच्या प्रयत्नांना दिशा आणि अर्थ देतात. ते तुमच्या भावना नियंत्रित करणे किंवा आर्थिक उद्दिष्टांना चिकटून राहणे यापैकी कोणाला महत्त्व द्यायचे हे तुम्हाला सांगतात. ते तुम्हाला तुमच्या दीर्घकालीन लक्ष्याला केंद्रित करण्यात मदत करतात.
प्रेरणा: आर्थिक उद्दिष्टे ऊर्जा प्रदान करतात आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणूक प्रक्रियेत शिस्तबद्ध राहण्यास मदत करतात. तुमची उद्दिष्टे तुमच्यासाठी महत्त्वाची असली पाहिजेत. जेणेकरून ते तुम्हाला त्यांच्या दिशेने कार्य करत राहण्यासाठी प्रेरणा मिळेल.
उत्तरदायित्व: तुमची उद्दिष्टे लिहून ठेवणे आणि तुमच्या प्रगतीसाठी जबाबदार असणे (मग ते फक्त तुमच्यासाठी असो किंवा इतर काही महत्त्वाच्या व्यक्तींसाठी) तुम्ही कसे प्रगती करत आहात याबद्दल तुम्हाला सतत जागरूक ठेवते. तुमच्या ध्येयांचे नियमितपणे पुनरावलोकन केल्याने तुम्हाला योग्य त्या मार्गावर आणण्यास मदत होते.
सिद्धी: तुमची आर्थिक उद्दिष्टे गाठणे तुम्हाला सिद्धीची भावना प्रदान करते. महत्त्वाचे टप्पे गाठल्यावर (जसे की आर्थिक उद्दिष्टांची ५० टक्के पूर्ती होणे) तुमच्या उद्दिष्टांशी प्रामाणिक राहण्याची प्रेरणा मिळते.
निफ्टी आणि सेन्सेक्स दर १५ सेकंदाला आपले मूल्य बदलत असतात. म्हणूनच वार्षिक, त्रैमासिक, अगदी दैनंदिन बदलांसह शेअर बाजार अत्यंत अस्थिर असतो ही अस्थिरता गुंतवणुकीतील जोखीम समजली जाते. परंतु या अस्थिरतेशी योग्यरीत्या सामना केल्यास तीच गुंतवणूकदारांना ठोस परतावा देऊ शकते. जरी बाजारात चढ-उतार, झाले तरीही बाजारात गुंतवणुकीची संधी कायमच उपलब्ध असते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना जसे की, महागाई व्याजदरातील बदल, आर्थिक धोरणे, बाजाराच्या दिशात्मक बदलाला कारणीभूत ठरतात आणि अस्थिरतेस मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, अनेक देशांमध्ये, जेव्हा मध्यवर्ती बँकांकडून एका दिवसासाठी कर्ज घेण्याचे व्याज दर कमी करतात तेव्हा शेअर बाजारात त्याची प्रतिक्रिया उमटते. महागाई निर्देशांकातील बदल, तसेच औद्योगिक उत्पादन, कर संकलन यांची आकडेवारी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया बाजारात उमटते. या प्रतिक्रिया तत्कालीन स्वरूपाच्या असतात. मंदीत उमटणारी उच्च पातळीची अस्थिरता ‘पोर्टफोलिओ’वर थेट परिणाम करते. ज्यामुळे गुंतवणूकदारांवर ताण वाढतो, कारण त्यांच्या पोर्टफोलिओच्या बाजार मूल्यात घसरण होते. सहसा गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओच्या मूल्यात घसरण झालेली आवडत नाही. याउलट बाजारातील घसरण ही नव्याने खरेदी करण्याची संधी असते. बाजाराचे वर्तन असेच असते, ऊन-पावसाच्या खेळासारखे. वेगाने रंग बदलणाऱ्या बाजाराकडे पाहताना मला कवी मंगेश पाडगांवकरांच्या ओळी आठवतात –
कधी निराशा खिन्न दाटली, कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती निळेनिळे चांदणे भेटले
आज जरी मनात खिन्नता दाटली तरी उद्याच्या निळ्या चांदण्यासाठी आजच गुंतवणूक करायला हवी.
bhalchandra@cybrilla.com
( लेखक सायब्रिला टेक्नोलॉजी लिमिटेडमध्ये ग्लोबल स्ट्रॅटेजी आणि ऑपरेशन्स विभागाचे प्रमुख आणि सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर (सीएफपी) आहेत. )