गुंतवणूकदारांना २७ सप्टेंबर २०२४ ही तारीख व्यवस्थित लक्षात असेल. कारण, या दिवशी ‘निफ्टी-फिफ्टी’ निर्देशांकाने २६,२७७ अंशांची ऐतिहासिक पातळी गाठली. आघाडीच्या ५० कंपन्यांचा सहभाग असणाऱ्या या निर्देशांकावर, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’पेक्षा जरा जास्तच लक्ष दिलं जातं.

जागतिक गुंतवणूकदारदेखील याकडे लक्ष ठेवून असतात आणि त्यानुसार त्यांचे निर्णय घेत असतात. मात्र शुक्रवारचा तो दिवस संपल्यावर पुढे सोमवारी म्हणजे ३० सप्टेंबरला बाजार ११७ अंशांच्या घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली आणि तिथून जी घसरगुंडी सुरू झाली ती, २१ नोव्हेंबरपर्यंत सुरूच राहिली. या काळात निफ्टी उच्चांकी पातळीपासून सुमारे ११ टक्के खाली आला आहे. २६ जून ते २७ सप्टेंबरदरम्यान झालेली वाढ पूर्णपणे शून्य झालेल्याची जाणीव अनेकांना झाली असेल. मात्र मागील ५-६ दिवसांतील बाजाराची स्थिती पाहून अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असतील, की बाजार पडायचा थांबला असं वाटतंय. मात्र आपल्या देशाची दुसऱ्या तिमाहीची कामगिरी फारशी समाधानकारक नाहीये. जुलै-सप्टेंबरचे सकल देशांतर्गत उत्पादनाचे (जीडीपी) आकडे अपेक्षेपेक्षा कमी आले आहेत. विकासवेग ६.५ टक्के अपेक्षित असताना तो ५.४ टक्क्यांवरच थांबला आहे. मात्र चालू तिमाहीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, कारण सणवार, मतदान आणि सरकारी योजनांखाली झालेल्या वाढीव खर्चांमुळे तरी अर्थव्यवस्थेला आधार मिळेल असं वाटतंय.

Tax on someone elses income
दुसऱ्याच्या उत्पन्नावर कर
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Freebies help incumbent parties in Maharashtra
अग्रलेख: ‘ममीफाइड’ मध्यमवर्ग!
Bharat Gogawale on Eknath Shnde
“…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करेन”, गोगावलेंनी सांगितल्या शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडी
actress Shobitha Shivanna suicide
अभिनेत्री शोभिता आढळली मृतावस्थेत, राहत्या घरी संपवलं आयुष्य
devendra fadnavis name confirmed for maharashtra chief Minister
फडणवीसच; पण गृह कोणाकडे? एकनाथ शिंदे मुंबईत परतल्याने खातेवाटपाची चर्चा आजपासून
Devendra Fadnavis vs Sanjay Raut
“…अन्यथा आम्ही आमचं पुस्तक उघडू”, राऊतांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “भाजपा मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांऐवजी…”

आणखी वाचा-बाजार रंग – बाजार सरकारी खर्चाच्या प्रतीक्षेत?

इथे मात्र एक गोष्ट नक्कीच लक्षात घेण्याजोगी मला वाटते ती म्हणजे, वरकरणी जरी प्रमुख निर्देशांक १० टक्के पडलेले दिसत असले तरीसुद्धा या काळात काही समभाग मात्र त्याहून अधिक घसरले आहेत. त्यांच्यात पडझड आधीच सुरू झाली होती. उदा. ॲक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, टाटा मोटर्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, सोभा डेव्हलपर्स, सिप्ला, फोर्स मोटर्स, एमआरएफ, डीमार्ट आणि असे अनेक कितीतरी कंपन्यांचे समभाग आहेत. आपला बाजार पडला की, आपण सगळं खापर परदेशी गुंतवणूकदारांवर फोडतो. त्यांनी पैसे काढायला सुरुवात केली म्हणजे आपला बाजार कोलमडतो. हे आपण मागील अनेक वर्षे पाहत आलेलो आहे, परंतु दुसरीकडे आपल्याकडे भरपूर पैसे हे म्युच्युअल फंडातील मासिक गुंतवणुकीमुळे बाजाराकडे वळलेले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या १०-१५ दिवसांत हे पैसे वेगवेगळ्या म्युच्युअल फंडांच्या योजनांच्या माध्यमातून बाजारात गुंतवले जातात. म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून २५,००० कोटींपेक्षा जास्त रक्कम अशा रीतीने बाजारात येते. या आर्थिक वर्षात, सात महिन्यांमध्ये १.५९ लाख कोटी हे फक्त ‘एसआयपी’मधून आलेले आहेत. जर बाजारातील परदेशी गुंतवणूक आणि देशांतर्गत गुंतवणूक बघितली तर मागील ३-४ महिन्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी १.६३ लाख कोटी पैसे बाहेर काढले आहेत, तर देशांतर्गत संस्थांनी २.२५ लाख कोटी इतकी गुंतवणूक केलेली आहे. असं असूनदेखील बाजारात पडझड थांबलेली नाही. याची काही कारणं तर अगदी सरळ आहेत.

पहिलं कारण आहे ते, जुलै ते सप्टेंबर तिमाहीचे निकाल. अनेक कंपन्यांचे निकाल अपेक्षेपेक्षा खराब होते. काही कंपन्यांनी तर इथून पुढील ६-९ महिने परिस्थिती फार चांगली नसल्याचे संकेत दिले आहेत. दुसरीकडे, महागाई काही खाली यायचं नाव घेत नाहीये. एखाद दुसरा महिना वगळता महागाई ४.५ टक्क्यांच्या वर कायम आहे. दुसरीकडे जागतिक परिस्थितीसुद्धा फारशी प्रतिकूल नाहीये. इराण-इस्रायल आणि रशिया-युक्रेन ही दोन्हीही युद्ध आणखी भडकतील हे सांगता येत नाहीये. अशा जागतिक पातळीच्या आव्हानांसमोर आपला पोर्टफोलिओ सांभाळायचा म्हटला की, उदयोन्मुख अर्थव्यवस्थांपेक्षा विकसित अर्थव्यवस्थांमध्ये पैसे गुंतवलेले केव्हाही बरे. म्हणून मग परदेशी गुंतवणूकदारदेखील नफा कमावून आपल्या बाजारातून बाहेर पडतात आणि अमेरिकी सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवतात. शिवाय ऑक्टोबरमध्ये चीन सरकारने आपली देशांतर्गत परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक उपक्रम जाहीर केले. म्हणून काही पैसे त्या बाजाराकडेसुद्धा वळले आहेत.

आणखी वाचा-बाजार रंग – बाजार सरकारी खर्चाच्या प्रतीक्षेत?

शेअर बाजार सोडून जर आपण सोन्या-चांदीकडे वळलो तर असं लक्षात येतं की, गेल्या वर्षभरात ‘निफ्टीफिफ्टी’पेक्षा जास्त परतावे या दोन मौल्यवान धातूंकडून मिळालेले आहेत. शिवाय काही ठिकाणी स्थावर मालमत्तेतूनसुद्धा चांगले परतावे काढता आलेले आहेत. जागतिक स्तरावर पाहिलं तर आभासी चलनामधून (क्रिप्टोकरन्सी)सुद्धा मागील दोन महिन्यांमध्ये तुफान नफा मिळाला आहे. अमेरिकेतील बाजारसुद्धा तेथील निवडणुकीनंतर वर गेलेला आहे. तेथील काही कंपन्यांचे परतावे डोळे विस्फारण्याजोगे आहेत, परंतु तिथेसुद्धा महागाई वाढतेय आणि कंपन्यांचे तिमाही परिणाम संमिश्र आहेत.

या सर्व गोष्टींचा जर एकत्र विचार करायचा ठरवला तर एक गुंतवणूकदार म्हणून जी गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती आहे – संपत्तीचे विविधीकरण. कुठलाही पोर्टफोलिओवरील प्रकारच्या परिस्थितीतून जाताना खूप वर-खाली होऊ शकतो. त्यातील घटकांचं प्रमाण जर योग्यरीत्या सांभाळता आलं नाही, तर एक तर नुकसान खूप होऊ शकतं किंवा भरपूर काळ त्या पोर्टफोलिओची कामगिरी मनाजोगी नसेल.

आज आपला बाजार जर फक्त १० टक्के पडला आहे आणि पुढे कधी तरी तो अजून १५ टक्के ते २० टक्के पडला तर आपल्या पोर्टफोलिओचं काय होऊ शकतं याचा अंदाज आतापासून घेणं महत्त्वाचं आहे. आपण मागे वाळू बघितलं तर अशा पद्धतीने या आधीसुद्धा बाजार पडला होता आणि त्यानंतर पण तो चांगलाच वर आला होता, परंतु तो वेग आता बाजाराला नाहीये. इथून पुढे ज्याची कामगिरी चांगली त्याला डोक्यावर आणि ज्याची नाही तो बाकावर पण नाही तर सरळ वर्गाच्या बाहेर! आणि मग अशा कंपन्या परत कधी गुंतवणूकदारांच्या लक्षात येतील हे माहीत नाही. म्युच्युअल फंडांची कामगिरी तपासायची ठरवली तर स्मॉल आणि मिडकॅप फंड हे लार्ज आणि फ्लेक्झी कॅप फंडांच्या तुलनेत जास्त पडलेले आहेत. यामागे काही ठिकाणी अदानी समूहाच्या कंपन्यांमधील गुंतवणूकसुद्धा कारणीभूत आहे, परंतु तरीसुद्धा बदलत्या परिस्थितीनुसार, पोर्टफोलिओ बदलायचे संकेत आता बाजाराकडून मिळायला लागले आहेत. तेव्हा येणाऱ्या काळात आपल्या पोर्टफोलिओमध्ये जोखीम कुठे आणि किती आहे याचं विश्लेषण नक्की करा.

आणखी वाचा-बाजारातली माणसं : गुंतवणूकदारांचा रॉबिनहूड -मिचेल प्राइस

गरजेपेक्षा जास्त आणि नको तिथे जोखीम घेण्याचे हे दिवस नाहीत. भले आता महाराष्ट्रातील निवडणुकीचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि कदाचित काहीअंशी आपल्या बाजारावर त्याचा परिणाम कदाचित दिसेल, परंतु या गोष्टीवरून पुढील अंदाज बांधू नये असं मला वाटतं. बाजारात पैसे तेव्हाच येतात जेव्हा कंपन्यांची पुढील कामगिरी, सरकारी धोरणं, महागाई, व्याजदर, इतर जागतिक घडामोडी, हे सर्व अनुकूल असता. सध्या याबाबत साशंकता असल्याने जरा जपूनच गुंतवणूक केलेली बरी. याआधी दुप्पट-तिप्पट झाले म्हणून इथून पुढेसुद्धा होतील असा भाबडा विश्वास न ठेवता, जसजशी परिस्थिती असेल आणि मुळात आर्थिक नियोजन करून पुढे चालत राहावं. शेवटी ध्येय गाठायला पैसे, वेळ आणि जीव सगळंच पाहिजे. फार धावूनसुद्धा कधी कधी वेळेवर पोचता येत नाही, तर कधी कधी वेळ असूनसुद्धा पैसेच कमी पडतात! हे सर्व करताना आपली तब्येत सांभाळली गेली तरच याचा आनंद उपभोगता येतो. नाही तर आंधळं दळतंय आणि…

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.