या स्तंभात आतापर्यंत ज्या ज्या व्यक्तींची माहिती देण्यात आली ते सर्व आणि आज ज्या व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. शंकर शर्मा हे रसायनच अजब आहे. धनबाद येथील कोळशाच्या खाणीतून हा हिरा बाहेर पडला. १९८२ ला कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात असताना शेअर बाजारातली स्वतःची पहिली गुंतवणूक त्यांनी केली. वडिलांचे निधन झालेले होते, आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यांच्या भाडेकरूने शेअर्समध्ये गुंतवणूक केली म्हणून यांनी सुद्धा आईकडून पैसे उसने घेतले आणि अडीच हजार रुपयांत १० रुपये दर्शनी किंमतीचे २५० शेअर्स एका कंपनीचे मिळविले. आणि त्या शेअरमध्ये त्यांनी १० पट पैसा मिळवला. धनबादला एकही शेअर दलाल त्या काळात नव्हता. शंकर शर्मा १० तास ट्रेनचा प्रवास करून कोलकात्याला जायचे आणि स्वतःचे आणि इतरांचे शेअर्स खरेदी विक्रीचे व्यवहार तत्कालीन कलकत्ता शेअर बाजारात करायचे .

त्यांच्या नशिबाने त्यांना मनिला एशियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट या ठिकाणी एमबीए करण्याची संधी मिळाली आणि शिक्षण पूर्ण झाल्या झाल्या सिटीबँकेत नोकरीही मिळाली. फक्त एक-दीड वर्षे सिटीबँकेत नोकरी टिकली. वयाच्या २६ व्या वर्षी १९८९ ला त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि फक्त ५ हजार रुपयांच्या भांडवलावर ‘फर्स्ट ग्लोबल सिक्युरिटीज’ ही कंपनी सुरू केली. भविष्यनिर्वाह निधीकडून निवृत्त होताना जो निधी मिळाला तो यात वापरला. साहजिकच पहिली २/३ वर्षे फारच कठीण गेली. परंतु कचऱ्यातून सोने शोधण्याची कला त्यांना अवगत झाली होती. कर्नाटक बॉल बेअरिंगमध्ये सिंदिया स्टीम शिप या कंपनीचे शेअर्स तर अपघातानेच त्यांच्याकडे आले. परंतु त्या कंपनीच्या शेअर्स विक्रीतून मिळालेल्या पैशांतून त्यांनी मुंबई शेअर बाजाराचे सभासद होण्याचे कार्ड खरेदी केले. काही कंपन्यांची नावे आता सटोडियेही विसरले असतील, पण पेंटामीडिया ग्राफिक्स, ग्लोबल टेलीसिस्टीम (जीटीएल), हिमाचल फ्युच्युरिस्टीक्स वगैरेंच्या लाटा आणि शंकर शर्मा यांनी डॉटकॉम बुडबुडाही चांगलाच अनुभवला. १९९९ ते २००१ त्यावेळेस बाजारात टिकून राहणे कौशल्याचे काम होते. पुढे २००३ ते २००४ दरम्यान आयव्हीआरसीएल, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन या कंपन्यांनी त्यांना प्रचंड पैसा मिळवून दिला.

हेही वाचा : माझा पोर्टफोलियो, घसरणीच्या काळातील आरोग्यवर्धन: ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड

शेअर दलालाला बाजारामध्ये जेवढे लक्ष द्यावे लागते त्यापेक्षा १० पट जास्त लक्ष अवतीभोवती काय घडते याकडे द्यावे लागते. निरीक्षण करणे, माहिती डोक्यात साठवणे, माहितीचे विश्लेषण करणे, आणि त्यावरून गुंतवणूकीचे योग्य निर्णय घेणे असा हा क्रम आहे. टाटा मोटर्स या कंपनीने जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) खरेदी केली होती. कंपनीवर कर्जाचे प्रचंड ओझे होते. टाटा उद्योग समूहावर विशेषतः रतन टाटा यांच्यावर प्रचंड टीका सुरू होती. काय गरज होती या कंपनीच्या खरेदीची, असा सारखा भडिमार सुरू होता. अशावेळेस शंकर शर्मा लंडनला कामासाठी गेलेले असताना जेएलआरचे नवे मॉडेल त्यांनी रस्त्यावर बघितले. जगाच्या बाजारात चैनीच्या वाहनांचा हिस्सा पॉईन्ट सहावरून एक टक्क्यापर्यंत वाढू शकेल, असा एक अहवाल प्रसिद्ध झाला होता. नवे मॉडेल बघितले आणि भारतात आल्या आल्या टाटा मोटर्सच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात त्यांनी सुरू केली. अर्थातच या खरेदीचा त्यांना प्रचंड फायदा झाला.

वेगवेगळ्या परिषदांमध्ये शंकर शर्मा यांना भाषणासाठी बोलावले जाते. वर्षानुवर्षे या वेगवेगळ्या व्यक्तींना ऐकण्याची संधी मिळालेली असल्याने ते काय बोलणार किंवा त्यांचे विचार काय असतील हे ते बोलण्याअगोदरच समजते. मग राकेश झूनझूनवाला हयात असताना त्यांनी कधीही बाजाराच्या बाबतीत मंदी हा शब्दच कधी उच्चारला नाही. रामदेव अग्रवाल यांच्याबाबतसुद्धा ते बाजाराच्या प्रचंड वाढीच्याच गोष्टी करणार हे गृहितच. या उलट शंकर शर्मा हे तेजीच्या विरुद्धच बोलणार असाच कायम श्रोत्यांनी ग्रह केलेला असायचा आणि अशावेळेस साहजिकच तेजीच्या विरुद्ध बोलणारा कोणी असेल तर त्याचे विचार मान्य करण्याची मानसिकता नसायची. २०१४ ला पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीं आलेले होते. अशावेळेस २०१५ ला गुंतवणूकदार मुर्खाच्या नंदनवनात राहू लागले आहेत का? असा प्रश्न एका मेळाव्यासमोर शंकर शर्मा यांनी उपस्थित केला होता. देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात (जीडीपी) फारशी वाढ अपेक्षित नाही. ती वाढ पाच / साडे पाच टक्के झाली तरी मला आश्चर्य वाटणारच नाही. इन्फ्रास्ट्रक्चर अजुनसुद्धा तोट्यातच असलेले क्षेत्र आहे… असा अर्थशास्त्रातल्या प्रत्येक पैलूचा नकारात्मक उल्लेख त्यांच्याकडून व्हायचा आणि एवढे सांगून झाल्यानंतर, ‘फक्त रुपयाची आणखी घसरण होणार आहे. म्हणून मी भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल काही क्षेत्राबाबत आशावादी आहे,’ अशी त्यांची पुस्ती असे. अर्थातच पुढे त्यांचे अंदाज चुकले. परंतु बाजारात मूलभूत घटकांना महत्त्व देऊ नका फक्त बाजारभावाचे आलेख बघा. बाजारात भावनाशून्य राहता आले पाहिजे आणि वॉरेन बफेपेक्षा मला जॉर्ज सोरोस आवडतो असे सांगण्याची सुद्धा त्यांनी तयारी दाखवली .

हेही वाचा : हिरा है सदा के लिये! (पूर्वार्ध)

‘जगात सर्वात सोपे काम हे मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखांचेच. व्याजदर वाढवणे किंवा कमी करणे एवढेच ते करत असतात आणि त्यासाठी खूप आकडेवारीचा अभ्यास करावा लागतो असा आव आणला जातो,’ हे केवळ शंकर शर्माच बोलू शकतात. हे त्यांचे टोकाचे विचार. त्यांची प्रत्येक प्रतिक्रिया योग्य असतेच असे नाही. पण माणूस बोलतोच इतके बोचरे आणि खोचक की, ते ज्या व्यवसाय क्षेत्राचे प्रतिनिधी आहेत, तेथे असे काही बोलणारा विरळाच. नेहमी शांत स्वभावाचा माणूस खूप बडबड करू लागला तर ते पचनी पडत नाही, त्याचप्रमाणे खूप बडबड करणारा शांत राहिला तरी ती त्याची शांतता सहन होत नाही. बाजारात वेगवेगळ्या विचारसरणीची माणसे असणारच म्हणून तर बाजार चालतो.

बाजारातल्या काही लढाया या विचारसरणीच्या लढाया आहेत. मूल्य विरुद्ध वृद्धी, तेजी विरुद्ध मंदी, फंडामेंटल विरुद्ध टेक्निकल, वॉरेन बफे विरुद्ध जॉर्ज सोरोस, राकेश झूनझूनवाला/ रामदेव अग्रवाल विरुद्ध शंकर शर्मा अशा जुगलबंदी चालू असतात. कधी कधी विचारसरणीत बदल झाला तर तो सुद्धा मान्य करण्याची तयारी दाखवावी लागते. बाजारातली माणसं ही देशाच्या कानाकोपऱ्यात असलेली माणसे आहेत. त्यांनी चांगला पैसा कमावला आहे. प्रादेशिक शेअर बाजार एक काळ भारतात होते हे आता विस्मरणात गेले आहे. दिल्ली शेअर बाजार, कलकत्ता शेअर बाजार किंवा अहमदाबाद शेअर बाजार अशा ठिकठिकाणच्या बाजारांतून सटोडियांचा जन्म झाला होता. जी व्यक्ती धोका स्वीकारेल तिला बाजार प्रत्येकवेळी साथ देईल असे अजिबात नाही. प्रयत्न आणि नशीब दोघांचीही साथ आवश्यक आहे. शंकर शर्मा सिटीबँकेतच नोकरी करीत असते तरीसुद्धा त्यांची प्रगती झालीच असती. कारण शेवटी इर्ष्या डोक्यात असावी लागते. काही नवे उदयोग यांच्यात गुंतवणूक करून पैसा कमवून त्यातून बाहेर पडणे हे सुद्धा शंकर शर्मा यांना चांगले जमलेले आहे. आपला आदर्श कोण असावा यांचा निर्णय अर्थातच प्रत्येकाचा स्वतःचा. आमचे काम एकच अशा व्यक्तींची ओळख करून द्यायची.