गेल्या आठवड्यातील लेखात लोहपोलाद तयार करणाऱ्या कंपन्या नेमके काय करतात आणि त्याच्या व्यवसायाचे स्वरूप नेमके कसे असते याचा आढावा आपण घेतला. या क्षेत्रातील प्रमुख कंपन्यांचा आणि त्यांच्या व्यवसायात अलीकडे झालेल्या बदलांचा या लेखातून आढावा घेऊया.
भारतातील पोलाद उद्योगाचा विचार करायचा आणि टाटा स्टील या कंपनीचे नाव घ्यायचे नाही हे शक्यच नाही. ७७ हजारांहून अधिक मनुष्यबळ जगभरात असलेल्या आणि एकूण ३.५ कोटी टन प्रतिवर्ष उत्पादनाची क्षमता असलेली भारताची आघाडीची कंपनी म्हणजेच टाटा स्टील होय. ब्रिटनमधील आघाडीची कंपनी असलेल्या कोरस स्टील या कंपनीचे अधिग्रहण केल्यामुळे टाटा स्टीलचे नाव जागतिक नकाशावर आले. टाटा स्टीलचे भारतातील जमशेदपूर आणि कलिंगनगर या दोन ठिकाणी अत्याधुनिक क्षमतेचे लोहपोलाद बनवणारे कारखाने आहेत. भूषण स्टीलला अधिग्रहित केल्यामुळे टाटा स्टीलची उत्पादन क्षमता चांगलीच वाढली. वाहन उद्योग, गृहनिर्माण उद्योग, अभियांत्रिकी उद्योग, पॅकेजिंग, ऊर्जा निर्मिती या सर्वच क्षेत्रांत टाटा स्टील आपली उत्पादने बनवते. भारताबरोबर युरोपात आणि नेदरलँड्स या दोन देशांत आणि आशियातील थायलंडमध्ये कंपनीचे महाकाय कारखाने आहेत. अलीकडेच नीलाचल इस्पात निगम या कंपनीचे अधिग्रहण केल्यामुळे कंपनीचे विस्तार क्षेत्र अधिकच विस्तारले आहे. आगामी काळातील पर्यावरणस्नेही उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन कंपनीने आतापासूनच त्या संदर्भातील उपाययोजना सुरू केल्या आहेत. एकूण ६५ म्युच्युअल फंड योजनांनी या कंपनीमध्ये आपली गुंतवणूक केली आहे.
हेही वाचा >>>दीर्घ मुदतीत चांदी सोन्याहून पिवळी ठरेल?
जेएसडब्ल्यू स्टील – भारतातील या आघाडीच्या कंपनीचे वार्षिक उत्पादन २.७ कोटी टन इतके आहे व येत्या वर्षात ते ३.७ कोटी टन प्रतिवर्ष करण्याचा कंपनीचा मानस आहे. या कंपनीतर्फे भारतातील सगळ्याच प्रमुख मेट्रोसाठी पोलादाची निर्मिती केली जाते. मुंबई, हरियाणा, लुधियाना आणि पश्चिम बंगाल रेल्वे मालवाहतुकीच्या कॉरिडॉरसाठी, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, १,००० किलोमीटर लांबीचे रस्ते आणि १६९ किलोमीटर लांबीचे पूल, कुदनकुलम, तारापूर, काकरापार या अणुविद्युत निर्मिती प्रकल्पांसाठी कंपनीची उत्पादने पुरवली जातात. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जेएसडब्ल्यू स्टील आधुनिक पद्धतीचे पोलाद बनवत आहे. हरियाणा-पंजाब, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, ओडिशा, तमिळनाडू या राज्यांत कंपनीचे प्रकल्प आहेत. भारतातील वाढत्या गृहनिर्माण क्षेत्राचा मोठा लाभार्थी म्हणून या कंपनीकडे बघितले गेले पाहिजे. घराच्या दरवाजांपासून, टीएमटी बार आणि छतासाठी वापरायचे पत्रे सगळेच या कंपनीतर्फे बनवले जातात.
सेल: भारत सरकारची महारत्न कंपनी म्हणून ओळखली जाणारी ‘स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड’ अर्थात सेल भारतातील आघाडीची लोहपोलाद निर्मिती करणारी कंपनी आहे. भारतातील उदारीकरणपूर्वीच्या काळातील परदेशी सहकार्याने बनलेल्या या कंपनीने मागील दहा वर्षांत चांगलीच कात टाकली आहे. भारतीय नौदलाच्या आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेसाठी विशेष दर्जाचे पोलाद बनवण्याचा सन्मान या कंपनीला मिळाला आहे. उत्तर भारतातील सहा मोठे द्रुतगती महामार्ग, नवी दिल्लीतील ऐतिहासिक सेंट्रल विस्टा प्रकल्प, मुंबईतील शिवडी नाव्हाशेवा ट्रान्स हार्बर लिंक, नोएडा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ या प्रकल्पांची महत्त्वाची कामे सेलने पार पाडली आहेत. भिलाई, राऊरकेला, बर्नपूर, दुर्गापुर येथे सेलचे कारखाने आहेत.
हेही वाचा >>>Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तरे तज्ज्ञांची – थर्ड पार्टी व्हेईकल इन्शुरन्स म्हणजे काय? तो बंधनकारक असतो का?
या बरोबरीने जिंदाल स्टील अँड पॉवर, एस्सार स्टील, इलेक्ट्रोस्टील अशा कंपन्याही या क्षेत्रात कार्यरत आहेत.
व्यावसायिक जोखमीचे क्षेत्र
पोलाद उद्योगाचे भवितव्य फक्त पोलादाच्या किमतीवर ठरत नाही तर सरकारी धोरणे आणि परदेशी मालाची भारतातील आयात याचा सर्वात मोठा परिणाम कंपन्यांच्या नफ्यावर होत असतो. भारत हा मुक्त व्यापाराच्या बाजूने असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या व्यापारी बंदीला आपण पाठिंबा देऊ शकत नाही. याचा परिणाम असा होतो की, चीनसारख्या देशातून स्वस्तात तयार केलेले लोहपोलाद भारतात विकले जाते. वर उल्लेख केलेल्या सर्व कंपन्या महाकाय आहेत. याचबरोबरीने छोट्या प्रमाणावर व्यवसाय करणाऱ्या स्थानिक पातळीवरील कंपन्यासुद्धा आहेत. या कंपन्या चीनमधून येणाऱ्या मालावर प्रक्रिया करून त्यापासून हलक्या दर्जाची उत्पादने बनवतात. भारत सरकारने भारतातील लोहपोलाद उद्योगाचे संरक्षण व्हावे यासाठी व्यापारी तरतुदी केल्या आहेत.
लोह आणि दगडी कोळसा यांचा अनिर्बंध पुरवठा सुरू ठेवणे कंपन्यांपुढील मोठे आव्हान आहे. पर्यावरण रक्षण आणि खाणकाम यांचा संबंध फारसा चांगला नाही, त्यामुळे कंपन्यांना सतत आव्हानांना सामोरे जावे लागते. ज्या कंपन्यांना कच्चे लोहखनिज किंवा दगडी कोळसा परदेशातून आयात करावा लागतो त्यांची व्यवसाय जोखीम तर सर्वाधिक असते.
अर्थव्यवस्था निश्चित दराने वाढली तरच या क्षेत्राला सुगीचे दिवस येतात. येत्या काही वर्षांत सार्वजनिक क्षेत्रातील भांडवली खर्चाबरोबरच खासगी क्षेत्राने खर्च करायला सुरुवात केल्यास, म्हणजेच नवे प्रकल्प नवे व्यवसाय सुरू झाल्यास आपोआप या क्षेत्रातील मागणी कायम राहणार आहे.
लोहपोलाद निर्मितीचा एक कारखाना सुरू करण्यासाठी किमान तीन ते पाच वर्षे लागतात. कारखान्याचे क्षेत्र अवाढव्य मोठे असते. त्यासाठी लागणारी जागा विकत घेणे, ती कोळसा आणि लोहखनिज मिळणार आहे त्याच्या जवळ असणे गरजेचे असते किंवा त्यासाठी एक स्वतंत्र वाहतूक करणारा रेल्वे मार्ग असावा लागतो. लोहखनिज प्रक्रिया केल्यानंतर वितळवून त्याचे विविध प्रकार घडवण्यासाठी झोत भट्टी (ब्लास्ट फर्नेस) बांधावी लागते. तयार झालेले उत्पादन बाजारात योग्य ठिकाणी विकले जावे यासाठी विक्रेत्यांची साखळी उभी करावी लागते. यावरून एक अंदाज येईल की एक दशलक्ष टन प्रति वर्ष एवढा एकच कारखाना उभा करण्यासाठी किती नियोजन करावे लागत असेल. यासाठी लागणारे अर्थसाहाय्य आणि गुंतवणूक जर कर्ज काढून केलेली असेल तर वेळेवर प्रकल्प सुरू होणे व त्याच वेळी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात स्टीलच्या किमतीसुद्धा वाढत्या असणे हा योग जुळून यावा लागतो नाहीतर नफ्यावर थेट परिणाम होतो.
भागधारकांना म्हणून हक्काचा लाभांश देणाऱ्या कंपन्या म्हणून या क्षेत्रातल्या कंपन्या ओळखल्या जातात. टाटा स्टील, सेल या कंपन्यांकडून नियमितपणे लाभांश दिला जातो. गेल्या दोन वर्षांत देशांतर्गत पोलाद उद्योगात तेजी असल्यामुळे सर्वच कंपन्यांचे नफ्याचे आकडे वाढलेले दिसतात व त्याचा थेट परिणाम शेअरच्या किमतीवर झालेला आहे.
पण हे क्षेत्र रोलर कोस्टर राइडसारखे आहे. आज तेजी तर आणखी काही वर्षांनी मंदी येऊ शकते. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर विकत घेताना देशी व परदेशी बाजाराचा अंदाज घेतला गेला पाहिजे. तेजीच्या लाटेच्या सुरुवातीलाच तुम्ही या क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर विकत घेतलेत तर उत्तम फायदा होऊ शकतो. याउलट आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती चांगली नसेल आणि एकूणच पोलादाच्या किमती घसरल्या असतील तर तुमची गुंतवणूक फारशी फायदेशीर ठरणार नाही.
यामुळे तुमच्या पोर्टफोलिओत या क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश करताना कंपनी, उद्योग आणि बाजार या तिघांचा एकंदरीत अभ्यास होणे अत्यंत गरजेचे आहे.
कौस्तुभ जोशी
© The Indian Express (P) Ltd