भारतीय शेअर बाजार विद्यमान एप्रिल महिन्यात सर्वाधिक अस्थिरता अनुभवत आहेत. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत दमदार तेजी होती, पण त्यानंतर सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) आणि कंपन्यांच्या तिमाहीतील आर्थिक कामगिरी समाधानकारक नसल्याने तसेच जागतिक भू-राजकीय ताण-तणावांमुळे बाजाराने दिशा बदलली. त्यानंतर जानेवारीत अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर अचानकच, व्यापार शुल्काबाबतचे पलटबाज निर्णय आणि अमेरिका-चीन व्यापारयुद्धाची भीती यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. मात्र देशांतर्गत आघाडीवर अर्थव्यवस्थेच्या समाधानकारक कामगिरीमुळे बाजार चांगलाच सावरला आहे.
ही अनपेक्षित तेजी जिच्यामागे देशांतर्गत तरलता, कंपन्यांचे तुलनेने चांगले निकाल, शेअरचे वाजवी मूल्यांकन आणि बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये घट हे घटक होते. यामुळे अनेक गुंतवणूकदार पुन्हा बाजारात प्रवेश करण्यासाठी योग्य संधीची वाट बघत आहे. मात्र झालेला तोटा लक्षात घेता, अनेक गुंतवणूकदार गोंधळात बाजारात प्रवेशाबाबत गोंधळात आहेत. आता मुख्य प्रश्न म्हणजे म्युच्युअल फंड घ्यावेत की थेट कंपन्यांचे शेअर?बाजारात गोंधळ आणि मग पुन्हा तेजी…
अलीकडील घसरण फारच तीव्र होती. अमेरिकेच्या भांडवली बाजारातील निर्देशांक डाऊ अवघ्या दोन दिवसांत ४,००० अंकांनी कोसळला आणि जवळपास ६.६ ट्रिलियन डॉलर बाजारभांडवल कमी झाले. इतिहासातील ही दोन सत्रात झालेली मोठी घसरण होती. भारतातही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली. रुपयाने देखील डॉलरच्या तुलनेत ८७.२९ ही विक्रमी नीच्चांकी पातळी गाठली होती. पण त्याच वेगाने बाजार आणि रुपया सावरला. अनेक कंपन्यांच्या शेअरचे मूल्य गुंतवणूकदारांनी आकर्षक वाटू लागले आहे. जागतिक पातळीवर अमेरिकेने व्यापार शुल्कवाढीला ९० दिवसांची स्थगिती दिल्याने गुंतवणूकदार पुन्हा बाजारात नव्याने गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. परंतु आता प्रश्न आहे तो गुंतवणूक कशात करावी? म्युच्युअल फंड की थेट शेअर बाजारात? कमॉडिटीला किंवा वायदे बाजारातील व्यवहारांनाही स्थान द्यावं का?
म्युच्युअल फंड: अधिक सुरक्षित, शहाणपणाचा आणि स्थिर पर्याय?
जगभरात अनिश्चिततेचे सावट आणि बाजारातील अस्थिरतेच्या काळात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा उत्तम पर्याय ठरतो. विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक (डायव्हर्सिफिकेशन), अनुभवी निधी व्यवस्थापकांकडून संपत्तीचे व्यवस्थापन आणि कमी किमतीतील गुंतवणूकीमुळे सामान्य गुंतवणूकदारांसाठी ते सोयीस्कर ठरतात.
सद्य परिस्थितीत म्युच्युअल फंड योग्य का आहेत?
१. वैविध्य – विविध क्षेत्रांमध्ये आणि वेगवगेळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याने जोखीम कमी होते.
२. एसआयपीचे फायदे – गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या एसआयपीच्या माध्यमातून नियमित गुंतवणुकीमुळे बाजारातील प्रत्येक परिस्थितीत गुंतवणूक होत असल्याने चढ-उतारांचा फायदा होतो.
३. तज्ज्ञांचे व्यवस्थापन – गुंतवणूकदारांसाठी जोखीम करणे हे तज्ज्ञ निधी व्यवस्थापकाचे काम असते.
थेट शेअर बाजार: जोखीम जास्त, पण परताव्याची शक्यताही मोठी
ज्यांना शेअर बाजाराचा अभ्यास करून थेट गुंतवणूक करायला आवडते, त्यांच्यासाठी शेअर बाजारातील गुंतवणूक फायद्याची ठरू शकते. विशेषतः सद्य परिस्थितीत जेव्हा अनेक दर्जेदार कंपन्यांचे शेअर आकर्षक मूल्यांकनात उपलब्ध आहेत.
फायदे:
- मोठ्या घसरणीनंतर चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये खरेदीची संधी
- स्वतःचा पोर्टफोलिओ बांधण्याच स्वातंत्र्य
- काही वेळा म्युच्युअल फंडापेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता
सावधानता: - यासाठी वेळ, शिस्त आणि जोखीम हाताळण्याची क्षमता लागते.
कमॉडिटी: तुमच्या गुंतवणुकीचं ‘हेज’
सोने, चांदी यासारख्या कमॉडिटीकडे जोखीम टाळू इच्छिणारे गुंतवणूकदार वळत आहेत. महागाई किंवा जागतिक संकटाच्या काळात या पर्यायांमधील गुंतवणूक बचावात्मक ठरते.
कमॉडिटीमध्ये गुंतवणुकीचे सर्वोत्तम पर्याय:
१. गोल्ड/सिल्वर म्युच्युअल फंड
२.गोल्ड ईटीएफ
३. मल्टी-ॲसेट फंड (ज्यांमध्ये कमॉडिटीजचा समावेश असतो.)
वायदे बाजार व्यवहार: मोठ्या फायद्याची शक्यता, पण जोखीमही मोठी
ज्यांचा शेअर बाजाराचा चांगला अभ्यास आहे आणि जोखीम घेण्याची तयारी आहे, त्यांच्यासाठी वायदे बाजार (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) हा एक आकर्षक, पण सावधगिरीने वापरायचा पर्याय आहे. अलीकडील अस्थिरतेमुळे यात रस वाढलेला दिसतो.
वायदे बाजारातील व्यवहारासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी
१. उपयुक्तता समजून घ्या: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये लिव्हरेज असतो – म्हणजेच फायदा आणि तोटा दोन्ही मोठे.
२. नुकसान प्रतिबंध (स्टॉप लॉस) लावा: अचानक होणाऱ्या बदलांमुळे भांडवल शून्यावर येऊ शकते.
३ ‘ओव्हरलिव्हरेजिंग’ टाळा: मर्यादेत व्यवहार करा, व्यावसायिक ट्रेडर देखील यात आपल्या मर्यादा पाळतात.
४. सतत अद्ययावत रहा: जागतिक घडामोडी, विदा, धोरणांचे बदल यांचा तीव्र परिणाम गुंतवणुकीवर होत असतो. त्यामुळे आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक घटनांचा आढावा घेऊन त्यानुसार कृती करा.
५. ‘हेजिंग’साठी ऑप्शन्स व्यवहारांचा वापर करा: पोर्टफोलिओचे संरक्षण करण्यासाठी ‘पुट ऑप्शन’ वापरा, सट्टेबाजीसाठी नव्हे.
६. सराव करून सुरुवात करा: सुरुवातीला पेपर ट्रेडिंग करा किंवा लहान रकमेचा व्यवहार करून बघा.
७. जर तुमच्याकडे वेळ, तांत्रिक ज्ञान आणि मानसिक स्थैर्य नसेल, तर वायदे बाजारात व्यवहार करणे टाळा.
तर मग सर्वसामान्य गुंतवणूकदारासाठी योग्य रणनीती कोणती?
बहुतांश वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी ‘हायब्रिड’ पद्धत फायदेशीर ठरते:
१. मुख्य गुंतवणूक म्युच्युअल फंडात करा, विशेषतः लार्ज कॅप किंवा फ्लेक्झीकॅप फंडात एसआयपी सुरू करा.
२. थोडी निवडक गुंतवणूक थेट शेअरमध्ये करा, योग्य संधीचा वापर करुन चांगले शेअर घ्या
३. गोल्ड ईटीएफच्या माध्यमातून तुमचा पोर्टफोलिओ हेज करा.
४. अनुभव असेल तर वायदे बाजारातील व्यवहार फक्त हेजिंगसाठी आणि सावधपणे उपयोग करा.
थोडक्यात
मार्केट सावरतंय, पण अनिश्चितता अजूनही आहे. ही तेजी टिकेल का? की परत घसरण होईल? सांगता येत नाही. पण शिस्तबद्ध आणि विविध साधनांमध्ये गुंतवणूक हीच दीर्घकालीन यशाची गुरुकिल्ली आहे. तुमच्या आर्थिक गरजा आणि जोखीमक्षमतेनुसार गुंतवणुकीचे योग्य पर्याय निवडायला हवेत.
म्युच्युअल फंड असो, शेअर, कमॉडिटी किंवा व्याडे बाजारातील व्यवहार यात अभ्यास, स्पष्टता आणि संयम हेच अंतिम विजयाचे सूत्र आहे.
© The Indian Express (P) Ltd