निफ्टी निर्देशांक २६,२७७ च्या उच्चांकी स्तरावरून ४,००० अंशाहून अधिक घसरल्याने, चांगल्या, प्रथितयश कंपन्यांचे समभाग हे त्यांच्या उच्चांकांपासून आता अर्ध्या किमतीत मिळत असल्याने गुंतवणूकदारांना खरेदीचा मोह होणे स्वाभाविकच आहे. आताच्या बाजारभावावर गुंतवणूकदारांची ‘प्रीती जडत आहे’, तर दुसऱ्या बाजूला विविध समाजमाध्यमांतून, अजूनही निफ्टी निर्देशांक २०,००० पर्यंत घसरणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे, ‘आताची तोंडाला पाणी आणणारी किंमत ही २०,००० च्या स्तरावर तोंडचं पाणी तर पळवणार नाही ना!’ अशी भीतीदेखील वाटत आहे. अशा ‘भीती-प्रीतीच्या हिंदोळ्यावर’ आज गुंतवणूकदारांची मानसिकता आहे. आजच्या लेखात हीच मानसिकता गुंतवणूकदारांनी कशी हाताळायची त्याचा विस्तृत आढावा घेऊया.
‘लोकसत्ता-अर्थवृत्तान्त’मधून ऑक्टोबर २०२४ पासून ‘शिंपल्यातील मोती’ सदरात, या मंदीचे सूतोवाच केलेले ते असे… “सप्टेंबर २०२५पर्यंतच्या प्रत्येक दाहक मंदीत उपरोक्त समभाग आपल्याला स्वस्तात मिळू शकतो तेव्हा गुंतवणूकयोग्य रकमेचे २० टक्क्यांच्या पाच तुकड्यांत विभागून प्रत्येक दाहक मंदीत समभाग खरेदी करावा.’’ हे त्या वेळच्या लेखातील अधोरेखित वाक्य आज आपण अनुभवत आहोत. हेच सूत्र आज आपण अंगीकारणार आहोत. गुंतवणूकदारांनी विविध क्षेत्रांतील चांगल्या, पाच प्रथितयश कंपन्यांचे समभाग निवडून, गुंतवणूकयोग्य रकमेचे २० टक्क्यांच्या ५ तुकड्यांत विभागून या २२,००० ते २१,५०० रुपयांदरम्यान रकमेची गुंतवणूक करावी. जेव्हा निफ्टी निर्देशांक २४,००० ते २४,५०० पर्यंत झेपावेल तेव्हा २२,००० ते २१,५०० स्तरावर खरेदी केलेल्या समभागांची नफारूपी विक्री करावी. ‘मंदीत खरेदी, तेजीत विक्री’ असे सूत्र सप्टेंबर २०२५ पर्यंत चालूच ठेवावे. आताच्या घडीला निफ्टी निर्देशांकाने २२,७००चा स्तर पार करणे हे नितांत गरजेचे आहे. असे घडल्यास २३,००० ते २३,३०० ही निफ्टी निर्देशांकाची पुढची वरची लक्ष्य असतील.
निफ्टी निर्देशांक २२,७००चा स्तर पार करण्यास व २२,३०० चा स्तर राखण्यास वारंवार अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २२,००० ते २१,८०० असे असेल. या नीचांकावरुन निफ्टी निर्देशांक प्रथम २३,००० व त्या नंतर २४,००० वर झेपावेल. पुढील लेखात निर्देशांकाचे ‘८ वर्षांचे उच्चांक-नीचांकाचे चक्र’ आणि ‘लोकसभेच्या निवडणुकीनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो’ या दोन गृहीतकांद्वारे २०२८ च्या संभाव्य उच्चांक काय असेल त्याचा आढावा घेऊया.
बातमीतील समभाग
सरलेल्या सप्ताहात इंडसइंड बँकेच्या डेरिव्हेटिव्ह खात्यांमधील व्यवहारांमुळे बँकेला १,६०० ते २,१०० कोटी रुपयांचा संभाव्य फटका बसू शकतो, असा बँकेनेच उलगडा केला. या बातमीचा धक्कादायक परिणाम म्हणून भांडवली बाजारात समभाग ९१३ रुपयांवरून ६०६ रुपयांपर्यंत घसरला. आता ज्या गुंतवणूकदारांकडे हा समभाग आहे त्यांच्यासाठी इंडसइंड बँकेच्या समभागाची भांडवली बाजारातील भविष्यकालीन वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊया. येणाऱ्या दिवसात इंडसइंड बँकेच्या समभागाच्या सुधारणेत ८०० ते ९०० रुपयांचा स्तर हा अवघड टप्पा असणार आहे. आताच्या घडीला समभागाचा परीघ (बँण्ड) हा ६०० ते ९०० रुपये असेल. येणाऱ्या दिवसात प्रत्येक घसरणीत समभागाने ६०० रुपयांचा स्तर राखणे नितांत गरजेचे आहे, ६०० रुपयांच्या नीचांकासमोर चढत्या भाजणीतील उच्चांक (हायर बॉटम) स्थापित करणे नितांत गरजेचे आहे. काही काळ ६०० ते ९०० रुपयांदरम्यान पायाभरणी झाल्यास, भविष्यात समभाग सातत्याने ९०० रुपयांवर एक महिना टिकल्याचे दिसणेही महत्त्वाचे. त्यानंतरच समभागाचे वरचे लक्ष्य हे १,२०० रुपये असेल.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टाॅप लाॅस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.