गेल्या लेखातील वाक्य होते – ‘आता चालू असलेल्या तेजीत निफ्टी निर्देशांकाचे २३,९०० ते २४,३०० हे वरचे लक्ष्य असून पुढील तेजीच्या वाटचालीत २४,३०० हा अवघड टप्पा असेल.’ सरलेल्या सप्ताहात निफ्टी निर्देशांकाने २४,३५९ चा उच्चांक नोंदवत गुंतवणूकदारांसाठी तेजीच्या वाटचालीतील वरचे लक्ष्य साध्य करण्याचा – ‘लक्ष्यपूर्ती’चा आनंद तर दिलाच, पण पुढील तेजीच्या वाटचालीत २४,३०० हा अवघड टप्पा असेल, हे सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या घसरणीतून दाखवत, दुहेरी उद्देशदेखील साध्य केला. घडतंय ते नवलच!
अवघ्या नऊ कामकाज दिवसांत निफ्टी निर्देशांकावर २,६१६ अंशांची तेजी आल्याने, या तेजीचे अंतरंग विविध शक्यतांच्या आधारे तपासत, निफ्टी निर्देशांकाची भविष्यकालीन वाटचाल ज्यात निफ्टी निर्देशांकाचा भरभक्कम आधार, तो आधार येणाऱ्या पाच दिवस टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य अथवा खालचे लक्ष्य विविध शक्यतांच्या आधारे जाणून घेऊया.
शक्यता – १: हलकीफुलकी घसरण- निफ्टी निर्देशांक २४,३६४ वरून २३,८५० पर्यंतची घसरण जी सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारी झाली. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने २३,८५०चा स्तर सातत्याने पाच दिवस राखल्यास निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य २४,३५० – २४,५०० ते २४,८०० असेल.
शक्यता – २: मध्यम स्वरूपाची घसरण- निफ्टी निर्देशांक २३,८५० चा स्तर राखण्यास अपयशी ठरल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य २३,६५० ते २३,५००
शक्यता – ३: गेली तेजी कुणीकडे असे वाटणारी, सर्वांना चिंताग्रस्त करणारी घसरण आल्यास- निफ्टी निर्देशांक सातत्याने २३,८०० स्तराखालीच राहत,२३,३५० ते २३,००० स्तरापर्यंत खाली घसरेल.
अवघ्या नऊ कामकाज दिवसांत डोळ्याचे पाते लवते न लवते तोच, निफ्टी निर्देशांकावर २,६१६ अंशांची तेजी आली आहे. या तेजीत कित्येक गुंतवणूकदार सहभागी होऊ शकले नाहीत. तेव्हा आता चालू असलेली मंदी ही त्यांच्यासाठी त्यांचे आवडते समभाग स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी असेल.
निकालपूर्व विश्लेषण
१) केपीआयटी टेक्नॉलॉजी लिमिटेड
२५ एप्रिलचा बंद भाव: १,२२१ रुपये
तिमाही वित्तीय निकाल: सोमवार, २८ एप्रिल
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: १,२६५ रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास : या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून १,२६५ रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य १,३५० रुपये, द्वितीय लक्ष्य १,४५० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: १,२६५ रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १,१२० रुपयांपर्यंत घसरण
२) बीपीसीएल लिमिटेड
२५ एप्रिलचा बंद भाव: २९५.७० रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २९ एप्रिल
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ३०२ रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: या सकारात्मक वृताच्या जोरावर समभागाकडून ३०२ रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य ३२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ३४० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ३०२ रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत २७० रुपयांपर्यंत घसरण
३) ट्रेंट लिमिटेड
२५ एप्रिलचा बंद भाव: ५,१४५ रु.
तिमाही वित्तीय निकाल: मंगळवार, २९ एप्रिल
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ५,१०० रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: समभागाकडून ५,१०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ५,७०० रुपये, द्वितीय लक्ष्य ६,२०० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ५,१०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ४,८५० रुपयांपर्यंत घसरण
४) स्टेट बँक
२५ एप्रिलचा बंद भाव: ७९८.६५ रु.
तिमाही वित्तीय निकाल: शनिवार, ३ मे
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: ७९५ रु.
निकाल उत्कृष्ट असल्यास: समभागाकडून ७९५ रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ८२५ रुपये, द्वितीय लक्ष्य ८४० रुपये.
निराशादायक निकाल असल्यास: ७९५ रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ७७५ रुपयांपर्यंत घसरण
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.