समर बणवत
म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक हा लोकांसाठी संपत्ती निर्माणाचा एक पसंतीचा मार्ग निश्चितच बनत आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक पर्यायापैकी एक मानली गेली असल्याने, नवगुंतवणूकदारांपासून ते सराईत तज्ज्ञ व्यावसायिकांपर्यंत सर्वच या साधनाचा वापर करतात. याची वाढती लोकप्रियता पाहता या साधनांतील गुंतवणुकीचे सुलभीकरण होणे ओघानेच आवश्यक ठरते. त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून दशकापूर्वी २०११ मध्ये, गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओला अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करता यावे यासाठी, सर्व ओपन-एंडेड अर्थात गुंतवणुकीस कायम खुल्या असलेल्या म्युच्युअल फंड योजनांचे युनिट्स डिमॅट खात्यात ठेवण्याचा पर्याय गुंतवणूकदारांना देण्याचे निर्देश ‘सेबी’ने सर्व म्युच्युअल फंड घराण्यांना दिले.
अर्थात याची सक्ती न करता, तो पर्याय स्वेच्छेने निवडण्याची तरतूद केली गेली. मात्र तेव्हापासून, वाढत्या संख्येने गुंतवणूकदार डिमॅट खात्याच्या फायद्यांचा लाभ घेण्याचा पर्याय निवडत आहेत. तथापि, अजूनही असे बरेच लोक आहेत जे आजही त्यांच्याकडे डिमॅट खाते असतानाही, त्यांनी पारंपरिक फोलिओ धाटणीने म्युच्युअल फंडातील गुंतवणूक सुरू ठेवली आहे. म्युच्युअल फंडांचे युनिट्स डिमटेरियलाइज्ड स्वरूपात ठेवण्याचे फायदे कळले नसल्याने हे होत असावे.
आणखी वाचा-Money Mantra : गुंतवणुकीचे विविध मार्ग- गुंतवणूक का करावी?
आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या वित्तीय सेवा पटलामध्ये, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लक्षणीय गुणात्मक बदल घडत आहे. सोपेपणा, सोयीस्करता आणि केव्हाही, कधीही, कुठूनही वापराची सुविधा हे या तंत्रज्ञानाचे प्रमुख पैलू आहेत आणि त्यातून गुंतवणूक पद्धतींमध्ये लक्षणीय प्रगती करणारे मार्ग खुले झाले आहेत. म्युच्युअल फंड गुंतवणुका पारंपरिक फोलिओ स्वरूपात ठेवण्याऐवजी, त्यांना तुमच्या डिमॅट खात्याशी जोडणे, ही तंत्रज्ञानाने सुलभ केलेली अशीच एक नवीन प्रथा आहे, ज्यातून अनेक फायदे मिळू शकतात.
देशात कार्यरत दोन प्रमुख डिपॉझिटरीपैकी एक ‘एनएसडीएल’ने मे २०२३ पासून म्युच्युअल फंड गुंतवणूक ही गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्याशी संलग्न करण्याची ऑनलाइन सोय सुरू केली आहे. ही प्रक्रिया अगदी सरळ-सोपी आहे. ‘एनएसडीएल कॅस’ संकेतस्थळावर म्युच्युअल फंड फोलिओच्या ‘होल्डिंग्ज’ विभागांतर्गत ‘म्युच्युअल फंड रूपांतरण’ हा दुवा (लिंक) समाविष्ट केला गेला आहे. तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीला एनएसडीएल डिमॅट खात्यात प्रत्यक्ष किंवा स्टेटमेंट ऑफ अकाऊंट (एसओए) स्वरूपात रूपांतरित करण्याची विनंती सहजपणे दाखल करू शकता. गुंतवणूकदाराला यासाठी कोणताही भौतिक अर्ज भरण्याची वा कागदपत्रे सादर करण्याची गरज नसलेली ही एक सुलभ व संपूर्ण डिजिटल प्रक्रिया आहे.
तुमचे म्युच्युअल फंड युनिट्स ‘डिमॅट’ खात्यांतर्गत ठेवण्याचे प्रमुख फायदे आहेत, ते असे:
१. म्युच्युअल फंड युनिट्सचे भेट (गिफ्ट) स्वरूपात हस्तांतरणः
तुम्ही ‘ऑफ मार्केट’ अर्थात बाजारबाह्य हस्तांतरणाद्वारे प्रियजनांना म्युच्युअल फंड युनिट्सदेखील भेट रूपात देऊ शकता. पारंपरिक फोलिओ रूपातील गुंतवणूक असल्यास हे शक्य नाही. मात्र एका डिमॅट खात्यातून दुसऱ्या डिमॅट खात्यात म्युच्युअल फंड युनिट्सचे हस्तांतरण सोपे आणि कोणत्याही अडथळ्यांविना अथांगपणे करता येते.
२. म्युच्युअल फंड युनिट्स ‘तारण’ रूपात वापरण्यात सुलभता
अ) तारण ठेवून म्युच्युअल फंड युनिट्सच्या बदल्यात कर्ज मिळविता येणे: म्युच्युअल फंड युनिट्स डिमॅट खात्यात ठेवल्यास या युनिट्सचा तारण म्हणून वापर करून गुंतवणूकदाराला त्याची पत व तरलता वाढवण्याचा फायदा मिळविता येऊ शकतो. गरजेप्रसंगी आवश्यक तो निधी कर्ज स्वरूपात मिळविता येण्याच्या या अतिरिक्त पर्यायामुळे अधिक आर्थिक लवचीकता आणि संधींच्या शक्यता गुंतवणूकदारांना खुल्या होऊ शकतात. गुंतवणूकदार त्यांच्या म्युच्युअल फंड युनिट्सचा कर्जासाठी तारण म्हणून सहजपणे समावेश करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या एकूण गुंतवणूक धारणेच्या प्रमाणात ते कर्ज मिळवू शकतात. सध्या उपलब्ध ‘लोन अगेन्स्ट सिक्युरिटीज’ अर्थात शेअर तारण कर्जाच्या योजनेसारखीच याची वैशिष्ट्ये आहेत.
ब) म्युच्युअल फंड युनिट्सचा वापर शेअर बाजारात ट्रेडिंगच्या उद्देशाने तारण म्हणून करता येणे.
आणखी वाचा-Money Mantra: संस्कृती व सांस्कृतिकतेचा ग्राहकांच्या मानसिकतेवर किती परिणाम होतो?
३. ‘एनएफओ’साठी अर्जाची सरलीकृत प्रक्रिया
म्युच्युअल फंड घराण्याकडून जेव्हा नवीन फंड दाखल होतो, या ‘एनएफओ’साठी तुम्ही वितरकाच्या माध्यमातून अर्ज करता तेव्हा, तुम्हाला तुमच्या इच्छित खात्यात थेट म्युच्युअल फंड युनिट्स जमा करावयाचे असतील, तर ‘सबस्क्रिप्शन फॉर्म’मध्ये केवळ डिमॅट खाते क्रमांक नमूद करावा लागतो.
४. संपत्तीचे वारसांना सुव्यवस्थित हस्तांतरण
डिमॅट खात्यात म्युच्युअल फंड युनिट्स ठेवल्यास संपत्ती हस्तांतरण आणि वारसा प्रक्रिया सुव्यवस्थितपणे करता येते. म्युच्युअल फंडांसह डिमॅट खात्यातील सर्व मालमत्तेवर ही हस्तांतरण प्रक्रिया लागू होते. याचा अर्थ असा की खातेदाराच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेत, नामनिर्देशन सुविधेद्वारे खात्यातील सर्व मालमत्तेच्या मालकीचे हस्तांतरण एकाच प्रक्रियेतून पूर्ण केले जाऊ शकते. शिवाय, एका डिमॅट खात्यात सर्व वित्तीय मालमत्ता एकत्र असल्याने, वारसांना संपूर्ण पोर्टफोलिओचे तपशील असलेले सर्वसमावेशक विवरण प्राप्त होते. हा सुव्यवस्थित दृष्टिकोन दाव्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासह, संपत्तीचे सहज संक्रमण देखील सुनिश्चित करते, जी गुंतवणूकदार आणि त्यांच्या लाभार्थ्यांना नक्कीच मनःशांती प्रदान करणारी आहे.
आणखी वाचा-Money Mantra: प्रश्न तुमचे, उत्तर तज्ज्ञांचे: कोणती करप्रणाली निवडायची हे कसे ठरवू?
५. विनासायास तपशिलांमध्ये बदल
डिमॅट खात्यात म्युच्युअल फंड युनिट्स ठेवण्याचा आणखी एक उल्लेखनीय फायदा म्हणजे गरज पडेल तेव्हा तपशिलांमध्ये बदल करणे सोपे बनते. डिमॅट खात्यातील वेगवेगळ्या म्युच्युअल फंड योजनांचे युनिट्स, इतकेच नाही तर समभाग आणि बाँड्स संबंधाने नमूद गुंतवणूकदाराच्या तपशिलांमध्ये जसे की पत्ता, बँक खाते तपशील किंवा संपर्क क्रमांक वगैरे माहितीत फेरबदल डिपॉझिटरी पार्टिसिपंट (डीपी) मार्फत केले जाऊ शकतात आणि हे फेरबदल समभाग, बाँड्स आणि फंड असे सर्व मालमत्ता वर्गांमध्ये एकाच वेळी प्रतिबिंबितही होतात. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अर्ज-विनंत्या करण्याची गरज राहात नाही आणि विसंगती राहण्याची शक्यता देखील आपोआपच दूर होते. एकंदरीत गुंतवणूकदारांचा वेळ आणि श्रम वाचतात, मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांचा प्रशासकीय भार कमी केला जातो.
पारंपरिक फोलिओ-आधारित गुंतवणुकीच्या इलेक्ट्रॉनिक धाटणीच्या संक्रमणासह, डिमॅट खाते गुंतवणुकीला आवश्यक सुलभता, लवचीकता, सोयीस्करता प्रदान करतो. गुंतवणूकदाराला गुंतवणुकीचा इष्टतम आनंद मिळवून देणे हे कोणत्याही गुंतवणूक नियोजनाचे प्रधान उद्दिष्ट असते आणि गुंतवणुकीच्या संबंधाने त्याचा दृष्टिकोन कार्यक्षम राहावा यासाठी हा आनंद गरजेचाही असतो.
(लेखक, एनएसडीएलचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत)