भारतातील एफ.एम.सी.जी. श्रेणीतील आघाडीची कंपनी आयटीसीने बहुप्रतिक्षित डीमर्जरची घोषणा केली आहे. एखाद्या कंपनीचा व्यवसायातील भाग किंवा उपकंपनी वेगळी करणे आणि त्याचे नव्या कंपनीमध्ये रूपांतर करणे याला डीमर्जर असे म्हणता येईल. ‘आयटीसी’ ही मूळची सिगारेट बनवणारी कंपनी असली तरी हॉटेल, कृषी उत्पादने, कागद निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, पॅकेजिंग मटेरियल या व्यवसायांमध्ये दमदार आगेकूच करत आहे. गेल्या काही वर्षांपासून आयटीसीने आपल्या व्यवसायाच्या धोरणांमध्ये थोडे बदल करायला सुरुवात केली आहे. एफ.एम.सी.जी. आणि आयटी बिझनेस मध्ये कंपनीला आपला हिस्सा वाढवायचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा: Money Mantra: हार्वेस्टिंग मशीनचं पीक

दरम्यान आयटीसी आपल्या कंपनीतून हॉटेलचा व्यवसाय वेगळा काढून त्याची नवी कंपनी बाजारात आणणार आहे अशी घोषणा २४ जुलै रोजी कंपनीने केली होती. याचे नाव ‘आयटीसी हॉटेल्स लिमिटेड’ असे असेल. या नवनिर्मित कंपनीमध्ये आयटीसीचा हिस्सा ४०% राहणार आहे. आज १४ ऑगस्ट रोजी झालेल्या ‘बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या’ मीटिंगमध्ये यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले आहे. भारतामध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून हॉटेल आणि त्यातल्या त्यात आलिशान हॉटेलच्या व्यवसायात वाढ होताना दिसते आहे. अहमदाबाद, कोलकाता, नवी दिल्ली, गुरुग्राम, चेन्नई, गोवा, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, आग्रा, जयपूर अशा भारतातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये कंपनीची आलिशान हॉटेल्स आहेत. व्यवसायाचा विचार करता आयटीसीची ७० शहरांमध्ये मिळून १२० हॉटेल्स आहेत. ‘आयटीसी’ च्या एकूण उत्पन्नापैकी चार टक्के उत्पन्न हॉटेल व्यवसायातून येते आणि दोन टक्के नफा याच व्यवसायातून प्राप्त होतो. आयटीसीने व्यवसायाचे वेगळे मॉडेल काही वर्षांपासून विकसित केले आहे. स्वतःच्या मालकीची हॉटेल्स बांधण्यापेक्षा कंत्राटी तत्त्वावर हॉटेल्स चालवायला घेणे; यामध्ये जोखीम कमी आणि नफ्याचे प्रमाण जास्त असते. यामुळेच कंपनीला आगामी काळात व्यवसायात वाढ होण्याची शक्यता वाटते.

आणखी वाचा: Money Mantra: ‘मिशो’च्या नफ्याचं गमक काय?

इतके वर्ष कंपनीचा अविभाज्य हिस्सा राहिलेला आयटीसी हॉटेल्स हा व्यवसाय आता वेगळा होऊन आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यास सज्ज झाला आहे. बाजारात स्वतःचा ब्रँड म्हणून तो अस्तित्वात आहेच पण भागधारकांसाठी लाभदायक कंपनी म्हणून सुद्धा आयटीसी हॉटेल्स भविष्यात उदयाला येईल. आयटीसी च्या संचालक मंडळाने आयटीसी हॉटेल्स आणि आयटीसी या कंपन्या वेगळ्या झाल्यानंतर भागधारकांना शेअर होल्डर्सना कोणत्या प्रमाणात शेअर मिळतील याची आकडेवारी सुद्धा दिली आहे. आयटीसी कंपनीच्या दहा शेअर्स मागे आयटीसी हॉटेलचा एक शेअर भागधारकांना मिळेल. भागधारक, स्टॉक एक्सचेंज, सेबी आणि संबंधित सर्व सरकारी यंत्रणांकडून हिरवा कंदील मिळाल्यावर येत्या पंधरा महिन्यात ‘आयटीसी हॉटेल’ हा शेअर स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट होईल.

जुलै महिन्यात आयटीसी कंपनीच्या शेअरने ४९२ रुपये हा आकडा पार केल्यावर महत्वाची घटना घडली ती बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. भारतातील सहा ट्रिलियन रुपये एवढे बाजार मूल्य असणारी कंपनी म्हणून ‘आयटीसी’ चे नाव नोंदवले गेले. तीन ट्रिलियन रुपयांपासून चार ट्रिलियनचे बाजारमूल्य गाठण्यास आयटीसीला तीन वर्षाचा कालावधी लागला, तर चार ट्रिलियन वरून पाच ट्रिलियन एवढे बाजार मूल्य होण्यासाठी कंपनीला सहा वर्ष लागली. मात्र फक्त तीन महिन्यातच कंपनीने सहा ट्रिलियन रुपये ही ऐतिहासिक पातळी नोंदवली आहे. भारतीय शेअर बाजारातील रिलायन्स, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस या कंपन्यांनी आतापर्यंत सहा ट्रिलियन रुपये एवढे बाजार मूल्य कमावले आहे.

३० जून २०२३ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत कंपनीला घसघशीत ४९०२ कोटी रुपये एवढा नफा प्राप्त झाला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत जेवढा नफा झाला होता त्यापेक्षा ही वाढ १७.५८% इतकी आहे. नफ्यामधील झालेली वाढ खाद्यपदार्थ, तयार खाद्यपदार्थ, बिस्किटे, पेय, दुग्धोत्पादने, अगरबत्ती आणि उच्च दर्जाच्या साबणाच्या विक्रीत झालेल्या वाढीमुळे दिसून येत आहे. असे असले तरी कंपनीच्या एकूण विक्रीमध्ये ७ % घट झालेली दिसली व ही विक्री १६,९९५ कोटी रुपये एवढी होती. सिगारेट व्यवसाय आणि हॉटेल व्यवसाय या मध्ये सुद्धा अनुक्रमे १० % आणि ८ % इतकी वाट दिसून आली. बाजार बंद होताना १४ ऑगस्ट रोजी ‘आयटीसी’ चा भाव ४४७.८० रुपये एवढा होता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Itc itc hotels demerger what shareholders will get mmdc psp
Show comments