भारतीय बँकांना फसवण्याची जणू काही एक पद्धतच रूढ झाली आहे. कर्ज घ्या आणि फसवा किंवा खोटी कागदपत्रे बनवा आणि फसवा. असे अजून किती घोटाळे आहेत, त्याची मोजदाद करणे खोरखर कठीणच वाटते. आपण बँकेचा एक जरी हप्ता थकवला की, बँक कर्मचारी नुसते फोन करून हैराण करतात. मात्र हाच नियम धनदांडग्यांसाठी वेगळा असल्याचा प्रत्यय येतो. या लेखमालिकेत पुढील घोटाळा वाचून असे वाटेल की, आधी पण हेच लिहिले होते, मात्र या घोटाळ्यातील सूत्रधार नवीन आहेत. हा घोटाळा आहे जतीन मेहता यांचा. ज्याची कार्यपद्धती नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांनी वापरली असे दिसते.
जतीन मेहता आणि नीरव मोदी यांच्यात तसे बरेच साम्य आहे. दोघांचेही मूळ गाव गुजरातमधील पालनपूर आणि व्यवसायदेखील दागिने आणि हिऱ्यांचा. जतीन मेहता यांनी ‘विन्सन’ नावाच्या कंपन्यांचा एक समूह बनवला होता आणि नीरव मोदीप्रमाणेच परदेशातून सोने आयात करणे आणि त्याचे इकडे दागिने घडवून विकणे असा उद्योग त्यांनी सुरू केला. वर्ष १९८५ पासून २०१३ येईपर्यंत ही व्यवसायातील घोडदौड कायम होती. परदेशातून वस्तू आयात करणे तसे जिकिरीचेच असते, कारण विक्रेता आणि खरेदीदार एकमेकांवर फारसे विश्वास ठेवू शकत नाहीत. त्यासाठी बँक ‘लेटर ऑफ क्रेडिट’ देऊन पैशांची व्यवस्था करतात. यामुळे आयात-निर्यात अधिक सुलभ होते. मेहतांच्या कंपन्या चांगला व्यवसाय करत होत्या, त्यामुळे भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कॅनरा बँक, युनियन बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्रने ‘कमिशन’ रूपाने चांगला फायदा मिळवला. वर्ष २०१३ पर्यंत जतीन मेहतांच्या कंपन्यांनी कधीच पैसे परत करण्यात चूक केली नाही, त्यामुळे बँकांनी दिलेल्या कर्जाचा आकार देखील शे-दोनशे कोटींवरून पाच हजार कोटींपर्यंत पोहोचला होता. २०१३ मध्ये मात्र स्टॅंडर्ड चार्टर्ड बँक आणि स्कॉटिश बँकेचे पैसे न चुकवल्यामुळे भारतीय बँकांना पैसे द्यावे लागले.
हेही वाचा : माझा पोर्टफोलियो – पोर्टफोलिओचा भक्कम पाठीराखा : ‘एलआयसी’
मेहतांच्या सांगण्यानुसार, जे सोने आयात होत होते, त्याचे दागिने बनवून ते आखाती देशांमधील खरेदीदारांना विकायचे. वर्ष २०१३ मध्ये ते पैसे देऊ शकले नाहीत. कारण दागिने खरेदीदारांना काही नुकसान झाले होते आणि त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. बँका मात्र त्यानंतर सावध झाल्या आणि त्यांनी लगेच चौकशी सुरू केली. त्यात त्यांना असे दिसले की, आखाती देशांमधील खरेदीदार एकच होता, त्याचे नाव होते हायतान सुलेमान अबू उबेदा आणि त्याच्या कंपन्यांना मेहतांच्या कंपन्या दागिने विकत होत्या. त्यातही काही कंपन्या २०१२ मध्येच स्थापन झाल्या होत्या आणि त्यांचा उद्देश कदाचित घोटाळा करणे हाच होता. बँकांना संशय आला की, या कंपन्या मेहता यांच्याच आहेत आणि सगळे पैसे परत जतीन मेहतांकडेच येत आहेत. बँका आणि शोधकर्त्या संस्थांकडून फास आवळण्यापूर्वीच जतीन मेहता हा कॅरेबियन देशांमधील ‘सेंट किट्स अँड नेविस’ नावाच्या मुंबईपेक्षाही छोट्या देशात आपल्या कुटुंबासह पळून गेला. तिथून इतर घोटाळेबाजांप्रमाणेच इंग्लंड येथे सध्या त्याचे वास्तव्य असते आणि त्याने काही नवीन सुरू केलेले उद्योगधंदे चांगले चालू आहेत असे दिसते. हा घोटाळा मुद्दल आणि थकीत व्याज मिळून सुमारे ७,००० कोटींचा होता.
हेही वाचा : आरोग्य विमा नाकारला का जातोय? अंशतः अथवा पूर्णतः दावे नाकारण्याचे प्रमाण ९५ टक्के का?
घोटाळ्यांची कार्यपद्धती बघता अशा एकाच प्रकारच्या घोटाळ्यांचे रकानेच्या रकाने भरतील. इंग्रजीमध्ये ‘ओह नो, नॉट अगेन’ असे म्हणायची पद्धत आहे. बँक कर्मचारी आणि तपासकर्त्या संस्थांचे कर्मचारी एकाच प्रकारचे घोटाळे बघून हेच म्हणत असतील.