सर्व धर्मात दान हे पुण्यकर्म समजले जाते. आपल्याकडे धार्मिक कारणासाठी, संकटकाळी मदत म्हणून, सामाजिक बांधिलकी म्हणून दान करण्याची प्रथा आहे. ही मदत प्रत्यक्ष केली जाते किंवा धर्मादाय संस्था, पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी, वगैरे संस्था किंवा निधीद्वारे केली जाते. अशा देणग्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात वजावटीची तरतूद आहे. प्राप्तिकर कायद्यात अशा संस्था किंवा निधी यांना केलेल्या देणग्यांची वजावट करदाता कलम ८० जी या कलमानुसार आपल्या उत्पन्नातून घेऊ शकतो. नवीन करप्रणालीचा स्वीकार करदात्याने केल्यास कलम ८० जी कलमानुसार वजावट घेता येणार नाही.
कोणत्या देणग्या पात्र
काही निधी प्राप्तिकर खात्यातर्फे सूचित करण्यात येतात. धर्मादाय संस्थांना, या वजावटीला पात्र होण्यासाठी, काही अटींची पूर्तता करून प्राप्तिकर खात्याकडून कलम ८० जी नुसार प्रमाणपत्र घ्यावे लागते. असे प्रमाणपत्र असणाऱ्या संस्थांना देणगी दिल्यास करदात्याला त्याच्या उत्पन्नातून कलम ८० जी नुसार वजावट घेता येते.
हेही वाचा… Money Mantra: ई-फायलिंग पोर्टलवर चूक दुरुस्त करण्यासाठी नवी सुविधा
देशाबाहेरील संस्थांना दिलेल्या देणग्यांची वजावट करदात्याला मिळत नाही. राजकीय पक्षांना दिलेल्या देणग्या देखील वजावटीला पात्र नाहीत. देणगी, वस्तूच्या किंवा सेवेच्या रूपाने दिली असेल तर वजावट मिळत नाही. २,००० रुपयांपेक्षा जास्त देणगी रोखीने दिल्यास त्याची वजावट मिळत नाही. देणगी ही चेक, ड्राफ्ट, बँक ट्रान्स्फर, वगैरे माध्यमाद्वारे दिल्यास ती वजावटीस पात्र होते.
किती वजावट मिळते
एक असा समज आहे की देणग्यांवर ५०% वजावट उत्पन्नातून घेता येते. परंतु हे सरसकट सर्वांना लागू नाही. काही देणग्यांवर १००% वजावट मिळते तर काहींवर ५०% वजावट मिळते. काही देणग्यांसाठी पात्र रक्कम उत्पन्नाच्या १०% इतकी आहे. या कलमानुसार देणग्या या चार वर्गात विभागल्या आहेत.
(१) देणगीच्या रकमेवर १००% वजावट, पात्र मर्यादा नाही
(२) १००% वजावट आणि १०% पात्र मर्यादा,
(३) ५०% वजावट, पात्र मर्यादा नाही आणि
(४) ५०% वजावट आणि १०% पात्र मर्यादा.
करदात्याने दिलेल्या देणग्या वरील कोणत्या वर्गात मोडतात हे जाणून घेणे गरजेचे आहे. हे जाणल्यानंतर या कलमानुसार वजावट घेण्यासाठी विवरणपत्रात योग्य सदरात देणगीची रक्कम दाखवावी लागते. पात्र रक्कम गणण्यासाठी उत्पन्न कोणत्याप्रकारचे आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. दीर्घमुदतीचा भांडवली नफा किंवा सूचीबद्ध शेअर्स वर झालेला अल्पमुदतीचा भांडवली नफा हा पात्र रकमेसाठी गणला जात नाही. त्यामुळे करदात्याच्या उत्पन्नात फक्त या उत्पन्नाचा (दीर्घमुदतीचा भांडवली नफा किंवा सूचीबद्ध शेअर्स वर झालेला अल्पमुदतीचा भांडवली नफा) समावेश असेल आणि करदात्याने देणगी दिली असेल तर त्याला ८० जी या कलमानुसार वजावट मिळत नाही.
उदा. एका करदात्याचे खालीलप्रमाणे उत्पन्न असल्यास आणि करदात्याने १ लाख रुपयांची देणगी ८० जी प्रमाणपत्र असलेल्या खाजगी धर्मादाय संस्थेला दिल्यास:
उत्पन्न | रुपये पात्र मर्यादा १०% |
पगाराचे उत्पन्न | ४,५०,००० |
प्रमाणित वजावट | ५०,००० |
बाकी रक्कम | ४,००,००० |
भांडवली नफा
सूचीबद्ध कंपनीच्या विक्रीवरील अल्पमुदतीच्या | २,००,००० |
इतर संपत्तीच्या विक्रीवरील अल्पमुदतीच्या | १,००,००० |
दीर्घमुदतीचा भांडवली नफा | ८,००,००० |
एकूण भांडवली नफा | ११,००,००० |
एकूण उत्पन्न | १५,००,००० |
प्रकारानुसार देणगी | १,००,००० |
कलम ८० जी नुसार वजावट | २५,००० |
पात्र रक्कम गणताना पगाराचे उत्पन्न (४,००,००० रुपये) आणि इतर संपत्तीच्या विक्रीवरील अल्पमुदतीचा भांडवली नफा (१,००,००० रुपये) हे उत्पन्नच गणले जाईल म्हणजे ५,००,००० रुपये इतके असेल. याच्या १०% म्हणजे ५०,००० रुपये आणि देणगी १,००,००० रुपये यामधील जे कमी आहेत ते, म्हणजे पात्र रक्कम ५०,००० रुपये इतकी असेल. ही देणगी ८० जी प्रमाणपत्र असलेल्या धर्मादाय संस्थेला दिली असल्यामुळे या पात्र रकमेच्या (५०,००० रुपयांच्या) ५०% इतकी म्हणजे २५,००० रुपये वजावट करदात्याला घेता येईल.
हीच देणगी १००% वजावट आणि पात्र रक्कम नसलेल्या संस्थेला दिलेली असल्यास संपूर्ण १,००,००० रुपयांची वजावट करदात्याला घेता आली असती.
कोणत्या देणग्या कोणत्या प्रकारात मोडतात:
या प्रत्येक प्रकारामध्ये कोणत्या देणग्यांचा समावेश होतो हे जाणून विवरणपत्रात त्या दाखविल्यास अचूक वजावट घेता येईल.
देणगीच्या रकमेवर १००% वजावट, पात्र मर्यादा नाही: पहिल्या प्रकारात राष्ट्रीय संरक्षण निधी, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी, जिल्हा साक्षरता समिती, राज्य सरकारचा गरिबांसाठी वैद्यकीय निधी, राष्ट्रीय किंवा राज्य रक्त संक्रमण परिषद, राष्ट्रीय खेळ निधी, राष्ट्रीय सांस्कृतिक निधी, तंत्रज्ञान विकास निधी, वगैरे निधी किंवा संस्थांचा समावेश होतो. यांना देणगी दिल्यास यावर १००% वजावट मिळते आणि या रकमेला उत्पन्नाची पात्र मर्यादा नाही.
१००% वजावट आणि १०% पात्र मर्यादा: दुसऱ्या प्रकारात भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन, मान्यताप्राप्त परिवार नियोजन संस्था यांचा समावेश होतो. यांना देणगी दिल्यास यावर १००% वजावट मिळते, या रकमेला उत्पन्नाची १०% पात्र मर्यादा आहे.
५०% वजावट, पात्र मर्यादा नाही: तिसऱ्या विभागात जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंड, प्रधानमंत्री दुष्काळ मदत निधी, राष्ट्रीय बाल निधी, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट, राजीव गांधी फाऊंडेशन, वगैरे निधींचा समावेश होतो. यांना देणगी दिल्यास यावर ५०% वजावट मिळते, या रकमेला उत्पन्नाची पात्र मर्यादा नाही.
५०% वजावट आणि १०% पात्र मर्यादा: चौथ्या प्रकारात कलम ८० जी नुसार प्रमाणपत्र असलेल्या धर्मादाय संस्था यांचा समावेश होतो. यांना देणगी दिल्यास यावर ५०% वजावट मिळते, या रकमेला उत्पन्नाची १०% पात्र मर्यादा आहे.
प्राप्तिकर खात्याने मंजूर केलेल्या वैज्ञानिक, सामाजिक संशोधन करणाऱ्या संस्था, विद्यापीठ, वगैरेंना किंवा ग्रामीण विकासासाठी देणगी किंवा योगदान दिल्यास कलम ८० जीजीए या कलमानुसार करदात्याला देणगीच्या १००% वजावट घेता येते. ज्या करदात्यांच्या उत्पन्नात धंदा व्यवसायाच्या उत्पन्नाचा समावेश असेल अशा करदात्यांना ही वजावट घेता येत नाही. या कलमानुसार सुद्धा २,००० रुपयांपेक्षा जास्त रक्कम रोखीने दिल्यास वजावट मिळत नाही.
हेही वाचा… Money Mantra: स्टार्टअप बिझनेस मॉडेलचे प्रकार
या कलमानुसार वजावट घेण्यासाठी संस्थेकडून देणगी दिल्याची पावती घेणे गरजेचे आहे. या पावतीवर संस्थेचे नाव, पत्ता, पॅन, नोंदणी क्रमाक, कलम ८० जी नुसार नोंदणी क्रमांक, देणगी रक्कम ही किमान माहिती असणे गरजेचे आहे आणि हीच माहिती आपल्याला विवरणपत्रात दाखवावी लागेल. कलम ८० जी नुसार वजावट ही अनिवासी भारतीयांना सुद्धा घेता येते.
मागील वर्षापासून झालेल्या सुधारणेनुसार देणगी स्वीकारणाऱ्या संस्थांना देणग्यांचे वार्षिक विवरणपत्र (फॉर्म १० बीडी) वर्ष संपल्यानंतर ३१ मे पर्यंत दाखल करणे बंधनकारक करण्यात आलेले. आहे. त्यामध्ये देणगीदाराची माहिती, पॅन, देणगी रक्कम, वगैरे तपशील ऑनलाइन सादर करावा लागतो. असे केल्यानंतर देणगीदाराला फॉर्म १० बीई द्यावा लागतो. संस्थांनी हे वेळेवर सादर न केल्यास विलंब शुल्क भरावे लागते. देणगीदाराने आपल्या नोंदींमध्ये १० बीई हा फॉर्म असल्याची खात्री करावी. हा फॉर्म देणगीदाराकडे नसल्यास वजावट नाकारली जाऊ शकते.