पुराणकाळात वामन अवतारात विष्णूने बळीराजाकडे तीन पावलांचे वरदान मागितले होते. पहिल्या पावलात संपूर्ण पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापला, आता कुठेही जागा शिल्लक नसल्याने तिसरे पाऊल बळीराजाच्या डोक्यावर ठेवत, बळीराजाला पाताळात ढकलून दिले गेले. असेच काहीसे निफ्टी निर्देशांकाने मंदीच्या तीन पावलांतून साधले आहे. पहिले मंदीचे पाऊल २६,२७७ ते २३,२६३, दुसरे मंदीचे पाऊल २४,८५७ ते २२,७८६ आणि तिसरे मंदीचे पाऊल २३,८०७ ते २२,७२५ असे. या तीन पावलांत गुंतवणूकदरांच्या समभागांचे बाजारभाव मात्र उच्चांकावरून रसातळापर्यंत ढकलले गेले.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

निफ्टी निर्देशांकाच्या वाटचालीबद्दल गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे, २२,५०० ते २२,६०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ आहे. निर्देशांक हा स्तर राखत असल्याने निफ्टी निर्देशांकावर एक क्षीण स्वरूपातील सुधारणा चालू असून तिचे प्रथम वरचे लक्ष्य २३,२५० आणि दुसरे वरचे लक्ष्य २३,४५० ते २३,५५० असे असेल. ही नाण्याची एक बाजू झाली. मंदीच्या रेट्यात निफ्टी निर्देशांकाला वरील २२,६०० ते २२,५०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ राखण्यास अपयश आल्यास, त्याचे खालचे लक्ष्य २२,२०० ते २१,८०० असे असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना, अद्ययावत अशा एफ ३५ स्टेल्थ लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार झाला. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय कंपन्या आणि त्यातील समभाग हे आपले आजचे ‘बातमीतील समभाग’ असणार आहेत.

 १) हिंदुस्थान अँरोनाँटिक लिमिटेड:-२१ फेब्रुवारीचा बंद भाव- ३,३६८.५० रु. / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-३,२०० रु.  

वरील बातमीच्या सकारात्मक परिणामात,समभागाकडून ३,२०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास,  प्रथम वरचे लक्ष्य ३,७०० रुपये,द्वितीय लक्ष्य ३,९५० रुपये,अन्यथा मंदीच्या रेटयात,सकारात्मक बातमीच निष्फळ ठरल्यास,समभाग ३,२०० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत ३,०५० रुपयांपर्यंत घसरेल.

२)भारत इलेक्ट्राँनिक्स लिमिटेड:-२१फेब्रुवारीचा बंद भाव- २५६.१० रु. / महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-२४०रु.

वरील बातमीच्या सकारात्मक परिणामात,समभागाकडून २४० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास, प्रथम वरचे लक्ष्य २६५ रुपये,द्वितीय लक्ष्य २८० रुपये,अन्यथा मंदीच्या रेटयात,सकारात्मक बातमीच निष्फळ ठरल्यास, समभाग २४० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत,समभाग २२५ रुपयांपर्यंत घसरेल.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Larsen and toubro bhel shares analysis print eco news zws