‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंड’ ही शिफारस प्राप्त समभाग रोखे आणि हायब्रिड म्युच्युअल फंडांची यादी आहे. या यादीचा त्रैमासिक आढावा घेतला जातो. हजारो फंडांमधून पूर्व निश्चित निकषांवर आधारित २० ते २५ अव्वल कामगिरी करणाऱ्या फंडांची निवड केली जाते. वेगवेगळ्या शैली असलेल्या फंडांची समान निकषांवर फंडाच्या कामगिरीचा तौलनिक अभ्यास करून ही संक्षिप्त यादी तयार होत असते. इक्विटी आणि हायब्रिड फंडांसाठी प्राथमिकता जोखीम (स्टॅण्डर्ड डेव्हिएशन) आणि डेट फंडांसाठी कालमर्यादा (ड्युरेशन) या निकषांवर आधारित भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ परिभाषित वेगवेगळ्या फंड गटातून या यादीसाठी फंडांची निवड केली जाते. ‘सेबी’च्या अनेक डझनभर वर्गवारी वापरण्यापेक्षा गुंतवणूकदार स्नेही पद्धतीने वर्गीकरण केले जाते. पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणण्यासाठी विविध रणनीतींचा अवलंब करण्यापेक्षा आपल्याला सोयीचा असणाऱ्या फंडांची निवड करणे श्रेयस्कर असते. ही यादी तयार करताना सर्व आकडेमोडीसाठी ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ वापरली आहे. या यादीचा त्रैमासिक आढावा घेण्याचे उद्दिष्ट नव्याने उपलब्ध होणाऱ्या चांगल्या संधींची वाचकांना ओळख करून देणे हे आहे.
एखादा फंड यादीतून वगळला जातो तेव्हा याचा अर्थ या फंडातून रक्कम काढून घ्यावी असा नसून या फंडांची कामगिरीचे सातत्याने पुनरावलोकन करणे गरजेचे आहे असा होतो. सातत्याने तीन तिमाहीत कामगिरी मानदंड सापेक्ष घसरली तर त्या फंडातून पैसे काढून घ्यावे असा होतो. फंडाच्या कामगिरीत मानदंड सापेक्ष किरकोळ घसरले असतील तर भविष्यात कामगिरी सुधाराला नक्कीच वाव आहे. एक विश्लेषक या नात्याने फंडाच्या कामगिरीचे साप्ताहिक, मासिक पुनरावलोकन सुरूच असते. या पुनरावलोकनातून भविष्यात चांगले कामगिरी केलेले अनेक फंड गवसले आहेत. ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’चा वापर करून पोर्टफोलिओ तयार करायचा असल्यास, तुमचे काम सोपे करण्यासाठी या त्रैमासिक आढाव्याचा वाचक नक्कीच वापर करू शकतील.
हेही वाचा – Money Mantra: सलग तीन दिवसाच्या घसरणीसह आठवड्याचा शेवट
सरलेल्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) खनिज तेलाच्या वाढलेल्या किमतीमुळे वित्तीय तूट वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने तीनही निर्देशांकांनी सकारात्मक कामगिरी नोंदविली. ‘निफ्टी ५०’ ने ३ टक्क्यांपेक्षा थोडी कमी वाढ नोंदविली तर व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे ‘मिडकॅप १५०’ आणि ‘स्मॉलकॅप २५०’ ने अनुक्रमे १३ आणि १७ टक्के त्रैमासिक वाढ नोंदविली. मिड आणि स्मॉल-कॅप निर्देशांकातील तेजीमुळे गुंतवणुकीची कर कार्यक्षमता तपासून जुन्या गुंतवणुकीतून नफा वसुली करावी असा सल्ला द्यावासा वाटतो. या तेजीच्या टिकाऊपणाबद्दल चिंता वाटते. कारण या मार्केट कॅप गटातील अनेक उद्योग क्षेत्रातील मूल्यांकन ऐतिहासिक शिखरावर आहे. यामुळे ‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत काही बदल करणे अपरिहार्य झाले. हे बदल जोखीम व्यवस्थापित करण्याच्या उद्देशाने केले असून भविष्यातील मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील गुंतवणूक सावधपणे करायला हवी. म्हणूनच मिड आणि स्मॉल-कॅप फंड गटात नवीन फंड जोडण्यांपेक्षा या टप्प्यावर लार्ज-कॅप केंद्रित किंवा डायव्हर्सिफाइड फंडांची शिफारस केली आहे.
मागील तिमाहीत ‘एचडीएफसी टॉप १००’चा समावेश ‘कर्त्यां’मध्ये झाल्यानंतर ‘एचडीएफसी फ्लेक्झिकॅप’ या तिमाहीत या यादीचा भाग होणे अपेक्षित होते. त्या अपेक्षेनुसार ‘एचडीएफसी फ्लेक्झिकॅप’ (जुना एचडीएफसी इक्विटी) ने क्रमवारीत चढाई केली आहे. व्यवस्थापनातील फेरबदल आणि निधी व्यवस्थापकांमधील बदलामुळे ‘एचडीएफसी’च्या फंडाचा नव्याने आढावा घेतला. या फंडाची कामगिरी खूप अस्थिर आहे हे लक्षात घेऊन सुरुवातीच्या उत्कृष्ट कामगिरीकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले. आता ३ वर्षांच्या चलत सरासरीच्या आधारे फंडाने एप्रिल २०२० पासून सातत्य राखल्याने या फंडाचा समावेश केला.
फंडाने माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा आणि ऊर्जा यांसारख्या वाजवी मूल्यांकन असलेल्या क्षेत्रांमध्ये वाढविलेली गुंतवणूक पाहता हा फंड कामगिरीतील सातत्य टिकवून ठेवेल असा विश्वास वाटतो. हा फंड एकरकमी गुंतवणुकीपेक्षा नव्याने शिस्तशीर गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून सुरू करण्यास योग्य फंड वाटतो.
हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची
‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड इक्विटी’ या फंडाचा या यादीत पहिल्यांदा समावेश झाला आहे. हा फंडदेखील लार्ज-कॅप केंद्रित असून फंडाने वेळोवेळी उच्च-वाढीच्या उद्योग क्षेत्रांत गुंतवणूक केल्यामुळे मानदंड आणि स्पर्धक फंडांपेक्षा सरस कामगिरी केली आहे. ज्यांची जोखीम क्षमता अधिक आहे असे गुंतवणूकदार या फंडात एकरकमी गुंतवणूक करू शकतात. या व्यतिरिक्त ‘मिरे ॲसेट लार्ज कॅप’ आणि ‘कॅनरा रोबेको फ्लेक्सिकॅप’ हे दोन फंड लक्षवेधी ठरले आहेत. मागील त्रैमासिक आढाव्यात ‘मिरे ॲसेट लार्ज कॅप’च्या कामगिरीत सातत्याने घसरण होत होती. गृहवित्त कंपनी एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळे फंडाचा एचडीएफसी बँकेतील गुंतवणुकीचा हिस्सा वाढला. हा हिस्सा कमी करून माहिती तंत्रज्ञान आणि सिमेंटमध्ये फंडाने वाढविलेल्या गुंतवणुकीचा फायदा फंडाला कामगिरी सुधारण्यात झाला. दुसरीकडे, ‘कॅनरा रोबेको फ्लेक्सिकॅप’ची कामगिरी, जून २०२३ पर्यंत मध्यम कामगिरी असल्याने या यादीचा भाग होता. १ वर्षाच्या चलत सरासरीच्या आधारावर फंडाच्या कामगिरीत किरकोळ घसरण झाली आहे. निफ्टी ५०० निर्देशांक हा फंडाचा मानदंड असल्याने या फंडाच्या गुंतवणुकीत लार्जकॅप गुंतवणुकीवर भर देण्यात आला आहे. या फंडाच्या कामगिरीची तुलना निफ्टी १०० निर्देशांकाशी केली असता या फंडाची कामगिरी अधिक उठून दिसते.
‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडां’च्या यादीत ‘फ्रँकलिन इंडिया अपॉर्च्युनिटीज फंडा’चा नव्याने समावेश झाला आहे. या फंडाचे सविस्तर विश्लेषण प्रसिद्ध झाले होते. सेबीच्या फंड गटानुसार हा फंड थीमॅटिक म्हणून वर्गीकृत केला आहे. एप्रिल-मे २०२२ पासून, फंडाने आपल्या पोर्टफोलिओमध्ये मोठे बदल केले आहेत. जसे की भांडवली वस्तू निर्मात्या कंपन्यांतील गुंतवणूक लक्षणीयरीत्या वाढविली. आर्थिक सेवा आणि वित्तपुरवठा कंपन्यातील गुंतवणूक कमी केली किंवा २०२२ मध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील गुंतवणूक कमी करून आता पुन्हा हळूहळू वाढ करण्यास सुरुवात केली आहे. या बदलांमुळे फंडाची कामगिरी निफ्टी ५०० टीआरआयपेक्षा अव्वल ठरली आहे. फंडाच्या गुंतवणुकीचा ढाचा मल्टिकॅपसारखा असून जोखीम-परतावा गुणोत्तर म्हणजेच ‘रिस्क रिटर्न रेशो’ हा गुंतवणुकीच्या बाजूला कललेला आहे. जे गुंतवणूकदार स्मॉलकॅपमधून बाहेर पडू इच्छितात अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड पर्याय ठरू शकतो. हा अजूनही थीमॅटिक फंड आहे आणि कोणत्याही चुकीच्या ‘सेक्टर कॉल’मुळे फंडाच्या कामगिरीवर लक्षणीय विपरीत परिणाम होऊ शकतो. हा फंड ‘कोअर पोर्टफोलिओ’ नसेल ही खात्री करून या फंडात ५-१० टक्के गुंतवणूक करून पाहायला हरकत नाही.