महाराष्ट्रात आधी राजकीय सुधारणा की सामाजिक सुधारणा हा वाद जितका जुना तितकाच गुंतवणुकीत ‘ग्रोथ की व्हॅल्यू’ रणनीती चांगली, हा वाद जुना आहे. ज्या कंपन्या भविष्यातील नफ्यातील वृद्धीमुळे संभाव्यतेमुळे विस्तृत बाजार निर्देशांकाला मागे टाकण्याची क्षमता आहे, अशा कंपन्या ‘ग्रोथ’ कंपन्या म्हणून ओळखल्या जातात, तर ज्या कंपन्यांचे सध्याचे मूल्यांकन त्यांच्या वास्तवातील मूल्यांकनपेक्षा खाली आहे आणि भविष्यात कधीतरी बाजाराला त्यांच्या खऱ्या मूल्यांकनाची जाणीव होऊन बाजारातील किंमत वाढून मोठा परतावा देतील अशा कंपन्यांना ‘व्हॅल्यू स्टॉक्स’ म्हणून संबोधले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ज्या गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची आहे आणि कमी अस्थिरता हवी आहे, अशा गुंतवणूकदारांसाठी ‘व्हॅल्यू’ रणनीती ही एक चांगली संधी असू शकते. विरोधाभासी गुंतवणूक करून (म्हणजे बहुसंख्य गुंतवणूकदार जे करत आहेत, त्याच्या उलट करणे) आणि बाजाराने दुर्लक्षित केलेल्या कंपन्या वाजवी मूल्यांकनावर खरेदी करून योग्य किंमत मिळेपर्यंत, त्या कंपन्यांतील गुंतवणूक राखून ठेवणे म्हणजे ‘व्हॅल्यू इनव्हेस्टमेंट’ होय. ‘व्हॅल्यू इनव्हेस्टमेंट’ म्हणजे काय हे समजावून घ्यायचे असेल तर वॉरेन बफे यांचे प्रसिद्ध वचन उदधृत करावे लागेल. बफे म्हणतात, ‘व्हॉट यू पे इज प्राइस ॲण्ड व्हॉट यू गेट इज व्हॅल्यू’. साहजिकच ज्या कंपनीचे सध्याच्या अस्थिर बाजारात ‘व्हॅल्यू फंड’ (यांना कॉन्ट्रा फंड असेही म्हणतात) मध्ये गुंतवणूक करणे ही आश्वासक रणनीती असू शकते.

हेही वाचा…बाजारातली माणसं : फंड उद्योगाचा पायाचा दगड, ए. पी. कुरियन

अलीकडच्या काळात बाजारातील अस्थिरता वाढत असताना ‘निफ्टी १००’ या व्यापक निर्देशांकाचे मूल्यांकन सरासरीपेक्षा जास्त आहे. बहुतेक निर्देशांकांचे (‘निफ्टी मिडकॅप १५०’ आणि ‘निफ्टी स्मॉलकॅप १००’) मूल्यांकन नवीन गुंतवणुकीसाठी असुरक्षित पातळीवर आहे. ज्या प्रमाणात निर्देशांक वाढले, त्या प्रमाणात जुलै, सप्टेंबर तिमाहीच्या निकालात कंपन्यांच्या कमाईत (ईपीएस) वाढ झाली नाही.

टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू फंडाला सप्टेंबर महिन्यात २१ वर्षे पूर्ण झाली. या फंडाने स्थापनेपासून वार्षिक १८.०७ टक्के दराने परतावा दिला आहे. अस्थिर बाजारात नव्याने गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू फंड हा एक योग्य पर्याय आहे. मागील दहा वर्षांत टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू फंडाने वार्षिक १३.०७ टक्के दराने आणि पाच वर्षांत वार्षिक २०.२२ टक्के दराने परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा शिस्तशीर पर्याय असलेल्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीवर टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू फंडाने स्थापनेपासून वार्षिक १५.०६ टक्के दराने, दहा वर्षांत वार्षिक १८.२५ टक्के दराने आणि पाच वर्षांत वार्षिक २७.५३ टक्के दराने परतावा दिलेला आहे. साहजिकच म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी त्यांच्या ‘कोअर’ पोर्टफोलिओसाठी या फंडाचा विचार करावा. हा फंड ‘व्हॅल्यू फंड’ गटात गेल्या दशकांमध्ये उत्कुष्ट कामगिरी करणाऱ्या फंडांपैकी एक आहे. या फंडाची पहिली एनएव्ही ५ सप्टेंबर २००३ रोजी जाहीर झाली. बाजार आवर्तनानुसार कमी-अधिक कामगिरी असूनही, या फंडाने मागील वीस वर्षात वार्षिक १५.०७ टक्के दराने परतावा दिला आहे. या कामगिरीमुळेहा हा फंड इक्विटी फंडांत आणि विशेषत: ‘व्हॅल्यू फंड’ गटात उत्कृष्ट कामगिरी करणारा फंड ठरला आहे. या फंडाने कामगिरीत ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला वेगवेगळ्या कालावधीत किमान ३ ते ८ टक्क्यांनी मागे टाकले आहे. नोव्हेंबर २०१४ ते ऑक्टोबर २०२४ या दहा वर्षांच्या काळात पाच वर्षांच्या चलत सरासरीचा (रोलिंग रिटर्न) विचार करता केला जातो, टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू फंडाने सरासरी वार्षिक १३.७८ टक्के दराने परतावा दिला आहे. याच कालावधीत ‘निफ्टी ५०० टीआरआय’ने वार्षिक १२.९६ टक्के दराने परतावा दिला आहे.

वर नमूद केलेल्या कालावधीत, पाच वर्षांच्या चलत सरासरीनुसार फंड आपल्या मानदंड सापेक्ष ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला एकूण डेटा पॉइंट’पैकी ८३.५८ टक्के वेळा मागे टाकण्यात यशस्वी झाला आहे. एकूण आकडेवारीपैकी, २१.२३ टक्के फंडाने २० टक्क्यांहून अधिक, १२ ते २० टक्के दरम्यान ४०.२४ टक्के वेळा, ८ ते १२ टक्के दरम्यान २३.४५ टक्के वेळा, ८ ते ० टक्के दरम्यान ३५.०३ टक्के वेळा आणि ० टक्क्यांपेक्षा कमी १.२८ टक्के वेळा परतावा दिला आहे.

हेही वाचा…खिशात नाही आणा…

टेम्पलटन इंडिया व्हॅल्यू फंड कायम लार्जकॅप केंद्रित राहिला आहे. गुंतवणुकीत दर्जेदार मिड आणि स्मॉल-कॅपचा मर्यादित मात्रेत समावेश करून परतावा वाढविण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे. फंडाच्या पोर्टफोलिओचा ७० टक्के किंवा त्याहून अधिक भाग लार्ज-कॅप कंपन्यांत गुंतवलेला आढळतो. करोनाकाळात २०२० मध्ये फंडाने आयटी फार्म आणि ऑटोमोबाइल यांची मात्रा वाढविली. या उद्योग क्षेत्रांवर गुंतवणुकीचा भर राहिलेला दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत फंडाने बँकांची मात्रा वाढविली. सध्या एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक या आघाडीच्या बँकांमध्ये गुंतवणूक आहेत. सध्या लार्ज-कॅप कंपन्यांचे मूल्यांकन तुलनेने स्वस्त असल्याने भविष्यातदेखील पोर्टफ़ोलिओचा मोठा हिस्सा लार्जकॅप कंपन्यांनी व्यापला असेल. फंडाचा ३-५ टक्के रोख आणि रोखसंलग्न साधनांमध्ये राखण्याकडे कल आहे. अलीकडे फंडाने रोख रक्कम बाळगण्याच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. साहजिकच ताज्या घसरणीचा फंडाला कमी फटका बसला आहे. एकंदरीत, हा फंड वाजवी जोखीम स्वीकारून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करू पाहणाऱ्या गुंतवणूकदारासाठी योग्य गुंतवणूकसाधन आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta money motra article growth and value strategy print eco news sud 02