नमस्कार सर, मी आपला ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’मधील १३ जानेवारी २०२५ चा लेख वाचला. मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी असून अर्धवेळ काम करतो. महिन्याला सगळा खर्च करून दोन हजार रुपये शिल्लक राहतात. एवढ्या कमी पैशात गुंतवणूक करता येणे शक्य आहे का? शक्य असल्यास कोणत्या योजनेत करावी. कृपया सुचवावे. – सुनील
उत्तर : आपण अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेत असाल म्हणजे आपण निश्चितच तिशीच्या आतले असाल, असे गृहीत धरतो आहे. आपण म्हटल्याप्रमाणे अर्धवेळ काम करून दोन हजार रुपये शिल्लक राहत असतील तर त्यातील एक हजार रुपयाची म्युच्युअल फंडात ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) माध्यमातून गुंतवणूक करणे हा चांगला पर्याय आहे. आपल्याला कौटुंबिक जबाबदाऱ्या व अन्य खर्च याचा विचार करता फार पैसे शिल्लक उरणार नाहीत, म्हणूनच गुंतवणूक करण्यासाठी मर्यादा आहेत. ही मर्यादा आणि जोखीम विचारात घेता सगळे पैसे म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजनेत गुंतवणे योग्य ठरणार नाही, म्हणूनच उरलेल्या १००० रुपयांच्या बँकेत आवर्ती ठेवी किंवा ‘हायब्रिड डेट’ प्रकारचे म्युच्युअल फंड या दृष्टीने विचार करता येईल. तुमच्याकडे आकस्मिक खर्चासाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी अन्य स्राोत आहेत असे गृहीत धरले आहे. त्यामुळे म्युच्युअल फंडातील तुम्ही करत असलेली ही गुंतवणूक मध्यम ते दीर्घ काळासाठी ठेवली तर त्याचा निश्चितच फायदा होईल. तुमचे शिक्षण संपल्यावर तुम्हाला पूर्णवेळ नोकरी मिळाली किंवा तुमचा व्यवसाय सुरू झाला तर जसजसे उत्पन्न वाढेल तसतसे ‘एसआयपी’तील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवायला हवे. कमीतकमी तीन ते पाच वर्षे हा कालावधी डोळ्यासमोर ठेवून लार्ज आणि मिडकॅप फंडामध्ये ‘एसआयपी’च्या माध्यमातून पैसे गुंतवणे ही चांगली सुरुवात ठरू शकते. त्याचप्रमाणे पगार वाढत जाईल तसे मुदत विमा आणि आरोग्य विम्याचा समावेश आर्थिक नियोजनात करायलाच हवा.
मी सेवानिवृत्त सरकारी कर्मचारी असून पाच वर्षांपासूनच म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. म्युच्युअल फंड योजनांची नावे वाचताना ‘ब्लू-चिप’ हा शब्द येतो. ‘ब्लू-चिप’ म्युच्युअल फंड आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंड हे वेगवेगळे असतात का? म्युच्युअल फंडाच्या नावावरून आपल्याला हे ओळखता येईल का? – अविनाश बिराजदार
उत्तर : ‘ब्लू-चिप’ हा शब्द फंड योजनेच्या संदर्भात नसून शेअरच्या संदर्भात विचारात घेणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या. शेअरची निवड करताना कंपनीच्या बाजारमूल्यानुसार म्हणजेच आकारमानुसार मोठा, मध्यम आणि लहान विस्तार असलेल्या कंपन्यांना लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप असे म्हणतात. बहुधा म्युच्युअल फंड योजनांना अशीच नावे देण्याचा प्रयत्न केलेला असतो. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, म्युच्युअल फंड योजना अधिक आकर्षक वाटावी अशा प्रकारे तिचे नामकरण करणे आता शक्य होत नाही. त्यामुळेच बऱ्याच फंड योजनांची नावे सारखी वाटतात. तुमच्या प्रश्नाचा विचार करायचा झाल्यास ‘ब्लू-चिप’ या शब्दाचा शब्दश: अर्थ विचारात घेऊया. ज्या कंपनीचे बाजारातील स्थान भक्कम आहे, ज्या कंपनीचा व्यवसाय फायद्यात आहे, कंपनीचे भागभांडवल विस्तारलेले आहे आणि बाजारातील कंपन्यांमध्ये ती कंपनी समभागधारकांना समाधानकारक परतावा देत आहे, असे असेल तर त्या कंपनीचा उल्लेख करताना ‘ब्लू-चिप’ असा शब्द वापरला जातो. सर्वसाधारणपणे लार्ज कॅप या श्रेणीतील फंड योजना बाजारातील उपलब्ध शेअरपैकी पहिल्या शंभर शेअरची निवड आपल्या पोर्टफोलिओसाठी करतात, म्हणजेच या कंपन्या बाजारातील आघाडीचे निर्देशांक निफ्टी आणि सेन्सेक्समधील पहिल्या शंभर कंपन्या असतात. जोखमीचा विचार करता मिडकॅप आणि स्मॉलकॅपपेक्षा लार्जकॅप श्रेणीतील म्युच्युअल फंड योजना कमी जोखमीच्या असतात. फंड निवडताना ‘ब्लू-चिप’ म्हणजे लार्जकॅप असे लक्षात ठेवल्यास हरकत नाही.
(म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी तुमच्या अडचणी, प्रश्न थेट आम्हाला ईमेल arthmanas@expressindia. com द्वारे कळवा)
डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड योजना आणि त्यातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, योजनेविषयीचे दस्तऐवज वाचून आणि गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.