लूमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजी लिमिटेड
(बीएसई कोड ५३२७९६)
वेबसाइट: http://www.lumaxautotech.com
प्रवर्तक: डी.के.जैन समूह
बाजारभाव: ५५५
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ऑटो आन्सिलरी
भरणा झालेले भाग भांडवल: रु. १३.६३ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
पुस्तकी मूल्य: रु.१२३
दर्शनी मूल्य: रु. २/-
लाभांश: २७५%
प्रति समभाग उत्पन्न: रु. २२.८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४.४
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ३२.९
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.९२
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड (आरओसीई): १७.१०
बीटा : ०.७
बाजार भांडवल: रु. ३,७९५ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ६१०/३६३
गुंतवणूक कालावधी : २४ महिने डी.के.जैन समूहाने १९८१ मध्ये लूमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीजची स्थापना केली. वाहन उद्योगातील या कंपनीने गेल्या ४४ वर्षांत चांगली प्रगती साधली आहे. कंपनी भारतातील गियर शिफ्टर्स आणि इंटिरिअर सोल्युशन्सची आघाडीची उत्पादक असून तिचा प्रवासी वाहन ग्राहकांमध्ये ८० टक्क्यांहून अधिक बाजारहिस्सा आहे. कंपनी दोन, तीन आणि चारचाकी वाहनांसाठी ऑटोमोटिव्ह दिवे, प्लॅस्टिक मोल्डेड पार्ट्स आणि फ्रेम चेसिसचे उत्पादन आणि पुरवठा करते. आपल्या विविध उत्पादनांसाठी कंपनीने योकोवो (जपान), जॉप (जर्मनी) तसेच इतर जागतिक कंपन्यांसोबत भागीदारी केली आहे. कंपनीचे २६ उत्पादन प्रकल्प असून ते भारतातील हरियाणा, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये आहेत.
हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा
उत्पादन पोर्टफोलिओ
कंपनीच्या इतर उत्पादन श्रेणीमध्ये इंटिग्रेटेड प्लास्टिक मॉड्युल्स, टू व्हीलर चेसिस, लाइटिंग, गियर शिफ्टर्स, ट्रान्समिशन उत्पादने, एअर इनटेक सिस्टम्स, सीट स्ट्रक्चर्स, टेलिमॅटिक्स उत्पादने, ऑक्सिजन सेन्सर्स, ऑन-बोर्ड अँटेना, इलेक्ट्रिक उपकरणे इ.चा समावेश आहे.
महसूल उत्पादन-श्रेणीनुसार:
ॲडव्हान्स प्लास्टिक: ५७ टक्के
संरचना आणि नियंत्रण प्रणाली: २१ टक्के
आफ्टरमार्केट: १२ टक्के
मेकॅट्रॉनिक्स: ३ टक्के
इतर: ७ टक्के
विभागवार:
प्रवासी वाहन: ५० टक्के
दुचाकी आणि तीन चाकी वाहने: २५ टक्के
आफ्टर मार्केट: १२ टक्के
वाणिज्य वाहने: ९ टक्के
इतर: ४ टक्के
गेल्या वर्षी कंपनीने आयएसी इंडियामधील ७५ टक्के भांडवल ताब्यात घेऊन चार चाकी वाहनांच्या प्लास्टिक श्रेणीमध्ये विविधता आणली. यामुळे कंपनीची बाजारपेठेतील उपस्थिती वाढलीच, त्याशिवाय प्रवासी वाहने उत्पादकांसह व्यवसाय हिस्सा वाढून टू व्हीलर विभागावरील अवलंबित्व कमी झाले.
कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत महिंद्र अँड महिंद्र, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, लुमॅक्स इंडस्ट्रीज, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर, टाटा इ. बड्या वाहन उत्पादकांचा समावेश आहे. कंपनीचे मजबूत वितरण नेटवर्क असून त्यात २७,५०० पेक्षा अधिक ठिकाणी विक्रीपश्चात सेवा देते.
सुमारे १,०५० कोटी रुपयांचे कार्यादेश असलेल्या लूमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीजने सप्टेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिमाहीचे आर्थिक निकाल अपेक्षेप्रमाणे उत्तम नोंदवले आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने २१ टक्के वाढीसह ८४२ कोटी रुपयांची उलाढाल केली आहे, तर नक्त नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत ५६ टक्के वाढ होऊन तो ४३ कोटींवर नेला आहे.
हेही वाचा…बाजाराची घसरगुंडी, गुंतवणूकदारांची घाबरगुंडी!
उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेऊन कंपनी क्षमता विस्तार तसेच उत्पादन सुविधांमध्ये सुधारणा करत असून कंपनीने कॉर्नाग्लियाच्या साहाय्याने चाकण, पुणे येथे एअर इनटेक सिस्टीम्स, ३डी ब्लो-मोल्डेड डक्ट्स आणि युरिया टँक तयार करण्यासाठी त्यांच्या नवीन उत्पादन प्रकल्पाची सुरुवात केली आहे. विक्रीपश्चात सेवेसाठी कंपनीने ऑटोमोटिव्ह केअर सोल्युशन्समध्ये आघाडीवर असलेल्या जर्मनीच्या ब्लूकेम समूहाशी भागीदारी केली आहे. कंपनी लवकरच सीएनजी आणि हायड्रोजन ॲप्लिकेशन्ससह ग्रीन आणि पर्यायी इंधन क्षेत्रात प्रवेश करून, ग्रीनफ्यूल एनर्जी सोल्युशन्सच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून लूमॅक्स ऑटो टेक्नॉलॉजीज फायद्याची ठरू शकेल.
शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सध्याच्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे. अजय वाळिंबे Stocksandwealth@gmail.com वरील लेख केवळ विश्लेषणात्मक संशोधन असून तो गुंतवणूक सल्ला नाही.
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या ०.१% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेट वस्तू घेतलेली नाही.
लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.