तृप्ती राणे
गेल्या आठवड्यात निफ्टीने २० हजार अंशांची ऐतिहासिक विक्रमी पातळी गाठली आणि सेन्सेक्सनेदेखील नवीन उच्चांकी पातळीला स्पर्श केला. परिणामी भांडवली बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा बाजाराने तेजीच्या दिशेकडे आगेकूच सुरू केल्याचे दिसते आहे. मागच्या आठवड्यातील मंगळवार वगळला तर सर्व सत्रात बाजारात तेजी होती. काही गुंतवणूकदारांनी मंगळवार आणि बुधवारच्या सत्रात नफावसुली केली. मात्र बाजाराने पुन्हा नवी मजल गाठायची तयारी सुरू केली आहे. सध्या बाजारासाठी कोणतीच नकारात्मक बाब किंवा कोणतीच वाईट बातमी नाही. तसेच अर्थव्यवस्थापण ठीक आहे, महागाई नरमली आहे तर बाजार खाली येण्याची शक्यता नाही, असे बऱ्याच गुंतवणूकदारांना वाटण्याची दाट शक्यता आहे. आपण या काळात जोखीम वाढवून बाजारात पैसे गुंतवायचे का? कर्ज घेऊन गुंतवणूक करूया का? स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांचे समभाग अजून परतावे देऊ शकतात का? बाजारात खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? आजच्या लेखामधून आपण या किल्ष्ट परंतु महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत जाणून घेणार आहोत.
सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवूया – जेव्हा तळागाळातील समभागांना उधाण येते. कारण नसताना उगीच एखाद्या समभागाचा भाव वाढू लागतो आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये पैसे फिरायला सुरुवात होते, तेव्हा साधारणपणे बाजार आता खाली येण्याची लक्षणे दिसू लागतात. बाजार किती आणि कधी खाली येणार याचा ढोबळ अंदाज बाजारतज्ज्ञ बांधू शकतात. मात्र निश्चित वेळ आणि किती घसरणार हे कोणीही सांगू शकत नाही. शिवाय मार्केटचा पीई गुणोत्तर (जास्त पीई म्हणजे धोका) आणि व्हीआयएक्स (बाजार जास्त पडताना हा खूप झपाट्याने वर जातो) हेसुद्धा काही अंशी पुढील भाकीत सांगू शकतात. मात्र सामान्य गुंतवणूकदाराला हे गुणोत्तर समजायला किचकट आहे.
आणखी वाचा-शिक्षण आणि प्राप्तिकर कायद्यातील वजावटी
आपला पोर्टफोलिओ हा मुळात कशा पद्धतीने बनवला आहे? त्यात कुठल्या प्रकारचे समभाग व म्युच्युअल फंड, रोखे आहेत यावर पोर्टफोलिओची जोखीम ठरते. स्मॉल-मिडकॅप कंपन्या व म्युच्युअल फंड असणारे पोर्टफोलिओ हे जास्त जोखमीचे मानले जातात. शिवाय एखाद्या शेअर किंवा क्षेत्रात ५ ते ६ टक्क्यांहून अधिक प्रमाण असलेली गुंतवणूक आक्रमक मानली जाते. याउलट लार्ज कॅप कंपन्यांचे समभाग व म्युच्युअल फंड, बॅलन्स्ड म्युच्युअल फंड हे आधीच्या प्रकारापेक्षा कमी जोखमीचे असतात. रोखे संलग्न गुंतवणूक पर्यायांमधील जोखीम ही समभाग निगडित पर्यायांच्या मानाने जरी कमी असली तरीदेखील महागाई आणि अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभतेच्या अधीन असते. तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने त्याचा पोर्टफोलिओमध्ये नक्की कुठे जोखीम जास्त आहे हे समजून घ्यायला हवे.
आपण एखादी गोष्ट महाग आहे की नाही हे तिची आधी किंमत किती होती? मागणी पुरवठा समीकरण आधीसारखे होते की विस्कळीत होते हे बघून ठरवतो. आपल्या गुंतवणुकीच्या बाबतीत असेच समीकरण असते. समभागाच्या बाबतीत मागील पीई गुणोत्तर, कंपनीची मागील कामगिरी, येत्या काळातील वाढीचे अंदाज, क्षेत्राचे चक्र आणि मुळात एकूणच बाजारातील परिस्थिती याचा अभ्यास करावा लागतो. एखादा समभाग काहीही कारण नसताना फक्त किमतीमध्ये वाढ दाखवतो आहे. तसेच मागील तुलनेमध्ये कमी प्रमाणात अशा शेअरची खरेदी-विक्री होत आहे तर अशा वेळी सावध होऊन जमा झालेला नफा टप्प्याटप्प्याने काढावा. जर तो समभाग खरेच चांगला असेल तर पुढे खाली पडल्यावर तो पुन्हा कमी किमतीत विकत घेता येऊ शकतो. त्यातही तो बाजारापेक्षा कमी पडला तर तो चांगल्या प्रतीचा आहे असे आपण समजू शकतो. उदाहरण घ्यायचे झाल्यास २० टक्के समभाग प्रत्येक टप्प्यावर विकले की फायदापण सुरक्षित होतो आणि पुढे जाऊन तो अजून वाढला तर आपल्याला अजून फायदा कमावता येतो. जे गुंतवणूकदार बाजार रोज बघतात त्यांना ‘ट्रेलिंग स्टॉप लॉस’ लावूनदेखील फायदा होतो. समभाग वर जात असताना आधीच्या कमी किमतीवर ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवायचा आणि रोज ती किंमत वाढवत न्यायची. इथे फक्त एक गडबड होऊ शकते. जर एखादा शेअर दर दिवशी ‘लोअर सर्किट’ लागून खाली आला तर कदाचित गुंतवणूकदाराला त्यातून बाहेर पडताना कठीण होईल.
आणखी वाचा-वित्तरंजन : गुंतवणुकीचे अपारंपरिक पर्याय
म्युच्युअल फंडांच्या बाबतीत काही ठरावीक सूचक पाहिले तरी आपले काम बऱ्यापैकी होऊ शकते. म्युच्युअल फंडाचा सध्याचा परतावा आणि मागील ३ वर्षांच्या परताव्यामध्ये वाढणारा फरक, त्याचे नेहमीपेक्षा वाढलेले स्टॅंडर्ड डेव्हिएशन आणि बीटा हे सर्व बघून अंदाज बांधता येतात. काही महिन्यांपूर्वी स्मॉल आणि मिड कॅप फंडाचे परतावे निफ्टी आणि लार्ज कॅप म्युच्युअल फंडांपेक्षा कमी होते, पण मागील दोन महिन्यांपासून त्यांचे परतावे वेगाने वाढले. आता महागाई वाढत असताना, व्याजदर खाली येण्याची कोणतीही चिन्हे नसताना आणि पाऊस कमी झाल्याने अनेक ठिकाणी दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होत असताना दिसते आहे. तरी लहान कंपन्यांचे समभाग तेजीत का आहेत हा प्रश्न गुंतवणूकदाराला पडला पाहिजे. क्षेत्रीय फंडांच्या बाबतीत मात्र हे समीकरण वेगळे असते. क्षेत्राच्या चक्रानुसार या फंडांची कामगिरी असते. तेव्हा सध्या कोणते क्षेत्र कसे आहे? येणाऱ्या काळातील त्याच्या वाढीचे अंदाज काय आहेत? आणि पुन्हा मूळ बाजारामध्ये परकीय गुंतवणूक, व्याजदर आणि महागाईचे कोणते संकेत मिळत आहेत हे सर्व पाहावे आणि मग निर्णय घ्यावा. जे गुंतवणूकदार एसआयपीच्या माध्यमातून पैसे जमा करत आहेत, त्यांनीदेखील जमा झालेल्या युनिटमधून काही युनिट विकले पाहिजेत. मिळालेले पैसे संधी मिळाली की पुन्हा म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी किंवा शिस्तबद्ध हस्तांतर पर्याय अर्थात एसटीपीच्या माध्यमातून गुंतवावे. मात्र क्षेत्रीय फंडात जर त्या क्षेत्राची कामगिरी भविष्यात चांगली राहणार नसेल तर, अधिकाधिक निधी बाहेर काढून घ्यावा.
हा काळ कर्ज घेऊन गुंतवणूक करण्याचा नाही. तेव्हा गुंतवणूकदारांनी जलद नफा मिळवायच्या लालसेने बाजारात मोठी गुंतवणूक करू नये. पुढे जेव्हा केव्हा व्याजदर खाली येतील आणि इतर आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा हे धाडस करण्यास हरकत नाही. मात्र अशा पद्धतीने केलेल्या गुंतवणुकीतून कुठल्याही परताव्याची हमी देता येत नाही. परंतु व्याज दर कमी असतील तर नुकसान कमी होऊ शकते.
आणखी वाचा-प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची: सोने तारण कर्ज किती प्रकारात मिळते?
गुंतवणूदाराला कायम त्याचा पोर्टफोलिओमधील भरपूर परतावा देणारा हवा असतो. मात्र बाजारातील चढ-उतार हा बाजाराचा गुणधर्मच आहे. तेव्हा फक्त आपले परतावे बघत बसण्यापेक्षा त्यातील नफा पदरात पडून घ्यायला हवा. महत्त्वाचे म्हणजे ते पुन्हा एखाद्या चांगल्या गुंतवणूक साधनांमध्ये गुंतविता येईल. त्यातून संपत्ती निर्मिती व्यवस्थित होऊन जोखीम व्यवस्थापनदेखील नीट करता येते. येत्या काळामध्ये जरी आपण आपल्या अर्थव्यवस्थेबाबत खूप आश्वासक असलो तरीसुद्धा बाजाराचे चक्र समजून जे गुंतवणूकदार वागतील त्यांना त्यांची चिकाटी आणि शिस्तीचा नक्की फायदा होईल.
सूचना: बाजाराचा पीई गुणोत्तर मोजायची पद्धत ३१ मार्च २०२१ पासून बदलण्यात आली आहे. तेव्हा गुंतवणूकदारांनी मागील पीई गुणोत्तर वापरताना या गोष्टीची नोंद घ्यावी.
trupti_vrane@yahoo.com
प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.