इतिहासातल्या पुतण्याला ‘काका मला वाचवा’ टाहो फोडावा लागला होता. राजकारणातले काका-पुतणे नात्यांचे रंगही वेगळेच. तर उद्योग- व्यवसायातील केशुब महिंद्र आणि आनंद महिंद्र हे काका-पुतण्याचे वेगळेच नाते आपल्यापुढे आहे. केशुब महिंद्र यांना मुलगा नसल्याने त्यांनी सुरू केलेला उद्योगसमूह सांभाळण्याची जबाबदारी आनंद महिंद्र यांच्याकडे आली. ती त्यांनी यशस्वीपणे सांभाळलीच, शिवाय वडील हरीश महिंद्र यांनी सुरू केलेले व्यवसायसुद्धा चांगल्याप्रकारे वाढवले. त्यांची कामगिरी बाजार मूल्यांकनाच्या भाषेत जर मोजायची तर, महिंद्र ॲण्ड महिंद्र या कंपनीचे बाजार मूल्यांकन ३ लाख कोटी रुपये झाले आहे. येथे केवळ फक्त एकाच कंपनीच्या बाजार मूल्यांकनाला विचार घेतले आहे. कारण २७ डिसेंबर २००५ या दिवशी महिंद्र ॲण्ड महिंद्रचे बाजार मूल्यांकन ७,०६८ कोटी रुपये होते. त्यामुळे गेल्या २० वर्षात बाजार मूल्यांकन ४० पट वाढलेले आहे. भारतातली सर्वात मोठी खासगी क्षेत्रातली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिज या कंपनीचे बाजार मूल्यांकन २० वर्षात २० पट वाढले आहे. त्या तुलनेत आनंद महिंद्र यांची कामगिरी निश्चितच उल्लेखनीय आहे. या कामगिरीचे महत्त्व एवढ्यासाठी विचारात घ्यायचे की, ४ सप्टेंबर १९९१ ला ते महिंद्रचे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर झाले, २००१ ला व्हाइस चेअरमन, ऑगस्ट २०१२ ला चेअरमन आणि २०१६ पासून एक्झिक्युटिव्ह चेअरमन असा त्यांचा प्रगतीचा आलेख आहे. लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने भारतीय भांडवल बाजाराचा चेहरा असा समर्पक उल्लेख आनंद महिंद्र यांचा म्हणूनच केला होता.
वडिलांकडून आणि काकांकडून जे मिळाले त्यात आणखी वेगाने प्रगती करण्याची जबाबदारी आनंद महिंद्र यांच्यावर येऊन पडली. तुलनेने केशुब महिंद्र यांना त्यांची महिंद्र कंपनी सांभाळणे सोपे होते. कारण त्या काळात वाहन उद्योगात स्पर्धा कमी होती. महिंद्रच्या जीपला स्पर्धकच नव्हता आणि पुन्हा ठरावीक कंपन्याच ट्रॅक्टर उत्पादनाच्या क्षेत्रात होत्या.
हेही वाचा >>>रुपया ८५.८१ नवीन तळ गाठून सावरला; तरी सत्रांतर्गत २७ पैशांची घसरण
आनंद महिंद्र यांनी जेव्हा जबाबदारी स्वीकारली तेव्हा अर्थव्यवस्था खुली करण्याचा महत्त्वाचा निर्णय डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतला होता. वाहन उद्योगात स्पर्धा सुरू झाली होती. अशा वेळेस स्पर्धेवर यशस्वीपणे मात करून कंपनी वाढवणे हे फार मोठे आव्हान होते. ते आव्हान आनंद महिंद्र यांनी यशस्वीरीत्या पेलले.
शिक्षण हार्वर्डला झालेले होते. आर्किटेक असलेला माणूस चित्रपट निर्मितीच्या कलेकडेसुद्धा आकर्षित झाला होता. १९७७ ते १९८१ शिक्षण पूर्ण करून महिंद्र युजिन या वडिलांच्या कंपनीमध्ये छोट्या पदावर त्यांनी सुरुवात केली आणि त्यानंतर प्रेसिडेंट, डेप्युटी एमडी अशा त्यांच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. आता महिंद्र उद्योग समूह इतक्या वेगवेगळ्या व्यवसायात आहे की, त्यातले काही निवडक व्यवसायांची नावे अडीच-एक डझनवारी होतील. या स्तंभातून उदय कोटक यांच्यावर लिखाण केलेले आहे. आर्थिक क्षेत्रात हे नाव आज फार मोठे असून त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांना आनंद महिंद्र यांची मदत झाली याचा ते कायम उल्लेख करतात. फक्त महिंद्र हे नाव वापरले म्हणून सुरुवातीच्या काळात उदय कोटक यांची प्रगती झाली. महिंद्र यांनी स्वतःची ॲसेट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली तरीसुद्धा कोटक महिंद्र एएमसी हे नाव कायम आहे.
एखादा उद्योगपती ज्यावेळेस व्यवसायाच्या वाढीचे निर्णय घेतो तेव्हा सर्व निर्णय योग्यच ठरतील याची शाश्वती नसते. सुरुवातीच्या काळात आनंद महिंद्र यांनी वाहन उद्योगाच्या वाढीसाठी परदेशी कंपन्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचे प्रयत्न केले. परंतु ते संबंध बदलत गेले, टिकाऊ राहिले नाहीत. असे व्यवसायात घडतच असते. रेवा हे इलेक्ट्रिकल मोटार महिंद्रकडे कशी आली त्याचीसुद्धा वेगळी कथा आहे. पूर्वीची मायको आताची बॉश या कंपनीमध्ये उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम केलेल्या मैनी यांनी मैनी प्रीसिजन म्हणून स्वतःची कंपनी सुरू केली आणि त्याचबरोबर रेवा इलेक्ट्रिक कार निर्मिती केली. परंतु निर्मिती करणे सोपे असते विक्री व्यवस्थेचे जाळे निर्माण करणे हे अवघड असते. म्हणून पुढची जबाबदारी आनंद महिंद्र यांच्यावर सोपवली. महिंद्र कंपनीला इलेक्ट्रिक मोटार बाजारात आणणे सोपे गेले. परंतु नंतर या शर्यतीत टाटा मोटर्स पुढे निघून गेली.
हेही वाचा >>>बजाज ऑटोकडून नवीन इलेक्ट्रिक चेतक दाखल
आनंद महिंद्र यांनी सुलज्जा मोटवानी-फिरोदिया यांना कायनेटिक होंडा यामध्ये अडचणी निर्माण झाल्या म्हणून मदत केली होती. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. बाजारात विविध कंपन्यांच्या कामगिरीचे फार बारकाईने निरीक्षण होत असते. अपयशी ठरलेल्यांना बाजार शिक्षा करतो तर ज्यांनी यश मिळवले त्यांच्या मागे धावतो. आनंद महिंद्र यांनी आपला व्यवसाय सांभाळून अनेक क्षेत्रात काम केलेले आहे. १९९६ ला ‘नन्ही कली’ ही संकल्पना राबवणे किंवा कबड्डी या खेळाच्या विकासासाठी प्रयत्न करणे हेसुद्धा त्यांचे महत्त्वाचेच योगदान आहे.
आनंद महिंद्र यांनी कंपनीचे बाजार मूल्यांकन २० वर्षात चांगल्या प्रकारे वाढवले हे स्पष्ट केले. परंतु आता आणखी एक महत्त्वाची आकडेवारी वाहन उद्योगातील पहिल्या ५० कंपन्यांचे बाजार मूल्यांकनाची. ही आकडेवारी जर वाचली तर महिंद्र कंपनी अकराव्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक टेस्ला या अमेरिकन कंपनीचा आहे, जिचे बाजार मूल्यांकन १.२३ लाख कोटी डॉलर तर ११ व्या स्थानावरील महिंद्रचे ४३.१२ अब्ज डॉलर. महिंद्रच्या खालच्या क्रमांकावरील निवडक सुपरिचित नावे पाहा – १२) फोर्ड ४२.२६ अब्ज डॉलर, १३) मारुती सुझूकी ४१.८ अब्ज डॉलर, १४) होंडा ४०.६८ अब्ज डॉलर, १६) ह्युंडाई ३४.७० अब्ज डॉलर, १७) टाटा मोटर्स ३४.६७ अब्ज डॉलर, २३) सुझूकी २१.१० अब्ज डॉलर, २९) रेनॉ १३.३२ अब्ज डॉलर, ३७) निस्सान ८.८९ अब्ज डॉलर, ४०) वोल्व्हो ६.९७ अब्ज डॉलर, ४४) माझ्दा ४.०९ अब्ज डॉलर, ४५) मिस्तुबिशी ४.०९ अब्ज डॉलर. महिंद्रने मारुती सुझुकी, टाटा मोटर यांना मागे टाकले. परंतु त्यापेक्षाही वाहन उद्योगातील परदेशी कंपन्यांनाही मागे टाकले आहे. महिंद्रचे बाजार मूल्यांकन संचालक मंडळाला प्राधान्यक्रमाने कमी अधिमूल्याला शेअर्स देऊन वाढलेले नाही. उगाचच हक्कभाग (राइट्स शेअर्स), परिवर्तनीय रोखे विक्रीस आणायचे, असेही त्यांनी केलेले नाही. म्हणून योग्य पद्धतीने कंपनीचे बाजार मूल्यांकन वाढवणारा हा बाजाराचा माणूस आहे.