प्रमोद पुराणिक
अमेरिकेत छोटेखानी गावी १९ ऑक्टोबर १९४२ रोजी जन्मलेले जेम्स बीलँड रॉजर्स ज्युनियर अर्थात जिम रॉजर्स हे नाव पुढे जाऊन जागतिक भांडवली बाजारातील सर्वात दखलपात्र नाव बनेल, याची त्यावेळी कुणी कल्पनाही केली नसेल. त्यांच्या अल्बामामधील डेमोपोलीस या गावाची १९४२ सालची लोकसंख्या होती फक्त ७८००. त्यांच्या वडिलांचा लक्षात राहण्यासारखा टेलिफोन क्रमांक होता तो म्हणजे ५ (अर्थात टेलिफोनधारकही बोटावर मोजण्याइतकेच) जवळच्या एलमा नावाच्या मोठ्या गावात वडिलांची बार्डन केमिकल कंपनी होती. जिम यांना शिक्षण घेण्यासाठी ॲाक्सफर्डला जायचे होते. पण उन्हाळी सुट्टीत काहीतरी काम करावे म्हणून ते डॅामिनिक अँड डॅामिनिक या संस्थेत नोकरीसाठी मुलाखत देण्यास गेले. त्यांना शेअर बाजाराची काहीही माहिती नव्हती. त्यापेक्षा आपल्याला इंटरनॅशनल फायनान्समध्ये जास्त रस आहे, याचा त्यांना या निमित्ताने साक्षात्कार झाला.
त्याच्या कारकीर्दीचा हा कल पुढे कसा विकसित होत गेला याबद्दल प्रचंड माहिती उपलब्ध आहे. त्याबद्दल आणखी काही लिहायची गरजही नाही. जगातील प्रमुख शेअर बाजारात त्यांनी काय व्यवहार केले, कसा पैसा मिळवला या विषयावर थोडासा प्रकाश टाकण्याच्या हेतूने हा लेख देत आहोत. आपल्याकडे भारतीय शेअर बाजार गाजवणारे खूप असामी होऊन गेले आहेत. अजूनपर्यंत जिम यांच्यासारखी महत्त्वाकांक्षा असलेली व्यक्ती मात्र येथे जन्माला आलेली नाही. अर्थात असे होण्याला अनेक कारणे आहेत. जसे आपल्या रुपयाने डॅालरपेक्षा जगात मोठे व्हावे असे आपल्याला वाटते, परंतु ते जसे शक्य नाही तसेच हेही अवघडच.
ऑस्ट्रियातील १९६१ ते १९८४ हा काळ. ही तब्बल २३ वर्षे या देशाचा शेअर बाजार सुस्त होता. जिम यांनी या बाजाराकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. प्रथम या देशाच्या निर्देशांकाचा अभ्यास केला. मॅार्गन स्टॅन्लेने तयार केलेला ऑस्ट्रिया निर्देशांक ६७ पीई रेशो दाखवत होता. या निर्देशांकात फक्त नऊ कंपन्या होत्या, त्यापैकी तीन कंपन्या तोट्यात चालणाऱ्या होत्या. मॅार्गन स्टॅन्लेने जिम यांना सांगितले की, या बाजारात अजिबात रोखता (तरलता) नाही. जिम त्यांना म्हणाले, सारे सुरळीत करायचे तर निर्देशांकालाच गोळी मारा. बँका परस्परांशी शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करायच्या. बाजारात बरेच व्यवहार नोंदवले जात नव्हते याची दखल मॅार्गन स्टॅन्लेने केलेल्या अभ्यासात घेतली गेली नव्हती. जिम यांनी या बाजारात गुंतवणूक केली. अर्थातच बक्कळ पैसाही कमावला. बाजाराचा निर्देशांक अकस्मात १४५ टक्क्यांनी उसळला.
याच तऱ्हेने जर्मनीच्या शेअर बाजारात १९८६ ला फक्त १८ महिन्यांत जिम यांनी दामदुप्पट कमाई केली. त्या अगोदर १५ वर्षे हा शेअर बाजार झोपलेला होता. जर्मनीमध्ये सुधारणा पर्व सुरू झाले. जर्मनीच्या शेअर दलालाने जिम यांना सांगितले की, बाजारातील चढ-उतार आम्ही रोजच्या रोज कळवत जाऊ. “मला तुमच्या रिपोर्टची गरजच नाही, उगाचच मला शेअर विकण्याची इच्छा होईल,” हे जिम यांचे त्याला उत्तर होते. त्याच्या मते बाजारात अवास्तव माहितीची आवश्यकता नसते. या बाजारातही त्यांनी भरपूर पैसा कमावला हे वेगळे लिहिण्याची आवश्यकता नाही.
प्रत्येक शेअर बाजारात तेजी करूनच पैसा मिळवता येतो असे अजिबात नाही. स्वीडनचा शेअर बाजार चार वर्षांत सहापट वाढला होता, या बाजारात मंदी करून त्याने पैसा कमावला. नॉर्वेच्या शेअर बाजारात परत त्याने असाच खेळ केला. १९८६ ला बाजारात शेअर्सची अगोदर विक्री करून ठेवली होती. नोव्हेंबर १९८७ ला जास्त भावाने विक्री केलेले सर्व शेअर्स कमी भावाने खरेदी करून पैसा कमावला.
जगाच्या सर्व शेअर बाजारात काय घडते आहे याकडे हा माणूस अत्यंत बारकाईने लक्ष ठेवतो. सिंगापूर शेअर बाजारात पॅन इलेक्ट्रिकल या कंपनीचे दिवाळे निघाले. पाठोपाठ हाँगकाँग, मलेशिया. बरमुडा या ठिकाणीसुद्धा पॅन इलेक्ट्रिकल्सच्या उपकंपन्यांचे दिवाळे निघाले. सिंगापूर शेअर बाजार सरकारने भीतीपोटी बंद करण्याचा चुकीची निर्णय घेतला. बाजार जेव्हा उघडला तेव्हा यामुळे आणखी २५ टक्के घसरण झाली. मलेशिया, सिंगापूर या शेअर बाजारात नवीन शेअर्स विक्रीस आणणे तात्पुरते बंद केले होते. बाजारात शेअर्सचा पुरवठा कमी झाला. फक्त १८ महिन्यांत दोन्ही शेअर बाजार दुप्पट झाले.
ब्राझीलच्या शेअर बाजारात सुरुवातीला खरेदी-विक्रीचे व्यवहार नंबर दोनमध्ये चालत होते. बाजाराची माहिती घेण्यासाठी जिम जेव्हा ब्राझीलला गेले तेव्हा संबंधित अधिकाऱ्याने काय सांगावे – ‘गुंतवणूक करावयाची असेल तर माझ्या नावावर करा.’ अर्थातच अशा प्रकारच्या व्यवहाराला जिम यांनी स्पष्ट नकार दिला. देशाची निवड कशी करायची याबाबतसुद्धा जिम यांचे काही पक्के आडाखे असतात. प्रगती होत आहे अशी चिन्हे दिसू लागली आहेत, दृश्य स्वरूपात आहेत त्यापेक्षा खरोखरीची प्रगती जास्त आहे, चलन परिवर्तनीय आहे, बाजारात रोखता आहे अशा देशात गुंतवणूक करायची, असे त्यांचे धोरण राहिले आहे.
इंडोनेशियाने आपले चलन १९८८ ला परिवर्तनीय केले. देशात शेअर बाजार सुरू करावा अशी विचारसरणी उदयास आली, बाजारात प्रथम फक्त २४ कंपन्यांचे शेअर्स सूचिबद्ध करण्यात आले. काही शेअर्समध्ये परदेशी गुंतवणूक चाले याचा जिम यांनी फायदा घेतला. आपल्या देशाच्या जवळच्या नेपाळमध्ये शेअर बाजार अस्तित्वात आहे याची आपल्या देशवासीयांना कल्पना नसेल, परंतु जिम अमेरिकेतून नेपाळला पोहचले, फक्त नऊ कंपन्यांचे शेअर्स आणि अत्यंत तुरळक व्यवहार यामुळे व्यवहार करायचा नाही असा त्यांनी निर्णय घेतला. मोटारसायकल घेऊन नंतर हिमालयात फिरले आणि ते परत मायदेशी परतले.
सर्वात शेवटी या माणसाचा गुरू कोण असावा याची उत्सुकता निर्माण झाली. जॅार्ज सोरोस फंड चालवून ३१/१२/१९६९ ते ३१/९/१९८० या कालखंडात या फंडाने ३३६५ टक्के परतावा मिळवून दिला. जिम यांनी संशोधन करायचे आणि सोरोस यांनी खरेदी-विक्री व्यवहार सांभाळायचे, असे सुरू होते. आकारमान खूप मोठे झाले, योग्य परतावा मिळणार नाही म्हणून जिम बाजूला झाला. शेवटी फक्त महत्त्वाचा उल्लेख करायचा आहे – बाजारात पैसा कमावणाऱे शेअर बाजाराचे प्रशिक्षण वर्ग चालवत नाहीत, परंतु कोलंबिया ग्रॅज्युएट स्कूल या ठिकाणी जिम यांनी प्रशिक्षण वर्ग सुरू केले. त्याचेही सोने झाले, म्हणजे एकदा खुद्द वॅारन बफे यांनी त्याठिकाणच्या प्रशिक्षणाला हजेरी लावली..