कौस्तुभ जोशी
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची आततायी धोरणे या पार्श्वभूमीवर बाजाराला जे घसरणीचे ग्रहण लागले होते, त्याला मागच्या आठवड्यात लगाम लागायला सुरुवात झाली. आधीच्या बाजाररंगमध्ये म्हटल्याप्रमाणे ट्रम्प प्रशासनाकडूनच आता विविध मार्गाने व्यापार कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू होतील व तसे आता होताना दिसत आहे. प्रत्यक्षात व्यापार कोंडी करून अन्य देशाचे नुकसान होणार आहे तसेच ते अमेरिकेलाही होणार आहे. बेभरवशाच्या प्रशासकाने अशा प्रकारे निर्णय घेणे कधी कधी आपल्याला शेअर विकत घेण्याची संधी देऊन जाते ती अशी!
मात्र हे होत नव्हते तेवढ्यात मागच्या आठवड्यात जम्मू आणि काश्मीरमधील पर्यटकांवर झालेल्या नृशंस हत्येमुळे दक्षिण आशियातील भारतीय उपखंडात पुन्हा एकदा आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. एरवी दोन्ही देशांतील व्यापार व हवाई हद्द बंद करण्यापर्यंत परिस्थिती जाते आता मात्र थेट नद्यांचे पाणी अडवण्यापर्यंत परिस्थिती चिघळली आहे व असे करणे युद्धाची नांदीच ठरणारे असेल असेही बोलले जात आहे. अशी कारणे मिळाल्यावर बाजाराने पुन्हा एकदा सपाटून मार खायला सुरुवात केली नसती तरच नवल!
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भूराजकीय संबंध कसेही असले तरीही या दोन देशांमधील युद्ध फार काळ टिकत नाही. किंबहुना या दोन देशांत शांतता नांदावी अशी जगभरच्या बड्यांची भूमिकाच नाही! त्यामुळेच पाकिस्तानसारखा कंगाल झालेला देश युद्धखोरीची भाषा कोणाच्या पाठिंब्यावर करू शकतो? हे कळणे सोपे आहे. १९९९ या वर्षी झालेले कारगिल युद्ध, मागच्या दशकात घडून आलेला पुलवामा हल्ला यांचा शेअर बाजारावर प्रभाव अगदी तेवढ्यापुरताच होता. त्यामुळे युद्धाच्या नांदीचे बाजारावर जे परिणाम होतात ते मंदीत संधी म्हणून पाहिले पाहिजेत आणि कोणत्याही प्रकारची शंका घ्यायला नको. दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्यामुळे या देशातील युद्ध जगाला परवडणारे नाही. अशा अस्थिरतेत बाजार कोसळले तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विकत घेण्यासाठी तुम्ही हेरून ठेवलेले शेअर जर तुमच्या निर्धारित किंमत पातळीवर आले तर ते घ्यायला विसरू नका!
आगामी काळात तीन विषय महत्त्वाचे ठरणार आहेत.
जीएसटीची आकडेवारी
– गेल्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकामुळे अनेक राज्यांमध्ये आचारसंहिता लागू असल्यामुळे सरकारी खर्चांवर मर्यादा येत होत्या व त्याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेत क्रयशक्तीवर दिसून आला. आता तशी स्थिती नसल्यामुळे सरकारी खर्चाचे वस्तू आणि सेवाकर अर्थात जीएसटीमधील परिवर्तन बघायला मिळते का? हे महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातील क्रयशक्ती कमी असणे हे एफएमसीजी कंपन्यांसाठीचे कोडेच आहे, ते दूर होते की नाही? तेसुद्धा जीएसटीच्या आकड्यांवरून येत्या चार महिन्यांत सिद्ध होणार आहे.
वित्तीय तूट आणि व्यापारी तूट
– सरकारने अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन सुदृढतेसाठी वित्तीय तूट नियंत्रणात ठेवण्याचे लक्ष्य अर्थसंकल्पात ठेवले आहे. मात्र यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ सरकारकडे नसले तर निर्गुंतवणूक हा एकच मार्ग उरतो व ते लक्ष्य मागच्या दोन वर्षांत साध्य झालेले नाही. मग वित्तीय तूट नियंत्रणात आणण्यासाठी उत्पादक खर्चावर नियंत्रण ठेवणे ही कडू औषधाची मात्रा सरकारला द्यावी लागते व हे देशाच्या विकासाच्या दृष्टीने नकारात्मक आहे. ट्रम्प यांच्या कृपाशीर्वादाने व्यापारयुद्ध भडकले आणि आयात-निर्यातीचे गणित बोंबलले तर आपल्या आयातीवर होणारा परिणाम फक्त श्रीमंतांवर, उच्च मध्यमवर्गीय लोकांवर जास्त होईल पण निर्यातीवरच्या परिणामामुळे लघु आणि मध्यम उत्पादक, शेतकरी यांचेही मोठे नुकसान होणार आहे या व्यापारयुद्धाला आपण कसे सामोरे जातो हे पाहावे लागेल.
महागाई आणि रिझर्व्ह बँक
– मध्यंतरी व्याजदरात कपात करून रिझर्व्ह बँकेने आपले धोरण बाजार अनुकूल असेल असे दर्शवले असले तरी वर उल्लेखलेल्या व्यापारयुद्धाचा थेट परिणाम भारतातील महागाईवर होणार आहे. महागाई नियंत्रणात ठेवणे व बाजारात पुरेशी रोकड उपलब्ध करून देणे हे रिझर्व्ह बँकेला जमले आहे ही एक सकारात्मक बाब आहे.
निकालांचे अवलोकन करूया
– पुढील तीन महिन्यांसाठी बाजाराचा अंदाज घेण्याऐवजी या तिमाहीअखेरीस आलेल्या निकालांचे अवलोकन करायला हवे. रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपनीने आपल्या शेवटच्या तिमाहीतील निकालामध्ये सरशी दाखवली असून अनिश्चित बाजारपेठेतही कंपनीचे नफा आणि विक्रीचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.
उत्साह आणि आतातायीपणा यात फरक आहे
– शेअर बाजारातील चढ-उतार जितकी अधिक होते, तेवढे गुंतवणूकदारांमधील अस्वस्थतेचे प्रमाण वाढत जाते. गुंतवणूकदार अस्वस्थ आहेत याचाच अर्थ ते पुरेसे परिपक्व झालेले नाहीत असा आहे. अनेकांनी या बदलत्या परिस्थितीत कोणताही विचार न करता आपल्या सुरू असलेल्या एसआयपी थेट बंद करून टाकल्या! काही जणांनी भविष्यात काय होईल? या भीतीने आपल्या गुंतवणुकीपैकी काही शेअर विकून टाकले. शेअर विकण्याला कोणाचीही हरकत नाही पण आपण विकत घेतलेल्या शेअरचा ट्रम्प यांच्याशी काहीही संबंध नसताना फक्त बाजारात भूकंप झाला आणि त्या शेअरच्या किमतीवर परिणाम झाला तर विक्रीचा निर्णय घेणे यात कोणते शहाणपण आहे!
याउलट आताची बाजार स्थिती आपल्या पोर्टफोलिओला आकार देण्याची आहे. शेअरचे मूल्यांकन, मागच्या तीन वर्षांतील नफ्या-तोट्याचे आकडे, गुंतवणुकीवरील परतावा देणारे रेशो यांचा अभ्यास करून गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारामध्ये परतण्याची गरज आहे.