सुधाकर कुलकर्णी
मागील काही लेखात आपण आयुर्विमा पॉलिसींची माहिती घेतली होती. आजारपण आणि त्या अनुषंगाने होणारे हॉस्पिटलायझेशन यामुळे होणाऱ्या खर्चाची तरतूद आपल्याला मेडिक्लेम पॉलिसी घेऊन करता येते. त्यादृष्टीने आर्थिक नियोजनात मेडिक्लेम पॉलिसीचे अनन्यसाधारण महत्व आहे आणि म्हणून आज आपण मेडिक्लेम पॉलिसी बाबत माहिती घेऊ.
१) परिवार आरोग्य विमा पॅालिसी(फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी): ही पॅालिसी खालील दोन पद्धतीने घेता येते.
अ) पहिल्या प्रकारच्या पॉलिसीत कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा विमा रक्कम स्वतंत्र असते व तो वेगळा सुद्धा असू शकते. या पॉलिसीचा प्रीमियम पॉलिसीत समाविष्ट असणाऱ्याच्या वयानुसार असतो तथापि एकत्रित आकारला जातो व या सर्वाना एकच पॅालिसी दिली जाते. उदाहरणार्थ म्हात्रे यांच्या कुटुंबात ते स्वत:, पत्नी, मुलगा व मुलगी असे चार जण आहेत व त्यांची वये अनुक्रमे ४१, ३७, १६ व १२ अशी आहेत व त्यांनी स्वत:साठी व पत्नीसाठी रु.३ लाख इतके विमा कवच घेतलेले असेल व मुलांसाठी प्रत्येकी रु.१ लाख इतके विमाकवच घेतलेले असेल तर त्यांना त्यांचा स्वत:च्या रु. ३ लाख विमाकवचाचा प्रीमियम हा वयोगट ४० ते ४५ नुसार असेल तर पत्नीच्या रु.३ लाख विमाकवचाचा प्रीमियम ३५ ते ४० वयोगटानुसार असल्याने तो श्री. म्हात्रे यांच्या प्रीमियमपेक्षा कमी असेल (विमाकवच सारखेच असले तरी) याउलट वयाच्या २५पर्यंत विमाकवच वयानुसार बदलत नसल्याने दोन्ही मुलांच्या रु.१ लाखाच्या विमा कवचाचा प्रीमियम सारखाच असेल.
या पॅालिसीतील समाविष्ट व्यक्ती आजारी पडून जर हॉस्पिटलायझेशन करावे लागले तर सबंधित व्यक्तीच्या पॅालिसीतील कव्हर इतका जास्तीत जास्त क्लेम मिळू शकतो. इथे श्री.म्हात्रे यांची फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी असून त्यांचे स्वत:चे विमाकवच रु.३ लाख इतके आहे तर पत्नीचे विमाकवच रु.३ लाख इतके आहे आणि दोन्हीही मुलांचे प्रत्येकी रु.१ लाख इतके विमाकवच आहे ( एकूण विमाकवच रु.८ लाख). या फॅमिली मेडिक्लेम पॅालिसीचा एकत्रित प्रीमियम आकारला जाईल.
जर यात श्री.पाटील हॉस्पिटलाईज झाले तर त्यांना एका वर्षात एकूण रु.३ लाखापर्यंतचा क्लेम मिळू शकेल { म्हणजे श्री. पाटील पॅालिसी घेतल्या नंतर तीन महिन्याने हॉस्पिटलाईज झाले व खर्च रु.७५००० इतका आला तर यातील बहुतांश क्लेम मंजूर होईल आणि दुर्दैवाने जर पुढील दोन महिन्याने पुन्हा हॉस्पिटलाईज झाले व यावेळचा खर्च रु. २५०००० इतका आला तर मात्र रु. २५०००० इतका क्लेम मंजूर न होता रु.२२५०००(३०००००-आधीचे ७५००० ) इतकाच क्लेम मंजूर होईल.}. या प्रमाणे अन्य कोणाचे हॉस्पिटलायझेशन खर्च पॉलिसी कालावधीत झाला तर त्याच्या विमाकवचानुसार वरील प्रमाणे क्लेम मिळेल. वरील पॉलिसीचा वार्षिक प्रीमियम अंदाजे रु.२० ते २२ हजार इतका असू शकेल मात्र तो कंपनीनुसार कमी अधिक असू शकेल.
ब) दुसऱ्या प्रकारच्या पॉलिसी फॅमिली फ्लोटर प्लॅन असे म्हणतात. या पॅालिसचे विमाकवच संपूर्ण कुटुंबासाठी एकत्रित स्वरुपात असते. वरील उदाहरणातील श्री म्हात्रे प्रत्येकाचे वेगळे विमाकवच न घेता संपूर्ण कुटुंबासाठी रु. ७ लाख विमाकवच असलेली फ्लोटर पॅालिसी घेऊ शकतात. या पॅालिसीत समाविष्ट असणाऱ्या कोणाही एकास रु. ७लाख किंवा चौघांचा मिळून ७ लाखा पर्यंत क्लेम मिळू शकतो. मात्र पॉलिसिच्या एका वर्षात एकूण ७ लाख इतकाच क्लेम मिळू शकतो. उदा: पॅालिसी घेतल्यानंतर २ महिन्याने श्री म्हात्रे यांची अँजिओप्लास्टी होऊन रु.२ लाख इतका खर्च आला हा खर्च फ्लोटिंग विमाकवचाच्या आत असल्याने जवळपास संपूर्ण खर्चाचा क्लेम मिळू शकेल.
जर कुटुंबातील अन्य कोणाचा (एकाचा/दोघांचा) हॉस्पिटलायझेशन खर्च याच वर्षात (पॅालिसी कालावधीत) रु.६ लाख आला तर जवळपास रु. ५ लाखाचा ( ७-२ =५ जरी खर्च रु. ६ लाख झाला असला तरी ) क्लेम मिळू शकेल. असा एकूण रु. ७ लाखाचा क्लेम संपूर्ण कुटुंबास मिळू शकेल. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की या पॅालिसीचा प्रीमियम कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या वयानुसार घेतला जातो. कुटुंबातील अन्य व्यक्तींच्या वयाचा विचार होत नाही. श्री.म्हात्रे यांचे वय विचारात घेऊन प्रीमियम आकारला जाईल. तसेच या पॅालिसीस नो क्लेम बोनस मिळत नाही. वरील तपशिलाच्या पॉलिसीचा अंदाजे वार्षिक प्रीमियम रु.३० त३१ हजार इतका असू शकेल व मात्र तो कंपनीनुसार कमी अधिक असू शकेल.
एक परिवार-एक पॅालिसी या कौटुंबिक तत्वाचा आधार घेऊन एकाच पॅालिसीतून कुटुंबातील सर्व सदस्यांना या दोन्हीही पॅालिसीतून (फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी व फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसी ) आरोग्य विमा पॅालिसीचे फायदे मिळू शकतात. कुटुंब म्हणजे पती-पत्नी व अवलंबित मुले यांचा या दोन्ही पॅालिसीत समावेश करता येतो. ही पॅालिसी १८ ते ८० वर्षा पर्यंतच्या व्यक्तीला घेता येते. तसेच आई- वडील पॅालिसी घेत असतील तर ३ महिन्याच्या मुलापासून ते १८ वर्षे वयापर्यंतच्या अवलंबित मुलांचा समावेश करता येतो. अविवाहित व नोकरी न करणारी मुलगी तसेच अपंग मुलांच्या बाबतीत वयाची अट नाही. १८ वर्षे पेक्षा जास्त वय असणऱ्या परंतु उच्च शिक्षण चालू असणाऱ्या मुलाचा वयाच्या २६ पर्यंत समावेश करता येतो.
फॅमिली मेडिक्लेम पॅालिसी व फॅमिली फ्लोटर मेडिक्लेम पॅालिसीची ठळक वैशिष्ट्यं
१)या पॅालिसीमध्ये तृतीय पक्ष व्यवस्थापनाची (Third Party Administrator) सुविधा असून पॅालिसीचे क्लेमचे पेमेंट या यंत्रणेमार्फत केले जातात. या व्यवस्थेस टीपीए असे म्हणतात. टीपीए मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास पॅालिसीधारक रुग्णाचे हॉस्पिटलचे विमाकवचाच्या मर्यादेपर्यंतचे बिल टीपीए मार्फत परस्पर हॉस्पिटलला दिले जाते. (रुग्णाला अगदी नाममात्र पेमेंट करावे लागते.) याला विना पेमेंट पॅालिसी (cash less policy) म्हणतात.
२) पॅालिसीचा वार्षिक प्रीमियम खालीलप्रमाणे प्राप्तीकर धारा ८०-डी अंतर्गत करपात्र उत्पन्नातून वजावटीस पात्र असतो.
अ) तसेच ६० वर्षांआतील पॅालिसीधारकास ही सवलत रु.२५००० पर्यंत मिळू शकते.
ब) तसेच आई –वडिलांची वेगळी पॅालिसी घेतल्यास व त्यांचे वय ६० च्या आता असल्यास रु.२५००० ची आणखी असे एकूण २५०००+२५०००= रु.५०००० वजावट मिळते तर ६० पेक्षा जास्त असल्यास रु.५०००० आणखी अशी एकूण रु.२५०००+५०००= रु.७५०००वजावट मिळते आणि जर पॉलिसीधारकाचे वय ६० पेक्षा जास्त असेल आणि आई वडिलांची पॉलिसी घेतली असेल तर रु.५०००० +५०००० =रु.१००००० इतकी वजावट मिळेल. अशी मिळणारी सवलत प्रत्यक्ष प्रीमियम व कमाल मर्यादा यातील जी कमी रक्कम असेल ती करसवलतीस पात्र असते.
३) पॅालिसीच्या सर्वसाधारण अटी पुढील प्रमाणे असतात.
अ) हॉस्पिटलायझेशन क्लेमसाठी रुग्णाने किमान २४ तास हॉस्पिटलमध्ये असणे आवश्यक असते ( मोतीबिंदू , पाईल्स या सारख्या शस्त्रक्रियांनंतर रुग्णास ३-४ तासात डिस्चार्ज दिला जातो असे आजार व त्यावरील उपचार वगळता)
ब) रूम चार्जेस, नर्सेस चार्जेस, ब्लड आणि इंजेक्शन चार्जेस, रुग्णवाहिका चार्जेस
ड) डॉक्टर, सर्जन, भूलतज्ज्ञ, विविध चाचण्यांवरील खर्च
ई) मेडिसिन्स, भूल, ऑक्सीजन, ऑपरेशन थिएटर चार्जेस, सर्जिकल उपकरणे, एक्स रे चार्जेस, डायलिसीस, केमोथेरपी, रेडीओथेरपी, पेसमेकर, कृत्रिम अवयव बदलणे, अवयव दान करणाऱ्या व्यक्तीवर होणारा वैद्यकीय खर्च यासारखे सर्व खर्च क्लेम करता येतात. यातील काही खर्चांना कमाल मर्यादा असते व तसा पॉलिसीमध्ये उल्लेख असतो.
आता आयआरडीएने क्लेम सेटलमेंट पिरीयड, प्रीएक्झीस्टींग डिसीज, क्लेम रिजेक्शनबाबत ग्राहकाभिमुख बदल केलेले आहेत. आपली मेडिक्लेम पॉलिसी घेताना पॉलिसीतील अटी समजून घेऊनच पॉलिसी घ्यावी. पॉलिसी प्रीमियम हा इंश्युरन्स कंपनीनुसार कमी अधिक असू शकतो.