भारतातील ऑनलाईन शॉपिंगचा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत चालला आहे याचे आणखीन एक उदाहरण म्हणजे ‘मिशो’ या ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपनीने आपल्या व्यवसायाबद्दल महत्वाची माहिती दिली आहे. ऑनलाइन विक्री करणाऱ्या कंपन्यांना दीर्घकाळपर्यंत नफ्याची प्रतीक्षा करावी लागते. एक स्टार्टअप कंपनी म्हणून मिशोचा उदय झाला. भारतात ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिंत्रा अशा आकाराने व गुंतवणुकीने मोठ्या कंपन्यांमध्ये मिशोचा टिकाऊ किती काळ लागणार असे म्हटले जात असताना कंपनीने पहिल्यांदाच नफ्यामध्ये येत असल्याची सुवार्ता दिली आहे. कंपनीचे सीईओ विधीत अत्रेय यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य केले. या जुलै महिन्यात पहिल्यांदाच मिशोने नफ्यात पदार्पण केले आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भारतातील सर्वाधिक स्मार्टफोन्समध्ये डाऊनलोड केले गेलेले ऑनलाइन शॉपिंग ॲप हे मिशो असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे ‘मिशो’चे बिझनेस मॉडेल?

मिशो ही हॉरिझॉन्टल ई-कॉमर्स प्रकारात मोडणारी कंपनी आहे. याचा अर्थ असा की त्यांच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर कोणालाही नोंदणी करून आपली उत्पादने विकणे शक्य होते. यासाठी तुमचा उद्योग मोठा असण्याची आवश्यकता नाही. तुम्ही नावाजलेला ब्रँडही असण्याची आवश्यकता नाही. याउलट एम. एस. एम. इ. क्षेत्रातील लघुउद्योजकांना, अगदी छोट्या जागेतून व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांना आपला व्यवसाय मिशोच्या माध्यमातून करणे शक्य होते. भारतातील वेगाने उदयास येणाऱ्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील शहरांमध्ये मिशोने आपला व्यवसाय चांगलाच विस्तारला आहे. मिशोच्या प्लॅटफॉर्मवरून आपली उत्पादने विकणाऱ्या अकाउंटमध्ये लक्षणीय संख्या नव्या पिढीतील महिला उद्योजकांची आहे, ही बाब विशेष लक्षात घेण्यासारखी आहे.

कमीत कमी कमिशन आणि अधिक जाहिरात हे मिशोचे सूत्र आहे. एखादी वस्तू विकायची इच्छा असलेल्या उद्योजकाला मिशोवर आपले नाव नोंदवायचे असल्यास म्हणजेच आपले लिस्टिंग करायचे असल्यास त्यासाठी कोणतेही चार्जेस किंवा फी घेतली जात नाही. अन्य ऑनलाइन विक्री माध्यमांमध्ये आपले नाव नोंदवण्यासाठीच पैसे द्यावे लागतात. याबाबतीत मिशो छोट्या ग्राहकांबरोबर आहे आणि छोट्या विक्रेत्यांबरोबर सुद्धा आहे. मिशोच्या वेबसाईटवर काळजीपूर्वक बघितल्यास आपल्याला हे स्पष्टपणे दिसेल की जवळपास ३० विविध प्रकारच्या कॅटेगरीमध्ये मिशो उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून देते. मागच्या वर्षअखेरीस प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार मिशोने एकूण सहा कोटी उत्पादने आपल्या ऑनलाईन पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. या उपलब्ध उत्पादनांपैकी ७० टक्के उत्पादने टायर टू म्हणजेच निमशहरी भागात तयार झालेली आणि देशभर विकली गेलेली आहेत. मिशो आणि अन्य कंपन्या यांच्यात असलेला एक फरक म्हणजे ७ Days Pay Policy या धोरणामुळे मिशोने जास्तीत जास्त छोटे ग्राहक जोडले आहेत. तुम्ही मिशो वर तुमचे प्रॉडक्ट लिस्ट केल्यावर मिशोद्वारे ग्राहकांनी ते विकत घेतले तर तुमचे पैसे सात दिवसातच तुम्हाला मिळतात. या वैशिष्ट्यपूर्ण सोयीमुळे मिशोकडे मोठा क्लायंट वर्ग जमला आहे. गेल्या वर्षभरातील मिशोवर झालेल्या खरेदी विक्रीचा अभ्यास केल्यास जवळपास दीड कोटी वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांच्या ऑर्डर्स कंपनीला मिळाल्या. म्हणजेच नेहमीच्या वस्तू तर विकल्या गेल्याच, पण दीड कोटी ऑर्डर्स या नवीन लॉन्च झालेल्या वस्तूंच्या होत्या. यातून हे स्पष्ट होते की मिशो या ऑनलाइन ॲपवर आणि वेबसाईटवर सतत येणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे.

कंपनी नफ्यात कशामुळे आली?

याचे प्रमुख कारण स्पष्ट करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विधीत अत्रेय यांनी ऑर्डर आणि विक्रीच्या आकड्यांना सर्वाधिक महत्त्व असल्याचे सांगितले. मागच्या तिमाही पासून सतत ऑर्डरचा ओघ वाढतच आहे. ४३% घसघशीत वाढलेल्या ऑर्डर्स आणि ५४% वाढीव विक्री यामुळे कंपनीला नफ्याचा दिवस दिसला आहे असेही त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात कंपनी एका दिवसाला ३५ लाख ऑर्डर्स प्रोसेस करते, कंपनीच्या ग्राहकांच्या उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास केल्यावर असेही दिसते की कंपनीकडे वेबसाईट आणि ॲपच्या माध्यमातून जे ग्राहक येतात त्यातील ८५ टक्के ग्राहक पुन्हा ऑर्डर नोंदवतात. म्हणजेच आलेला कस्टमर आपल्याजवळच राहील याची काळजी मिशो घेताना दिसते. नफ्याची निश्चित आकडेवारी कंपनीने जाहीर केलेली नसली तरीही २०२३-२४ या वर्षात बाजाराचा कल असाच राहिला तर कंपनीला स्थिर नफ्याचे दिवस दिसू लागतील असा आत्मविश्वास त्यांनी वर्तवला आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meesho earns profit e commerce online market mmdc psp
Show comments